बघता बघता रोहन ७ महिन्यांचा झाला. आणि जाणवलं की अरे.. तन्मयही ७ वर्षांचा झाला. दिवस कसे भराभर मागे पडले. दोन महिन्यांचा छोटासा तन्मय... मानही बसली नव्हती त्याची. त्याला घेऊन चेन्नईला गेले होते. त्याला वाढवताना आलेली मजा आठवली. जरा जोरात रडला की काय झालं असेन असा विचार मनात यायचा आणि भिती वाटायची. मग डॉक्टर कडे पळत जायचो.. मला आठवतय! अचानक तन्मय रडायला लागला म्हणुन रात्री दीड वाजता आम्ही त्याला घेऊन २० कि.मी. दुर मालार हॉस्पिटल मध्ये गेलेलो.. आणि तिथे जाई पर्यंत तो रडायचा थांबला. डॉक्टर म्हणाले "Nothing special. Its gases that cause the stomach pain and kids cry till they pass gas out." आम्ही दोघं गप्प!
दिवस मागे पडले. तन्मय पडो झडो माल वाढो या उक्तीप्रमाणे वाढला. कधी प्रेमाने, कधी चिडत, कधी रडत... हळू हळू समज देत समजून घेत तो वाढला. रोहन झाला तेंव्हा असं वाटलं की तन्मयचा अनुभव जसा होता तसाच रोहनचा पण असेन. पण त्या दोघांमध्ये खुप तफावत आहे. तन्मय शांत आणि समजदार तर रोहन तडतडा आहे. तन्मय पटापट जेऊन घेतो तर रोहन patience बघतो. तन्मय शांत आणि निवांत तर रोहन चपळ आणि चंट. दोन बाळं एक सारखी नसतात हेच खरं.. हे उमगलं आणि पटलं सुद्धा.
त्याचे खेळ बदलले, अभ्यास सुरू झाला, बडबड बदलली, over the period तो अजून बदलत जाणार... आणि त्याला बघत रोहनही वाढणार.
पाळण्यात निवांत पहुडलेलं, सुती दुपट्यात स्वतःला गुंडाळून घेत जगाचा अंदाज घेणारा रोहन आता रांगायला लागलाय. हव्या त्या वस्तूकडे सरपटत जाणं, पकडून आपटणं, आवाज ऐकणं, चिरकणं, ओरडणं, आणि मला घ्या अशा अर्थाचं लोभसवाणं हसणं.... सगळं किती छान आहे ना!
खरचं... किती सुंदर आहे वाढणं आणि वाढवणं.
सोनल
31 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment