14 March 2009

रोहीत राऊत - अबीर गुलाल उधळीत रंग



अबीर गुलाल उधळीत रंग हे माझ्या अनेक अनेक आवडत्या मराठी गाण्यांपैकी एक. सर्वत्र शोध घेत माझं हे गाणं कायम ऐकणं सुरू असतं. सवयीनं युट्यूबवर मी शोधलं. तिथे रोहीत राऊतच्या गाण्याची लिंक मिळाली. माननीय तौफिक कुरैशी यांच्या उपस्थितीत झालेल्या झी मराठीच्या चिल्ड्रन्स स्पेशलच्या एका एपिसोड मध्ये त्यानं गायलेलं हे गीत. जनरली गाणं जेंव्हा मी ऐकते तेंव्हा मोडक्या आणि फुटून पार मोडलेल्या आवाजात मी ही गाणं गुणगुणते. पण रोहितचं हे गाणं ऐकताना मला इतर कोणाचा आवाज ऐकू ही आला नाही. त्याच्या शब्दांचं उच्चारण, स्टेजवरचा आत्मविश्वास, आणि त्याचा लागलेला सूर! मस्त झालं गाणं. उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जातीहीन... रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन... या दोन ओळींना लागलेला त्याचा आवाज मस्त आहे. "जातीहीन" शब्दातलं त्याचा "ज" चा उच्चार "जात नाही ती जात" यातील "ज" सारखा नाही तर "जीवन सुंदर आहे" मधील "ज" सारखा झालाय... तो भाव खाऊन गेला! रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन ही ओळ म्हणताना तो खरचं त्या मध्ये लीन झालेला भासतो. पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग.. नाथाघरी नाचे माझा सखा पांडूरंग या ओळींना घेतलेल्या हरकती आणि छोटीशी तान आहाहा असं म्हणायला मला तरी भाग पाडते.

जिओ रोहीत! खुप पुढे जा... तुझ्या वाटचालीसाठी अनेकोत्तम शुभेच्छा!

~ सोनल