28 October 2007

पाऊस

छान वारा सुटलाय आज सकाळपासून! मागच्या अंगणातली झाडंही आनंदानं वार्‍यावर झुलत होती. गरम गरम कॉफीच्या घोटासोबत माझी आवडती सेंटीमेंटल्स सुरू होती. दुपारचे ४ वाजलेत आणि बाहेर सात आठ वाजल्यासारखं अंधारून आलयं. खिडकीतून पाहिलं तर रस्ता सगळा ओला! पाऊस कधीचा पडतोय??? मला कळलंही नाही. मला आवडतो पाऊस. असा रिमझिम, कळत नकळत पडणारा. रस्त्याला ओलं करून टाकणारा. बाहेर जाणार्‍या माणसांना छत्री उघडू की नाही अशा संभ्रमात टाकणारा. संपूर्ण काचेची भिंत, आणि त्यापलीकडे पडणारा रस्त्यावरचा सिमझिम पाऊस! मी किती मागे पोहोंचली माहितिये? मी शाळेत पोहोंचले होते! औरंगाबादला होतो आम्ही. शारदा मंदिरला. असंच अंधारून आलेलं. शाळा सकाळची होती. आई म्हणालेली, "आज शाळा होणार नाही. अगं खुप अंधारून आलयं!" पण शाळेत अशा दिवशीच खुप मजा येते! वर्गात अटेंडन्स कमी आणि मग मॅडमही काही न शिकवता गप्पा मारायच्या आमच्या सोबत. त्यादिवशी ४० जणींच्या आमच्या वर्गात जेमतेम ११ १५ जणी होत्या. बाकी मुलींनी माझ्या मते आयुष्यातला एक सगळ्यात मनमोकळा दिवस एंजॉय केला नाही!
त्यादिवशीचा पाऊस विशेष लक्षात राहिलाय. आम्ही ८ १० जणी मिळून शाळेत एकत्र जायचो. निवांत, गप्पा ठोकत. हसत, खिदळत... ९ च्या दरम्यान सकाळी जोरात पाऊस सुरु झाला आणि सगळी शाळा कॉरिडॉर मधे जमली. मग एका वर्गात जमून गाण्याच्या भेंड्या झाल्या. किती गाणी म्हटली आम्ही!!! दिड तास दणक्यात चाललेली अंताक्षरी पावसाचा जोर कमी होईपर्यंत सुरू होती. पावसाचा जोर कमी झाला आणि आमच्या मॅडमनी शाळा सुटली असं डिक्लेअर केलं. खुप अनिच्छेनं आम्ही सगळ्य़ांनी शाळा सोडली. एरव्ही बारा वाजल्यापासून घड्याळं चेक करणार्‍या या पोरी आज घरी जायला नको म्हणत आहेत हे पाहून स्टाफही हसत होता. शाळेतून अकराच्या दरम्यान बाहेर पडलो तो अर्ध्या रस्त्यात पावसानं पुन्हा जोर धरला. नखशिखांत भिजलो होतो आम्ही सगळ्या. एकदम निवांत... कोणी नको भिजू म्हणणारं नव्हतं की कोणी रागावणारं नव्हतं!!! आम्ही मोकाट सुटलो होतो!
सेंटीमेंटल्स आणि सोबत रिमझिम पडणारा पाऊस असला की हा दिवस आठवतो. पुन्हा शाळेत जावंसं वाटतं. गाण्याच्या भेंड्या खेळण्यासाठी, मॅडमशी गप्पा मारण्यासाठी, सायकलवर घरी परत येताना जोरदार पावसात नखशिखांत भिजण्यासाठी!!!
आज हा दिवस आठवला त्यावेळी मागं सुमन कल्यणपुर आणि कमल बगोट यांनी गायलेलं गाणं सुरू होतं गरजत बरसत सावन आयो रे!!!!

Get this widget | Track details | eSnips Social DNA