06 June 2007

आता मला सर भेटतील

अभियांत्रिकी महाविद्यालयात मोघे सरांचा आज निरोप समारंभ होता. गेली ३५ वर्षे सर कॉलेजची मन लाऊन सेवा करत होते. खुप आवडते नसले तरी सर विद्यार्थी वर्गात मानले गेले होते. त्यांचा धाक होता, पण अवाजवी नव्हता. प्रात्यक्षिक चांगलं झालं की सर मार्क चांगले देत पण तेच जर जमलं नाही तर न रागावता पुन्हा समजावून द्यायचे. त्यांच्या वागण्यात बोलण्यात आणि चालण्यात एक जरब होती... एक धाक होता. त्यांच्या विषयाला वर्ग भरलेला असायचा. मोघे सर कॉलेजात एकटॆच असे होते जे वर्गात हजेरी घ्यायचे नाहीत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मुलांनी शिकण्यासाठी वर्गात यावं... हजेरी साठी नाही. सर मन लावून शिकवायचे आणि मुलं ही यायची. अचानक एखाद्याला उभं करून "हं चल पुढे काय ते सांग!" असं म्हणायला सर मागं पुढं पहायचे नाहीत. कॉलेज हे समस्यापूर्तीसाठी असतं आणि त्यामुळं मुलांनी आज काय शिकवणार आहेत हे आधी एकदा वाचून यावं हा सरांचा आग्रह असायचा. आपल्या मुलांना भरपुर वाव मिळावा यासाठी सर नेहेमी प्रयत्न करायचे. "नुसता अभ्यास करू नका लेक हो गॅदरिंग ही अटेण्ड करा असं ते म्हणायचे. आणि एखाद्या इव्हेंटला चांगला प्रतिसाद मिळत असेल तर "अरे... कोणी प्रेक्षक आहे की नाही...." असं ही तेच म्हणायचे.

लेखी परीक्षेदरम्यान जर कोणी मान वर केली तर सर त्याच्या बाजूला जाऊन उभे रहायचे. त्यामूळे एकदा खाली घातलेली मान पेपर संपल्यावरच वर चायची. आणि याच एका गोष्टीमुळे ते वर्गावर येऊ नयेत यासाठी सगळेजण प्रार्थना करायचे....

मोघे सर म्हणजे एक प्रसन्न व्यक्तिमत्व होतं. साधी राहणी... आणि साधे विचार होते. वर्गात नोट्स काढून शिकवणं त्यांना आवडायचं नाही.एक खडू आणि डस्टर या साधनांच्या मदतीने वर्गात येणारे सर तासाच्या शेवटी विद्यार्थ्यांना भरपूर माहिती देऊन जायचे. माहितीचा जणू खजिनाच होते मोघे सर. कधीही विचारा आणि कोठेही विचारा अशी त्यांची ख्याती होती. आणि ते याच नावाने ओलखले जात... कधी ही कोठे ही..!! त्यांच्या वर्गात कोणी आगाऊपणा करायचं नाही. पण ५ ६ मिनिटं मजा करण्याची मुभा सर्वांनाच होती. सर दिलखुलासपणे सामील व्हायचे. पण ५ मिनिटांपेक्षा जास्त नाही. सरांची एक नजर वर्गावरून फिरताच सगळे शांत व्हायचे. एक हसरी नजर टाकून सर पुन्हा शिकवायला लागायचे.

३५ वर्षे निर्व्याज सेवा करून सर आज रिटायर होत होते. त्यांच्या चेहर्‍यावर रिटायरमेंट नको असं स्पष्ट दिसत होतं. कॉलेजच्या वातावरणात त्यांचं अख्खं आयुष्य गेलं होतं. येथे आलेला प्रत्येक विद्यार्थी त्यांना माहित होता..... कॉलेज करणारा आणि न करणारा ही!

आज सभागृह खचाखच भरलं होतं. प्रथम वर्ष ते अंतिम वर्ष प्दवी आणि पदव्युत्तर शिक्षणाचे सगळे विद्यार्थी हजर होते. मनं भरून आली होती. सगळं आठवत होतं. कडू गोड आठवणी येत होत्या. कोणाला कडक मोघे सर आठवत होते तर कोणी म्हणत होतं,"आम्हाला सरांनी रागावलं नाही." संमिश्र भावनांनी सभागॄह भरलं होतं. मनात चलबिचल होती. वातावरण शांत होतं. नेहमी आपल्या वक्तृत्वानं सभागृह दणाणून सोडणारे विद्यार्थी ही आज शांत होते.थोडी फार कुजबुज होती पण रोजच्या सारखा दंगा आज नव्हता.

पोडियम वर सरस्वतीचा शुभ्र फुलांचा हार लावलेला फोटो ठेवला होता. मंद तेवणार्‍या ज्योती जवळ मोगर्‍याची उदबत्ती लावलेली होती. टेबल खुर्च्या मांडून ठेवल्या होत्या. संध्याकाळी साडेचार वाजता होणार्‍या निरोप समारंभाला विद्यार्थी चार वाजल्यापासूनच जमले होते. सगळे जण आपापल्या जागी बसले होते. साडे चारच्या आसपास प्रिंसिपल सर, मोघे सर व त्यांच्या पत्नी आणि सर्व डिपार्टमेंटचे सर व मॅडम सभागृहात आले. टाळ्यांच्या कडकडाटात सरांचं स्वागत झालं. हा कडकडाट सर खुर्चीवर बसले तरी सुरूच होता. सरांच्या चेहर्‍यावर नेहमी प्रमाणे स्मित हास्य होतं.

या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रांवृता ।
या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना ॥
या ब्रह्माच्युतशंकरै प्रभुतीभि: देवै सदा वंदिता ।
सामांपातु सरस्वती भगवती निःशेष जाड्या पहा ॥

शांत सरस्वती स्तवन गायल्या गेलं. मोघे सर आणि मॅडम शांत बसले होते. मॅडमचे डोळे बंद होते. जणू त्या हे स्तवन रोमा रोमात साठवून घेत होत्या. साधी कॉटनची नऊवार, मानेवर घातलेला आंबाडा आणि त्यावर एक फुलांचा साधा हार, कपाळावर मोठं ठसठशीत कुंकू. सावळ्या मोघे मॅडम सगळ्यांच्याच नजरेत भरल्या होत्या. जितक्या त्या शांत होत्या तेवढेच सर ही होते. तो शांत चेहरा सर्वांनाच परिचित होता. साधी शर्ट पॅंट, आणि डोळ्यावर चपखल बसणारा चष्मा. केस एकदम बारिक कापलेले. स्तवन संपलं आणि मॅडमची तंद्री मोडली. शांत चेहर्‍यानं एकदा डोळे बंद करून त्या काहीतरी पुटपुटल्या. मोघे सरांची खाली घातलेली मानही वर झाली.

मुलींची प्रतिनिधी धनश्री पुढे आली. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच स्वागत करण्यात आलं. मोघे सरांबद्दल विस्तृत माहिती तिनेच दिली. सर दुहेरी पदवी धारक होते. एक पदवी electrical engineering ची आणि दुसरी electronics engineering ची. शिवाय artificial intelligence चा विशेष अभ्यास होता. त्यांचे वेगवेगळे पुरस्कार मिळाले होते. त्यापैकी एक म्हणजे आदर्श शिक्षकाचा राष्ट्रपती पुरस्कार.

नाव घेताच प्रिंसिपल सरांनी माईकचा ताबा घेतला. आणि हसतच म्हणाले,"आज मोघे सर बोलतील आपण फक्त श्रोते.... पण मोघे सर बोलायच्या आधी काही विद्यार्थ्यांना आपलं मन मोकळं करायचं आहे. काही कडू गोड आठवणी सांगायच्या आहेत." आणि सर मागे सरकले. प्रथम वर्ष ते अंतिम वर्षाच्या काही विद्यार्थ्यांनी आपापली मनं मोकळी केली.

काही जणांना कडक सर आठवले तर काही जणांना मायेने भरलेले सर... काही जण बोलता बोलता गप्प झाले. वेगवेगळी चर्चासत्र गाजवणारे विद्यार्थीही कधी नव्हे ते अबोल झाले होते. २० २५ मिनिटात सगळी भाषणं आटोपली. आता नजरा मोघे सरांवर खिळल्या. सरांचे शब्द ऐकण्यासाठी सभागृह शांत झालं. पिनड्रॉप सायलेन्स होता.

मोघे सर उठून आले. त्यांची नजर सर्वांवरून फिरली...."मित्र हो...!!" अशी सुरुवात झाली आणि इतका वेळ शांत अविचल असलेल्या सभागृहावर एक स्मित हास्याची लहर उमटली. बालपण, शिक्षण, नोकरी, लग्न हे सगळं सांगत "मी कसा घडलो" हे सांगितलं. त्यांनी मिळालेली साथ, मदत, संधी, पडलेले आणि केलेले कष्ट, आणि अनेक वेळा आलेले अपयश हे सगळं नमूद केलं. सगळ्यांप्रमाणेच त्यांनी ही अपयशात खचून जायचं नाही हे सांगितलं. "मी ही खचलो होतो." मग पुन्हा कसा उभा राहिलो" हे ही सांगितलं. "अपयश येतच असतं रे... पण ते येणार आणि मी त्याला सामोरं जाणार याची मानसिक तयारी ठेवली की सगळं सहजगत्या पार पडतं." सर खुप काही सांगत होते. घरची मंडळी, मैत्र, सभोवतालचे लोकं सगळ्यांचा आवर्जून उल्लेख करत सुरुवातीच्या कठीण आणि कष्टाच्या काळात, नंतरच्या घाई आणि धावपळीच्या दिवसात आणि रिटायर व्हायच्या मनःस्थितीत मॅडमची मिळालेली साथ त्यांनी आवर्जून सांगितली. मॅडमच्या चेहर्‍यावरचं हसू सगळ्यांनीच पाहिलं. बोलता बोलता सव्वा तास कसा संपला कळलंच नाही. सलग बोलून सरांना दम लागला होता. पाण्याचा घोट पीत सर म्हणाले, "आता मला कळलं मी का रिटायर होतोय..! सलग बोलणं होत नाही.. दम लागतो.... आणि मला शक्य तेवढी सेवा मी केली. आता थोडा वेळ 'हिला' द्यावा म्हणतोय..." त्यांनी मॅडम कडे पाहिलं. "मी आता बसतो मुलांनो" असं म्हणत सरांनी आटोपतं घेतलं. धनश्री पुन्हा आली. सर्वांना अनपेक्षित तिनं मॅडमना बोलायची विनंती केली.

दोन्ही खांद्यावरून पदर सावरत मॅडम उठल्या. डोळ्यावरचा चष्मा पदरानी पुसत त्या जवळ आल्या. "मला जरा हे खाली करून देता का? मला जमत नाहीये." त्यांनी माईक खाली करून देण्याची धनश्रीला विनंती केली. "सरांचा आणि माझा सहवास हा तुमच्या आणि सरांच्या सहवासापेक्षा जास्त आहे. गेली ३५ वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतो आहोत, एकमेकांच्या सोबत आहोत. सुखात दुःखात आणि आनंदात आम्ही दोघेच सोबत होतो. सरांना कॉलेज नेहेमीच पहिलं होतं.... होतं नाही खरं तर अजूनही आहेच म्हणेन मी. आज त्यांची सेवानिवृत्ती... पण सकाळी त्यांच्या मनाची होत असलेली चलबिचल मी पाहिली आहे. उद्यापासून हे कॉलेज, विद्यार्थी, कॅम्पस दिसणार नाही याची खंत त्यांच्या मनात आहे हे दिसत होतं. चेहर्‍यावरून शांत दिसणारे सर आतून किती बेचैन आहेत हे मला जाणवत होतं..!" मॅडम बोलत होत्या.

"त्यांना इतकं बेचैन कधी पाहिलं नाही मी. मला आठवतयं... १० १२ वर्षापुर्वीची आठवण आहे.... तेजस राणे.. हो!! तेजसच होता तो. वर्गात लक्ष न दिल्यानं सरांनी त्याला लेक्चरभर उभं केलं होतं. सर लेक्चर संपल्यावर निघून गेले पण तेजसनं मनात राग धरला होता. पुढील सलग काही लेक्चर्सना तो नव्हता. सरांच्या लक्षात आलं होतं. पण ते काही म्हणाले नव्हते. पण एक दिवस कॉरिडॉरमध्ये तेजसनं त्यांना अडवलं. त्यांना खुप बोलला... घरचे किती मोठे आहेत व तुम्हाला धडा शिकवतो असं काही बोलला. सरांनी मला काही सांगितलं नाही पण काहीतरी झालं आहे हे मला जाणवत होतं. तेजस खुप बोलला होता. कॉरिडॉर मधील विद्यार्थ्यांना सरांच्या रागाची भिती वाटत होती. पण सर काही बोलले नाहीत,"तू उद्या वर्गात भेट" एवढंच म्हणाले. दुसर्‍या दिवशी सर्वांनाच अपेक्षित तेजस वर्गात आला. सर म्हणाले,"तू उर्मट नाहीस तर होण्याचा प्रयत्न का करतोस? तू तसा असतास तर मला तुम्हाला धडा शिकवतो असं म्हणायच्या ऐवजी तुला धडा शिकवतो असं म्हणाला असतास! सगळा वर्ग स्तब्ध होऊन पाहत होता. तेजस मुकाट खाली बसला. आपण मोघे सरांकडून हरलो हे त्याला कळलं होतं. गेली ४ वर्ष एकाच वर्गात शिकणार्‍या तेजसने त्या वर्षी बॅकलॉगचे ३ विषय काढले होते. सरांकडे पेढे घेऊन आला होता तो. तो गेल्यावर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मला हे सगळं कथानक सांगितलं होतं. मी हैराण झाले. मनात एक भिती आली.... तेजसने खरचं काही केलं असतं तर!!!" तोच तेजस आज सभागृहात आला होता.... सरांना भेटला होता... भरभरून बोलला होता.
एक विद्यार्थी आम्ही दर वर्षी दत्तक घ्यायचो. म्हणजे दरवर्षी त्या विद्यार्थ्याचा अभ्यासाचा व परिक्षेचा खर्च आम्ही करायचो. अर्थात तेच विद्यार्थी जे हा खर्च उचलू शकत नव्हते. त्यांना वह्या, पुस्तकं व परिक्षा फी आम्ही करतो. पण त्याला एक अट सरांनी ठेवली होती. जर सगळे विषय पास झाले नाही तर पुढच्या सेमिस्टरपासून ज्याचा त्याचा खर्च ज्यानी त्यानी करायचा. त्या भितीनं का होईना आमचे दत्तक विद्यार्थी पटापट पास झाले. काही कोडगे मिळाले पण नंतर सुधरले हळू हळू. काही तसेच राहिले"
"मला आठवतयं एका वर्षी कॉलेज मध्ये फॅशन शो करायचं ठरवलं होतं. सगळ्याच कामाला अडचणी असतात. तसंच या शोला ही अनंत अडचणी आल्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयोजक (स्पॉन्सर्स) मिळत नव्हते. फंड मिळत नव्हता. तेंव्हा ठरत होतं की विद्यार्थ्यांनीच पैसे जमा करायचे. सरांना कळलं. आणखी ४-५ सरांनी व मॅडमनी मदतीची तयारी दाखवली. काही स्टाफच्या ओळखीचे दुकानदार होते त्यांनी स्पॉन्सर्स मिळवून दिले. काही जणांच्या ओळखीने शो साठी कपडे स्पॉन्सर झाले. काहींनी मिळून कोच मिळवून दिला. आपल्यासाठी स्टाफ झटतोय हे विद्यार्थ्यांना कळलं होतं. प्रत्येकानं जिवापाड मेहनत केली होती. पहिला शो होता. आजच्या इतका सफाईदार झाला नसला तरी तो गाजला नक्की होता. चर्चेत आणि पहिल्या शो मधे भाग घेणार्‍यांच्या लक्षात नक्की राहिल असा झाला होता. हाच फॅशन शो आज ही सुरू आहे. खुप बदल झाला आहे. एक सफाईदारपणा आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ आहे कोण चांगलं प्रदर्शन करतो, कोण किती मोकळं आणि आत्मविश्वासानं स्टेजवर वावरतं.... एक ना अनेक.....!!!"
मॅडम आठवणी सांगत होत्या. एकामागून एक आठवणी त्यांच्या पोटलीतून बाहेर येत होत्या. जणू त्यांनी आठवणींचा खजिना मोकळा करायचा ठरवला होता. फक्त फॅशन शो नही तर असे स्पॉन्सर्स त्यांनी खेळासाठी व ग्राऊंडसाठी उपलब्ध करून दिले होते. अर्थात त्याला स्टाफ मेंबर्सची मदत मिळाली. त्यांच्या मदतीशिवाय सर हे करू शकले नसते हे मॅडमनी आठवणीने नमूद केलं.
एका वर्षी कॉलेजमध्ये सगळ्या विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी मिळून केलेली दिवाळीची आठवण.... त्या दिवाळीत सर विद्यार्थी व पालक यांच्या अजूनच जवळ पोहोंचले होते. कॉलेजमध्ये दिवाळीचे तीन दिवस पालकमेळा आयोजीत केला होता. तिथेच जेवण तयार केल्या गेलं... कॅम्प फायर रात्र साजरी केली गेली. एकाच दिवशी पूर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तरेकडील वेगवेगळ्या चवीचं अन्न खायला मिळालं होतं.
किल्लारीला झालेल्या भूकंपात मदत कार्यात सरांनी घेतलेला पुढाकार, कॉलेजला फंडाची गरज असताना फी वाढीच्या ऐवजी वेगवेगळे कार्यक्रम करून फंडाची काही रक्कम सरांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने उभी करून दिली होती. एकीकडे फी वाढ टळली होती व दुसरीकडे फंड जमला होता.
"एक ना अनेक.... सरांच्या अशा गोष्टी जेंव्हा आठवतात ना तेंव्हा मी किती भाग्यवान आहे असं वाटतं!!!" पाठीवरचा पदर घट्ट करत त्या म्हणाल्या.
मॅडमनी पाण्याचा एक घोट घेतला व त्या म्हणाल्या,"सर कॉलेज मधून सेवानिवृत्त होत आहेत याचा अर्थ असा नाही की त्यांचे विचार व त्यांनी दिलेली तत्वं हे ही निवृत्त होत आहेत. ते तुम्हाला जपायचे आहेत, पुढे चालवायचे आहेत. सरांचा ठेवा तुमच्या जवळ आहे. आमचे आशीर्वाद आहेत. आमच्या घराची दारं नेहेमी तुमच्यासाठी उघडी आहेत. कधी ही या तुमचं स्वागतच आहे!"
"या ३५ वर्षाच्या आमच्या सहवासात मला सर माझे म्हणून खुप कमी भेटले. जे दिसले, जे अनुभवता आले ते तुमच्या महाविद्यालयाचे मोघे सर! पण माझा सखा, माझा मित्र किंवा आजच्या तुमच्या भाषेत लाईफ पार्टनर असे ते मला कमीच भेटले. आज सर सेवानिवृत्त होत आहेत. इतक्या वर्षात ते उद्या पहिल्यांदाच घरी असतील. आज काय काय कामं करायची आहेत हे न सांगता सकाळचा चहा होईल. कॉलेजमध्ये आज काय काय झालं हे न सांगता रात्रीची जेवणं होतील. त्यांना असं पाहताना मला काय वाटत असेल या गोष्टीचा मी विचारही केला नाहीये.... करू शकत नाहीये."

मॅडमचा आवाज कापरा झाला होता. सभागृह शांत चिडीचुप झालं होतं.... काही वेळेच्या शांततेनंतर मॅडम पुन्हा बोलत्या झाल्या,"आज ३५ वर्षांनी मला एका गोष्टीचा खुप खुप मनापासून आनंद झालाय.... होतोय... आता सर मला भेटतील.... या ३५ वर्षात मला कमी भेटलेला माझा सखा, माझा मित्र मला भेटेल.... माझा लाईफ पार्टनर मला भेटेल..." मॅडमने जणू काय? बरोबर आहे ना? अशा आविर्भावात सरांकडे पाहिलं. चश्मा सावरत सरांनी मान डोलावली. मॅडमने माईकचा ताबा धनश्रीकडे दिला.

समारंभाची सांगता अल्पोपहाराने झाली. सर सगळ्यांशी बोलत होते. हसत होते.... त्यांच मन मात्र मॅडम वाचत होत्या. रात्री काय काय बोलायचं याचा विचार करत होत्या.


..समाप्त