रवीवारी आमच्या "अहों"ना ऑफिसचं काम लागलं होतं. एका प्रोजेक्ट्चं रिलिज होतं. संध्याकाळी ४पर्यंत काम संपलं आणि मित्राचा फोन आला "बायको पोरासोबत ये पार्कला आम्ही पण येतोय". आम्ही तयार होऊन गेलो. आणि मला खेळावं लागेल याची सुतराम कल्पना नसल्यानं मी पंजाबी ड्रेस घालून गेले होते. पण नेहेमी पार्कला गेले की मी किमान १५ मिनिटं ब्रिस्क वॉक घेते. त्यामूळे ड्रेस कोणताही असला तरी मी स्पोर्ट शुज नक्की घालते. चालत रमत गमत मी आमचे हे आणि चिरंजीव पार्कमधे पोहोंचलो. मित्राला यायला थोडा वेळ होता, तोपर्यंत चिरंजीवाच्या मागे आमचा वॉक झाला. मित्र आणि त्यांचा चिरंजीव आले आणि यांनी डिक्लेअर केलं," आम्ही टेनिस खेळायला चाललो तू पोरांवर लक्ष ठेव...." आणि मला दोन मुलांच्या तावडीत सोडून या दोघांची गच्छंती झाली टेनिस कोर्टाकडे. मी मनात म्हणाले "लवकर थकू दे देवा दोघांना" कारण दोन मुलांना सांभाळणं अशक्य नसलं तरी अवघड होतं....
थोडावेळ खेळून झाल्यावर आमच्या चिरंजीवाला पप्पांची आठवण आली... आणि ती संधी साधून मी मोबाईलवरून कुठल्या कोर्टावर खेळत आहेत याचा मागमुस लावला. एका मुलाला सायकलवर बसवून आणि दुसर्याला हातात धरून आम्ही टेनिस कोर्ट क्रमांक १ ला पोहोंचली. आणि माझी टेनिस कोर्टाजवळ आगमन झालं....
यांनी गेम डिक्लेअर केला होता त्यामुळे त्यांचा गेम पुढे चालू ठेवायचा मला चान्स मिळाला. आणि रॅकेट हातात घेऊन स्टेफी ग्राफ़च्या आविर्भावात (पंजाबी ड्रेस आणि स्पोर्टस शुज घालून :)) मी कोर्टावर एंट्री केली... एकवार सभोवताली नजर टाकली(जशी स्टेफी टाकते तशी...) टाळ्यांचे आवाज डोक्यात घुमले..... "so shud I serve now?" या प्रश्नानं मी भानावर आले. मी 'स्टेफी' नसून 'सोनल' आहे या वास्तवात आले. थोडावेळ गेम छान चालला.... मला खेळायला जमत होतं. माझे रिटर्न शॉट्स जिथे पाहिजे तिथेच पडत होते... आणि माझ्याकडे आलेले शॉट्स मला व्यवस्थित रिटर्न करता येत होते ... एकूणच खेळ चांगला चालला होता... आणि मला माझंच कौतुक वाटत होतं... पुन्हा स्टेफी झाल्यासारखं वाटत होतं... आणि इथेच अतिविश्वास नडला.... एका रिटर्नला माझे शुज उचलल्याच गेले नाहीत... जणू जमिनीला चिकटून बसले होते. आणि इतका वेळ मनोभावे खेळणार्या सोनलरूपी स्टेफीने कोर्टावर लोळण घेतली...
गुडघा खरचटला होता जोरात.... हाताचा तळवा सोलला होता. मला जोरात लागलं आहे याची जाणीव झाली होती... पण मनातली स्टेफी स्वस्थ कशी बसेल???? "काही नाही" असं म्हणत मी पुन्हा खेळले.... यांच्या मित्रासोबत एक गेम खेळून दुसरा आमच्या अहोंसोबत खेळायला सुरू केला आणि अर्ध्या गेममध्ये गुडघ्यानी साथ सोडली. जाम ठणक बसली होती.... इतका वेळ "काही नाही" म्हणणारं माझं स्टेफीरूपी मन आता वास्तवात येऊन सोनल बनलं होतं.... गेम सोडून घरी यायचा निर्णय घेतला...
परतीच्या वाटेवर स्टेफी नसलेली सोनल लंगडत चालायला सुरू झाली होती... गुडघा आता कोणत्या अवस्थेत दिसणार याचा विचारही करवत नव्हता.... सलवारला रक्ताचे २ ३ डाग होते. तिथे बघवत नव्हतं. घरी येऊन चिरंजीव आणि अहोंनी ड्रेसिंगचं सामान काढलं.... "चला आता स्टेफी ग्राफची ड्रेसिंग करू" या डायलॉगनी ड्रेसिंगची सुरूवात करण्यासाठी गुडघा पाहिला की हादरूनच गेले.... दोन ठिकाणी सॉलिड जखम झाली होती... खोल जखम होती... शिवाय ३ ४ ठिकाणी हलकं खरचटलं होतं.... अल्कोहोल वाइप्स लावले आणि तोंडातून जोरात किंकाळी बाहेर पडली.... खुप आग झाली.... कापूस ठेऊन मग रात्री झोपले.
सकाळी पाय ठणकत होता. तळवा पण हुळहुळत होता.... दिवस लंगडत काढला... चिरंजीवांकडून दिवसभर थोडी फार सेवा झाली. संध्याकाळी पुन्हा ड्रेसिंग करताना जखमेची "खोली" दिसली... इथे छोट्या छोट्या जखमांना दवाखान्यात जाता येत नाही.. जर प्रथमोपचारानं दुरुस्ती नाही झाली तरचं तेथे जाता येतं.... त्यामुळं घरीच सगळं करावं लागणार होतं.... दोन मोठ्या जखमांपैकी एकीत पू होण्याची शक्यता यांनी वर्तवली... ड्रेसिंग करताना पुन्हा एकदा आरडा ओरडा किंकाळ्या झाल्या... आणि शेवटी जखम मोकळी ठेवायचं ठरवलं....
लागल्यामुळं लाड झाले... रात्री पिझ्झा मागवला... सकाळी जेवायची घाई करू नकोस मी बघतो असं प्रेमळ आश्वासन मिळालं.... आणि मी ठणकता पाय घेऊन निद्राधीन झाले... रात्री स्वप्नात स्टेफी आली होती.... पाय कसा आहे विचारत होती... आणि मी "काही नाही गं! बस ना!" अशा प्रेमळ गप्पा मारत होते....
22 May 2007
Subscribe to:
Posts (Atom)