26 February 2009

बालपणीचा उन्हाळा सुखाचा

आज दुपारी कधी नाही ते मी बाल्कनीचा पडदा उघडला आणि डोळे बाहेरचं उन बघून गच्च बंद झाले. अजून फेब्रूवारीपण संपला नाहीये आणि उन जाणवायला लागलयं. टिंग टिंग टिंग गाडीची घंटीपण अगदी मोक्याच्या क्षणी वाजली. माझं लहानपण आठवलं. आम्ही नांदेडला होळीवर जायचो. ते माझं आजोळ.. खाला नावाची एक बाई तिथं आमच्या दाराच्या बाजूलाच दुकान लावून बसलेली असायची. तिच्या टोपलीत त्या त्या ऋतूची फळं नक्की असायची. आणि बिनधास्त डोळे मिटून कुठलं ही फळ उचला तिच्या टोपलीत खराब फळं नसायची. तिच्यापासून ५ १० फुटांवर कुल्फीवाला उभा असायचा. जाड, ओला, लाल रंगाचा कपडा झाकलेली त्याची कुल्फीची कुलींग सिस्टीम एकदम जबरदस्त होती. तो आला तिथे की मग त्याच्या ढकलगाडीची घंटी वाजवायचा आणि "य कुल्फ्यल्य" अशी मस्त साद घालायचा. आजोळी, आमच्या वाड्यात सगळे मिळून ४ कुटूंब गुण्या गोविंदानं रहायची. या कुल्फीवाल्याची साद ऐकली की चारही घरातून लहान लहान डोकी बाहेर यायची आणि मग तिथं आम्ही कुल्फी घ्यायचो. आज फ्लॅट सिस्टीम मध्ये असा कुल्फीवाल्याचा गाडा दिसतच नाही. जेंव्हा आज गाडीची घंटी वाजली तेंव्हा वाटलं एक कुल्फी विकत घेऊन रस्त्यावर उभं राहून खावी.

बरं हे झालं कुल्फीचं.. आंब्याचा रस??????? आहाहा! लोह्याला आम्ही जायचो.. माझे आजोबा गोटी आंबा आणायचे शेतावरून येताना.. मग आमची आई किंवा माझी मोठी काकू - आशा काकू, रस करायची... आम्ही सगळी नातवंड आणि समोर आजोबा अशी पंगत बसायची.. चला माझ्याशी शर्यत लावता का रस खाण्याची? आजोबा विचारायचे मग त्यांच्याशी शर्यत लावत आम्ही रस खायचो. सकाळचे आंबे वेगळे, संध्याकाळचे वेगळे असायचे.. सकाळी केलेला रस संध्याकाळी पुन्हा यायचा नाही! हा हा हा! संपलेला असायचा सकाळीच! दुपारपर्यंतही रहायचा नाही.. रात्र तर दुर राहीली!

आज लहानपणचा उन्हाळा आठवतोय. तन्मयच्या पहिल्या उन्हाळ्याच्या सुट्या सुरू होतील... आत्ता कुठे त्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्या.. मग ती धमाल, सगळ्या भेटी.. पण तो मोठा झाल्यावर त्याला आपल्या सारखं आठवेल हे सगळं?

13 February 2009

अलेपी.... God's Own Country!!!!

"या वर्षीची वार्षिक ट्रिप कुठे काढायची गं?" हे वाक्य पूर्ण व्हायचा अवकाश की मी पट्कन म्हणाले.. "केरळ".. यांच्या चेहर्‍यावर हास्याची लकेर उठली!... "७ फेब्रूवारीची तिकीटं बुक केलीयेत... तयार आहेस ना?" मी तयारीला लागले.. मिनीमम पॉसिबल लगेज आणि कॅमेरा, चार्जर, मेमरी चिप, आणि आय पॉड विथ स्पीकर्स आमची ट्रॅव्हल बॅग तयार झाली. ७ तारखेला कोचीनला पोहोंचलो.. तिथून अलेपीला जाणार होतो. साधारण २ तासांचा ड्राईव्ह आहे. अलेपी जसं जसं जवळ येत होतं तसा हवेतला बदल जाणवत होता. खुप फ्रेश वाटत होतं. केरळमधील सर्वात मोठं तळं वेंबनाडू. तिथं आम्ही बोट हाऊस बुक केलं होतं. वेंबनाडू लेकचे हे काही फोटोज तुमच्या साठी...









शांत वातावरण, माझ्या आवडता मावळतीचा सूर्य... मला मावळतीचा सूर्य आवडतो. प्रचंड आवडतो.. व.पू. काळेंचं एक वाक्य आठवतं "आजचा सूर्य मावळल्या शिवाय उद्याचा सूर्य येत नाही... कदाचित म्हणून ही मला मावळतीचा सूर्य आवडत असावा." जेंव्हा कधी मी मावळतीचा सूर्य बघते मला वपूंची कोटेशन्स आठवतात. असो!

बोट हाऊसवरचा आमचा अनुभव स्मरणीय आहे. बोटीवरचे सगळेच क्रू मेंबर्स चांगले होते. तिथली स्वच्छता, मदत, आदरातिथ्य आणि तत्परता ५ पैकी ५ गुण घेऊन गेली. आम्हाला सर्व्ह केलेलं हे अननस...



रात्री बोटीवर एकदम आजोळी गावी राहिल्या सारखं वाटत होतं. मोकळी आणि स्वच्छ हवा, गरम गरम जेवण, आणि जेवण झाल्यावर कित्येक वर्षांनी मारलेल्या निवांत मोकळ्या गप्पा... आहाहा.. बालपण पुन्हा मिळाल्यासारखं वाटत होतं. आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत लोह्याला जायचो... आजोबांसोबत जेवणं झाली की मग आम्ही असंच त्यांच्या बाजेजवळ बसून त्यांच्याशी खुप वेळ गप्पा मारायचो... बोट एका बेटाजवळ किनार्‍याला थांबलेली रात्री. जेवणं झाल्यावर बोटीवरचे लाईट्स बंद केले गेले. आम्ही दोघं खिडकी जवळ उभे होतो... "ए सोनल.... तुला जमीनीवरचे तारे बघायचे???" मी तिकडे बघितलं तर असंख्य काजवे चमकत होते. खरोखर जमिनीवर तारे आले असावेत असं वाटत होतं. रात्री एक काजवा आमच्या खोलीत आला होता. तन्मयनी पहाटे पहाटे पाहिला आणि उत्सुकतेनं तो ही म्हणाला, "पपा, रात्री आपल्या खोलीत एक स्टार आला होता. मी पाहिला त्याला...."

सकाळी ब्रेकफ़ास्ट झाल्यावर आम्ही नावेत एक चक्कर मारली. आमचे हे आणि पुत्ररत्न दोघांनी नाव वल्हवली. पोल्युशनचा गंधही नसलेलं अलेपी सोडायची वेळ जशी जशी जवळ येत होती तसं शाहरूख खानचं एक गाणं आठवत होतं....

ए वक्त रुक जा, थम जा ठहर जा...
वापस जरा दौड पिछे....

अलेपी सोडावसं वाटत नव्हतं.... कधीही न विसरता येणारा निसर्ग आणि अतिथी देवो भव या उक्तीला १००% सार्थ ठरवणारं आदरातिथ्य घेऊन आम्ही वेलिंग्डन बेटाकडे रवाना झालो..

03 February 2009

राहूल!!!

इंजिनियरिंगला नांदेडला नंबर लागला आणि मग मी ग्रुपच्या शोधात लागले. "अरे सोनल, आपण एकाच कॉलेजला आलोत!!!" माझी ऍडमिशन झाल्यावर पहिलं जर कोणी माझ्या कॉलेज मधून बोललं असेल तर तो राहूल!!! "आता मजा येईन... तू आणि मी कॉलेज मध्ये धिंगाणा घालू आणि सगळ्यांच्या नाकी नऊ आणू...." आणि काय काय राहूल बोलत होता आणि मी मोठ्ठा आ वासून त्याच्या कडे बघत होते. पपा माझे दोन्ही काका मी राहूल आम्ही सगळे बैठकीत बसलेलो. इतकं बिनधास्त बोलणं राहूललाच जमू जाणे... राहूल कंट्रोलच्या बाहेर बोलतोय असं लक्षात आल्यानं म्हणा किंवा अजून काही कारण असो... "चला आता पुस्तकं आणा आणि अभ्यासाला लागा... " असं म्हणत आदरणीय प्रभूतींनी ऍडमिशन बैठक आवरली... राहूल मित्रांसोबत बाहेर गेला आणि मी काकू सोबत आत घरात.

राहूल माझा चुलत भाऊ. आमच्या वयात जेमतेम ४ महिन्यांचं अंतर. एकदम बिनधास्त व्यक्तिमत्व... मित्रांमध्ये रमणारा, सगळ्यांसोबत असूनही आपलं वेगळेपण जपणारा. "ए काय हे? हे बरोबर नाही.." समोर कोणीही असो आपलं म्हणणं ठणकावून मांडणारा, एखादा मुद्दा कळला नाही तर बिनधास्त डाउट्स विचारणारा राहूल मनात कोणाविषयी ही आकस न ठेवणारा मुलगा... राहूलचा पुढे मेडिकलला नंबर लागला. नांदेडहून तो औरंगाबादला गेला. तो होता तोपर्यंत मला एक सॉलिड सपोर्ट होता. काका काकू जेंव्हा कधी औरंगाबादला जायचे त्यावेळी त्याला मी काही ना काही तरी पाठवायचे. कधी छोटं मोठं पत्र तर कधी एखादी हलकी फ़ुलकी गिफ़्ट. पुढे ते ही कमी झालं. पण त्याची पोच यायची.

MBBS झाल्यानंतर त्यानं न्युरोसर्जरीत स्पेशलायझेशन केलं आणि सध्या पेडीयाट्रिक सर्जरीत सुपर स्पेशलायझेशन करतोय. ५ - ६ महिन्यांपूर्वी राहूलची एक धावती भेट झालेली. तो तिरुपतीहून मणिपालला वापस जात होता त्यावेळी बेंगलोरला माझ्याकडे आला होता. अगदी तासभर होता पण खुप दिवसांनी भेटलो होतो. बरं वाटलं. आम्ही मणीपालला त्याच्याकडे गेलो होतो. दोन दिवस खुप मजेत गेले. जुन्या आठवणी, जुन्या गप्पा, जुने विषय... एक ग्राफिटी आठवली आणि १००% पटली... शिळोप्याच्या गप्पा केल्या की ताजंतवानं वाटतं! तशीच ताजीतवानी होऊन मी बेंगलोरला परतले.