20 June 2007

भाकरीची गोष्ट

इल्फर्ड नावाचं नगर होतं. तिथे आई वडील आणि त्यांचा लहान मुलगा असं तिघांचं सुखी कुटूंब होतं. वडील नोकरी करायचे आणि आई मुलाला सांभाळायची असा त्यांचा संसार सुखी चालला होता. वडीलांना भाकरी आवडत असे. वडीलांनी आईला तसं सांगितलं. म्हणाले,"आज भाकरी खावीशी वाटते. संध्याकाळी कर." आईने विचार केला... इतके दिवस आपली झाकली मुठ होती. आपल्याला भाकरी येत नाही हे आता वडीलांना कळणार... तिने संध्याकाळी करते म्हणून सांगितलं. तिने तिच्या आई कडे असताना एकदा भाकरी केली होती. पण त्याचा सराव नव्हता. त्या दिवशी खुप वेळ विचार केला. शेवटी मनाची हिम्मत करून तिने भाकरीचे पीठ मळण्यास घेतले. पण किती घ्यायचे? कणीकेचा अंदाज होता तिला. भाकरीच्या पीठाला तिला अंदाज लागत नव्हता. एवढेच आठवत होते की पोळीच्या उंड्या पेक्षा भाकरीचा उंडा मोठा असतो. पण किती मोठा?? तिने पिठ मळायला घेतले. आधी दुध कमी झाले. म्हणून तिने दुध वाढवले. पुन्हा पिठ मळले. या वेळी दुध जास्त झाले. तो पीठ पातळ झाले. तिने पुन्हा वाढवले. भाकरी करण्या योग्य जेंव्हा मळल्या गेले तो ८ १० भाकर्‍या होतील येवढे झाले. दुष्काळात तेरावा महिना अशी मनःस्थिती झाली. एक भाकरी करता येत नाही. ८ भाकर्‍या कधी कराव्या?

पहिल्या भाकरीचा उंडा घेतला. पोळी एवढा लहान घेतला. भाकरी थापावयास घेतली. मनात विचार केला पातळ भाकरी आवडेल त्यांना. थापताना भाकरी उलत होती. भाकरी मोडून मोठा उंडा करावयास घेतला. उंडा जास्तच मोठा झाला. भाकरी थापता थापता पोळपाटा बाहेर जायला लागली. पुन्हा मोडून थोडा लहान उंडा घेतला. भाकरी कडेला थोडी थोडी उलत होती. पोळपाटावर थापलेली भाकरी हातावर घेताना मोडली. पुन्हा या दिव्यातून जावे लागणार या विचाराने आई बिचारी हैराण झाली. पुन्हा उसनी उमेद आणून भाकरी थापली. आणि पोळपाटच उचलून तिने भाकरी तव्यावर टाकली. वरून पाणी फिरवायचे लक्षात राहिले नाही. खालचा भाग पुर्ण शिजल्यावर मग पोळीसारखी उलटावी हा विचार केला... आणि इथेच फसली. वरची भाकरी कोरडी झाली. हा भाग तव्याला लागताच सगळी भाकरी भूकंपात तडे गेलेल्या जमीनीसारखी दिसायला लागली. एका भाकरीसाठी जवळ जवळ २० २५ मिनिटं अथक प्रयत्न केल्या नंतर ही भाकरी तयार झाली होती. "चला, झाली का भाकरी?! म्हणत वडिल येताच आईची घाबरगुंडी उडाली.. " हो हो १ - २ मिनिटं हं!!" असं म्हणत आई पुढच्या भाकरीला लागली. पुढली भाकरी १ - २ मिनिटांत करायची होती. यावेळी मात्र बरोबर उंडा घेऊन हलक्या हाताने थापत कशी बशी भाकरी तयार केली. तव्यावर टाकण्याची कसरत केली. वरून पाणी व्यवस्थित लावलं... आणि खालची भाकरी शिजायच्या आधीच उलटली... हाय दैवा!!! भाकरीचे मधून दोन तुकडे झाले.... आता वडीलांना काय खायला द्यावं या विवंचनेत होती आई!!


आणि तिच्या मदतीला फोन धावून आला... कोणाचा तरी फोन आला. वडील फोनवर बोलण्यात गुंगले. आईला १० मिनिटं मिळाली होती. तिने डोकं शांत ठेवून भाकरी थापली. तेवढ्याच शांतपणे हातावर काढून घेतली. आणि तव्यावर टाकली. वरून पाणी लावलं. खालची भाकरी शिजत आली की उलटली. वरची भाकरी चांगली झाली होती आता. खालची ही व्यवस्थित झाली होती. पण भाकरी फुगली नाही.

आईला भाकरी जमली होती. फुगली नाही तरी न मोडता शिजली होती. पहिल्या न जमलेल्या भाकर्‍या तशाच ठेऊन दिल्या. रात्रीची जेवणं झाली. रात्री तशाच ठेउन दिलेल्या भाकर्‍या सकाळी पक्षांना टाकल्या. त्यांनीही आनंदाने (?) खाल्या.

इति इल्फ़र्ड नगरीची भाकरीची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण.
जशी ही भाकरी आईच्या मुलाला, मुलाच्या वडिलांना व इल्फ़र्डच्या पक्षांना आवडली तशी तुम्हा आम्हा सर्वांनाही आवडो.

:-)