07 March 2007

कुठून तरी येतं फुलपाखरू
कुठे उडून जातं
चिमटीमध्ये उरतो रंग तेंव्हा
रंगात पाखरू दिसतं
भिरभिरणारं कोवळं वय
हळूच तिथे फसतं
ते वयच असं असतं
कॉलेजमधून परत येताना आशा भोसलेंनी गायलेल्या 'आज कुणीतरी यावे' या गीताचे बोल कानावर पडले. मराठी गाणी कधीच न सोडणारी मी हे गाणं ड्रॉप करणं निव्वळ अशक्य होतं. मनात ओळी येत गेल्या...


आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे

खुप वाढलेल्या उन्हानं तापलेली सुकलेली धरा... धरती... झाडावरची पानं ही सुकून गळतात. झाड काटक्या टाकतं. पक्षी उन्हं उतरल्याशिवाय बाहेर पडत नाहीत..... आणि आपल्याला तर नजरही बाहेर काढता येत नाही. आणि अशात एक दिवस असा येतो की आपल्यालाच प्रसन्न वाटतं. हवेत किंचीत गारवा येतो.

जशी अचानक या धरणीवर
बरसत आली वळवाची सर,
तसे तयाने यावे

आणि इतके दिवस स्तब्ध असणारा वारा देखिल हळू हळू गारवा पसरायला मदत करतो. हवेची थंड झुळूक मनाला एक दिलासा देऊन जाते. कुठं तरी वळीवाचा पाऊस पडलेला असतो. तापलेली धरणी जराशी थंड होते. मनात येतं जशी ही वळीवाची सर आली तसंच कोणीतरी यावं. नवीन मित्र, नवीन मैत्रिण कोणीतरी मिळावं. एक सखी एक सोबती अशी मिळावी

विचारल्याविण हेतू कळावा
त्याचा माझा स्नेह जुळावा, हाती हात धरावे

तो असा असावा ज्यानं मला समजून घ्यावं... माझं मन वाचावं. या क्षणाला माझ्या मनात जे येईल ते समजून उमजून घ्यावं. अनेक वेळा असं होतं.... मनातल्या भावना शब्दात मांडता येत नाहीत. त्या व्यक्त ही करता येत नाहीत. आमची मैत्री अशी व्हावी की मी काही ही न बोलता न सांगता माझं मन कळावं. माझ्या मनातलं गुपित चेहर्‍यावरून ओळखून घ्यावं.... आमच्या मैत्रीची वीण न सांगता घट्ट गुंफली जावी......


सोडोनिया घर नाती गोती
निघून जावे तया संगती, कुठे ते ही ना ठावे


मनं इतकी जुळून यावीत की घर, नाती यांचाही विसर पडावा... अत्यंत विश्वासानं त्याच्या सोबत डोळे बंद करून निघून जावं. कुठं चाललो, कसं चाललो याची तमा नसावी..... अख्ख आयुष्य त्याच्या नावे करून टाकावं.....




-------------------------------
गीतकार - ग दि माडगुळकर
गायिका - आशा भोसले
संगीतकार - सुधीर फडके