"या वर्षीची वार्षिक ट्रिप कुठे काढायची गं?" हे वाक्य पूर्ण व्हायचा अवकाश की मी पट्कन म्हणाले.. "केरळ".. यांच्या चेहर्यावर हास्याची लकेर उठली!... "७ फेब्रूवारीची तिकीटं बुक केलीयेत... तयार आहेस ना?" मी तयारीला लागले.. मिनीमम पॉसिबल लगेज आणि कॅमेरा, चार्जर, मेमरी चिप, आणि आय पॉड विथ स्पीकर्स आमची ट्रॅव्हल बॅग तयार झाली. ७ तारखेला कोचीनला पोहोंचलो.. तिथून अलेपीला जाणार होतो. साधारण २ तासांचा ड्राईव्ह आहे. अलेपी जसं जसं जवळ येत होतं तसा हवेतला बदल जाणवत होता. खुप फ्रेश वाटत होतं. केरळमधील सर्वात मोठं तळं वेंबनाडू. तिथं आम्ही बोट हाऊस बुक केलं होतं. वेंबनाडू लेकचे हे काही फोटोज तुमच्या साठी...
शांत वातावरण, माझ्या आवडता मावळतीचा सूर्य... मला मावळतीचा सूर्य आवडतो. प्रचंड आवडतो.. व.पू. काळेंचं एक वाक्य आठवतं "आजचा सूर्य मावळल्या शिवाय उद्याचा सूर्य येत नाही... कदाचित म्हणून ही मला मावळतीचा सूर्य आवडत असावा." जेंव्हा कधी मी मावळतीचा सूर्य बघते मला वपूंची कोटेशन्स आठवतात. असो!
बोट हाऊसवरचा आमचा अनुभव स्मरणीय आहे. बोटीवरचे सगळेच क्रू मेंबर्स चांगले होते. तिथली स्वच्छता, मदत, आदरातिथ्य आणि तत्परता ५ पैकी ५ गुण घेऊन गेली. आम्हाला सर्व्ह केलेलं हे अननस...
रात्री बोटीवर एकदम आजोळी गावी राहिल्या सारखं वाटत होतं. मोकळी आणि स्वच्छ हवा, गरम गरम जेवण, आणि जेवण झाल्यावर कित्येक वर्षांनी मारलेल्या निवांत मोकळ्या गप्पा... आहाहा.. बालपण पुन्हा मिळाल्यासारखं वाटत होतं. आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत लोह्याला जायचो... आजोबांसोबत जेवणं झाली की मग आम्ही असंच त्यांच्या बाजेजवळ बसून त्यांच्याशी खुप वेळ गप्पा मारायचो... बोट एका बेटाजवळ किनार्याला थांबलेली रात्री. जेवणं झाल्यावर बोटीवरचे लाईट्स बंद केले गेले. आम्ही दोघं खिडकी जवळ उभे होतो... "ए सोनल.... तुला जमीनीवरचे तारे बघायचे???" मी तिकडे बघितलं तर असंख्य काजवे चमकत होते. खरोखर जमिनीवर तारे आले असावेत असं वाटत होतं. रात्री एक काजवा आमच्या खोलीत आला होता. तन्मयनी पहाटे पहाटे पाहिला आणि उत्सुकतेनं तो ही म्हणाला, "पपा, रात्री आपल्या खोलीत एक स्टार आला होता. मी पाहिला त्याला...."
सकाळी ब्रेकफ़ास्ट झाल्यावर आम्ही नावेत एक चक्कर मारली. आमचे हे आणि पुत्ररत्न दोघांनी नाव वल्हवली. पोल्युशनचा गंधही नसलेलं अलेपी सोडायची वेळ जशी जशी जवळ येत होती तसं शाहरूख खानचं एक गाणं आठवत होतं....
ए वक्त रुक जा, थम जा ठहर जा...
वापस जरा दौड पिछे....
अलेपी सोडावसं वाटत नव्हतं.... कधीही न विसरता येणारा निसर्ग आणि अतिथी देवो भव या उक्तीला १००% सार्थ ठरवणारं आदरातिथ्य घेऊन आम्ही वेलिंग्डन बेटाकडे रवाना झालो..
13 February 2009
Subscribe to:
Posts (Atom)