आज संध्याकाळी हवेत थोडा गारवा होता. ती उन्हाळा संपत आल्याची चाहूल होती... कुलरची थंड हवा संपणार, गारेगार कुल्फी आणि आईसक्रिम संपणार, पन्हं आणि रसना संपणार.... दही, आमरस संपणार, छान छान सरबतं संपणार.. थंडाई, ज्युसेस आणि कैरीचे मस्त प्रकार संपणार....
एकीकडे उन पडलं खुप म्हणून आरडा ओरडा करायचा आणि मग वर्षभरानंतर आलेल्या पहिल्या पावसानी गारवा आणला की हाच उन्हाळा संपणार या साठी हु्रहुर करायची.... आज काहिसं वेगळं वाटलं,
पाऊस पडून गेल्यावर, मन पागोळ्यांगत झाले…
क्षितीजाच्या वाटेवरती पाण्यावर रांगत गेले....
पाऊस हवाहवासा ही वाटला आणि उन्हाळा संपूच नये असं ही वाटलं. येणारा पाऊस काय काय घेऊन येणार??? थोडी तारांबळ, थोडा गारवा, जुन्या रफी, लता, किशोर, आशा या दिग्गजांच्या कॅसेट्स आणि सीडीज पुन्हा बाहेर येणार... गरम वाफाळलेल्या कॉफी आणि चहाचे मोठे मग्ज बाहेर निघणार, आईच्या कॉटनच्या साड्यांची केलेली रजई बाहेर येणार, जुन्या आठवणी, जुन्या मित्र-मैत्रिणींचे ग्रुप्स फ्रेश चेहर्यांनी भेटणार..... गाडीवर जाताना उन्हानं होणारी मनाची काहिली थांबून मिलिंद ईंगळेच्या गारवा मधील ओळी आठवणार....
आकाश सारे माळून तारे
आता रुपेरी झालेत वारे
अंगभर थर थर थर नाचवा नवा नवा.......
पाऊस नक्की पाहिजे!! उष्णतेनं तापलेली धरा थंड जलधारांनी तृप्त करण्यासाठी.... मरगळलेल्या सृष्टीला नवचैतन्य देण्यासाठी..... नवीन पालवी, नवी फुलं नवी फळं, नव्या इच्छा, नवी स्वप्नं, नवा दिवस, नवा पाऊस आणि तोच आपला हवा हवासा ऋतू... आपला पावसाळा..... आकाश पाण्यानं भरून जईन, टप टप थेंब वाजतील.... पावसात भिजण्यासाठी, ते थेंब झेलण्यासाठी मन पुन्हा पुन्हा आतुर होईन...
ये पावसा ये.... लवकर ये.... Welcome Rain!!!
22 May 2009
Subscribe to:
Posts (Atom)