26 February 2009

बालपणीचा उन्हाळा सुखाचा

आज दुपारी कधी नाही ते मी बाल्कनीचा पडदा उघडला आणि डोळे बाहेरचं उन बघून गच्च बंद झाले. अजून फेब्रूवारीपण संपला नाहीये आणि उन जाणवायला लागलयं. टिंग टिंग टिंग गाडीची घंटीपण अगदी मोक्याच्या क्षणी वाजली. माझं लहानपण आठवलं. आम्ही नांदेडला होळीवर जायचो. ते माझं आजोळ.. खाला नावाची एक बाई तिथं आमच्या दाराच्या बाजूलाच दुकान लावून बसलेली असायची. तिच्या टोपलीत त्या त्या ऋतूची फळं नक्की असायची. आणि बिनधास्त डोळे मिटून कुठलं ही फळ उचला तिच्या टोपलीत खराब फळं नसायची. तिच्यापासून ५ १० फुटांवर कुल्फीवाला उभा असायचा. जाड, ओला, लाल रंगाचा कपडा झाकलेली त्याची कुल्फीची कुलींग सिस्टीम एकदम जबरदस्त होती. तो आला तिथे की मग त्याच्या ढकलगाडीची घंटी वाजवायचा आणि "य कुल्फ्यल्य" अशी मस्त साद घालायचा. आजोळी, आमच्या वाड्यात सगळे मिळून ४ कुटूंब गुण्या गोविंदानं रहायची. या कुल्फीवाल्याची साद ऐकली की चारही घरातून लहान लहान डोकी बाहेर यायची आणि मग तिथं आम्ही कुल्फी घ्यायचो. आज फ्लॅट सिस्टीम मध्ये असा कुल्फीवाल्याचा गाडा दिसतच नाही. जेंव्हा आज गाडीची घंटी वाजली तेंव्हा वाटलं एक कुल्फी विकत घेऊन रस्त्यावर उभं राहून खावी.

बरं हे झालं कुल्फीचं.. आंब्याचा रस??????? आहाहा! लोह्याला आम्ही जायचो.. माझे आजोबा गोटी आंबा आणायचे शेतावरून येताना.. मग आमची आई किंवा माझी मोठी काकू - आशा काकू, रस करायची... आम्ही सगळी नातवंड आणि समोर आजोबा अशी पंगत बसायची.. चला माझ्याशी शर्यत लावता का रस खाण्याची? आजोबा विचारायचे मग त्यांच्याशी शर्यत लावत आम्ही रस खायचो. सकाळचे आंबे वेगळे, संध्याकाळचे वेगळे असायचे.. सकाळी केलेला रस संध्याकाळी पुन्हा यायचा नाही! हा हा हा! संपलेला असायचा सकाळीच! दुपारपर्यंतही रहायचा नाही.. रात्र तर दुर राहीली!

आज लहानपणचा उन्हाळा आठवतोय. तन्मयच्या पहिल्या उन्हाळ्याच्या सुट्या सुरू होतील... आत्ता कुठे त्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्या.. मग ती धमाल, सगळ्या भेटी.. पण तो मोठा झाल्यावर त्याला आपल्या सारखं आठवेल हे सगळं?