तन्मयची परीक्षा संपली. आणि बघता बघता रिझल्ट पण लागला. रिझल्ट चांगला आला. रिझल्ट दिवशी सगळ्याची आठवण आली. पण सर्व जणांमध्ये प्रकर्षानं कोणाची आठवण आली असावी तर ते म्हणजे स्व. हेमंतकाका धानोरकर. मला आठवतय आम्ही शाळेत होतो. औरंगाबादला नुकतचं शिफ़्ट झालेलो. नांदेडला असताना रिझल्ट दिवशी माझे आजोबा, मोठेबाबा यायचे. आणि विचारायचे "कितवा नंबर आला?". दरवर्षी प्रमाणे मी उत्तर द्यायची "दुसरा". "बरं, मग पहिल्या नंबरच्या बक्षीसात आणि तुझ्या बक्षीसात कितीचा फरक आहे?" मी सांगायची जो काय फरक असेन तो.. मग आजोबा तो फरक त्यांच्याकडून बक्षीस म्हणून भरून काढायचे. असो! औरंगाबादला शिफ़्ट झाल्यावर मग रिझल्ट दिवशी "कोण येणार गं?" असं मी आईशी मोठेबाबांची आठवण आली म्हणून बोलत होते. आमचं बोलणं चालूच होतं तो कोणी तरी आलं म्हणून आईनं दार उघडलं. ६ फुट उंच, सडसडीत, आणि फ्रेश पर्सनालिटीच्या व्यक्तीला मी पाहिलं. "अरे! या नं हेमंत!" असं म्हणत आईनं त्यांना आत घेतलं. त्याचं बोलणं झाल्यावर मोर्चा माझ्याकडे वळला. "मग? काय रिझल्ट लागला?" आणि आश्चर्य म्हणजे मी वर्गात पहिली होते. मग मी तसं सांगितल्यावर मला म्हणे," तुला काय बक्षीस देऊ?" मी चाटच पडले.. आता यांना काय सांगू म्हणून? मग काकाच म्हणाले,"चल आईसक्रीम देतो तुला." मी आणि माझी बहीण आम्हा दोघींना बाईकवर बसवून काकांनी आईसक्रिमच्या दुकानात नेलं आणि टूटीफ्रूटी आइसक्रिमची एक अख्खी ब्रिक गिफ़्ट दिली. आणि जोवर आम्ही औरंगाबादला होतो ती आठवर्ष ती आइसक्रिमची ब्रिक दरवर्षी न चुकता आम्हाला रिझल्ट्चं बक्षीस म्हणून मिळाली....
माझ्या लग्नाच्या आसपास हेमंतकाका ऍक्सिडेंटमध्ये वारले. तन्मयचा यावर्षी पहिला रिझल्ट होता. हेमंतकाका... तुमची आठवण आली. आम्ही दिलं त्याला आईसक्रिम... त्याला तसाच आनंद झाला होता जसा आम्हाला व्हायचा... आणि हो! जसं तुम्हाला हसू यायचं ना.. तसंच हसू आम्हाला ही आलं... तुम्ही असायला हवे होता त्याचं कौतुक करण्यासाठी...
Thanks kaka for ur icecreams!!! I missed them this time.... for tanmay...
29 March 2009
Subscribe to:
Posts (Atom)