"हो गं.. बघ ना अजून ४ महिने आहेत तन्मयच्या शाळेला...!" मी आईला सांगत होते. आणि आई म्हणत होती, " अगं बघता बघता शाळा सुरू होईल आणि मग तुला दुपारी थोडा निवांत वेळ मिळेल." ४ महिने संपले. तन्मयची शाळा सुरू झाली. खाली मान घालून डेस्कवर चेहरा हातानी झाकून बसला. आलेला हुंदका तसाच दाबून धरून बसला. जेमतेम साडेतीन वर्षाच्या ह्या मुलाला इतका समजूतदारपणा कधी आला? त्याला शाळेत सोडून बाय करताना किती तरी वेळा मी त्याच्याकडे पहायचं टाळते. पहिल्या दिवशी त्याला सोडून जाताना मलाच कसं तरी होत होतं. तो रडला पण शाळा सुटल्यावर घ्यायला गेलो तेंव्हा निवांत बाहेर आला. दुसर्या दिवशी "तू मला घ्यायला येशील ना गं?" त्याच्या निरागस प्रश्नावर मला त्याला शाळेत सोडावसं वाटलंच नाही. दोन्ही हातानी धरून मला म्हणाला, "तू जाऊ नको." समजून सांगून तो गेला. शाळा सुटल्यावर पहिला प्रश्न... "आई? तू कुठे लपून बसली होती?" मी सांगीतलं "या बॉक्स मध्ये बसले होते." मग त्या बॉक्सची कथा कहाणी सांगत आम्ही घरी आलो. रोज एका नवीन ठिकाणी लपून बसले होते असं सांगावं लागतयं.
आज शाळा सुरू होऊन एक आठवडा झाला. तन्मय शाळेत ऍडजस्ट झालाय. तो गेल्यावर दोन तास घरात एकटं कसं तरी वाटतं. त्याच्या खोड्या आठवतात. विचार करते तेंव्हा वाटतं त्याला खॊड्या केल्यावर जे रागवायचे ते चूक होतं की बरोबर? माझ्या रागावण्यानं किती वेळा तो हिरमुसला झालाय? तो जसा शाळेत जायला लागलाय तसं माझं त्याला रागावणं कमी झालयं. मुळात तोच समजदार झालाय. रिझनिंग आणि स्वतःची सेफ़्टी त्याची त्यालाच कळायला लागलीय. "आम्ही आज हे केलं. मी असं केलं. माझी पेंटींग पाहिलसं? थांब तुला माझं पेंटींग दाखवतो....." किती तरी गोष्टी सांगायच्या असतात त्याला. वाचायला शिकतोय. शाळेचं दिलेलं पुस्तक ४ - ५ वेळा वाचून झालं त्याचं. पुस्तकातून नवीन स्पेलिंग्स, नवी वाक्यं शिकला.
तो मोठा होतोय! आपलं आपलं कपडे घालणं, सॉक्स शुज घालणं, बॅग घेणं भरणं, जॅकेट चढवणं... तो स्वावलंबी होतोय! पण अजून त्याला मी लागते... "आई कुठे गेली?" तो आई म्हणून हाक मारतो तेंव्हा त्याला अजून ही मी तसंच जवळ घेतलेलं आवडतं. "मी आता मोठा झालोय ना.. म्हणून तुला मला उचलता येत नाही.." एकदम मोठ्या माणसासारखं म्हटलेलं हे वाक्य ऐकण्यासाठी मी त्याला सारखी उचलून घेते.
मोठा हो बेटू! खुप मोठा हो!
तुझी
आई
24 September 2007
Subscribe to:
Posts (Atom)