16 December 2010

कधी तरी येशील का?

बर्‍याच दिवसांनी निवांत खिडकीत बसले होते. हलणारी पानं बघत नजर शून्यात कधी स्थिरावली कळलंच नाही. उज्ज्वलाची आठवण आली. १० वर्ष झाली तिला जाऊन. मानदाचा फोन आठवला. आईनं "काय झालं गं?" असं विचारलेलं आठवलं. कधी वाटत उजू जायला नको होती. ती त्या दिवशी बाहेर पडायलाच नको होती. कधी मी स्वतःशीच भांडते की मी का नव्हते तिच्या सोबत. कधी वाटतं की असं का नेलं असावं तिला? ती चांगली होती. सरळ साधी नाकापुढे चालणारी. 'भातुकलीच्या खेळांमधली' गाणं आवडणारी. ती गेली त्यानंतर मी हे गाणं गुणगुणनं सोडून दिलं. तीची आठवण येते मग. हसणं, सोबत येणं...

भगवद्गीता सांगते की पुनर्जन्म आहे. मग उजू पुन्हा आली असेन का? जन्म घेऊन कधी माझ्या समोर पुन्हा आली तर जुना ऋणानुबंध जुळेल का? आम्ही ओळखू का? माझी मैत्रिण म्हणून ती पुन्हा येईल माझ्या आयुष्यात??? ये गं परत, खरच ये. तुझी आठवण येते.

उद्या नांदेडला जायचय. जिथे तिचा ऎक्सिडेंट झाला त्या रस्त्यावरून जाईन मी. खुप वेगवेगळ्या feelings मनात येत आहेत. एकटं वाटतय..