03 May 2009

कौतुक

आजच्या बहुसंख्य जणांना विचारलं की "आपला राष्ट्रीय खेळ कोणता हो?" आणि चुकून हॉकी असं बरोबर उत्तर दिलं तर मला, त्याला / तिला सांगावसं वाटेल की "बाबा, आता कोणीतरी क्रांती करा, संप, आंदोलनं करा आणि आपला राष्ट्रीय खेळ हॉकी बदलून क्रिकेट करा." अरे किती तो क्रिकेटचा उदो उदो! जेवढे स्टार्स पुढे आलेत ना क्रिकेटच्या टिम्स साठी त्यातल्या एकानं तरी हॉकी प्रिमियर लिग साठी टिम स्पॉन्सर केली का? किमान त्यांना माहितिये का की आपल्या देशाचा खेळ हॉकी आहे म्हणून?


भारतात जेवढी दैना हॉकीची झालीये ना तेवढाच उदो उदो क्रिकेट्चा झालाय. एकट्या क्रिकेटलाच दोष नाही देत मी. तीच गत टेनिस, बॅडमिंटनची पण आहे. सानिया मिर्झा, महेश भुपती, लिऍण्डर पेस असे दोघं तिघं गिने चुने टेनिस प्लेअर्स... त्यांचा सत्कार आणि काय काय होतं पण अझलान शाह हॉकी स्पर्धेत भारतानं मलेशियावर ३-१ अशी मात करत तब्बल १३ वर्षानी या करंडकावर आपलं नाव कोरलं!!! आपलं नाव..... भारतीय संघाचं नाव... किती अभिमानाची ही गोष्ट किती जणांनी साजरी केली? २००३ साली भारतीय क्रिकेट संघ विश्वकप स्पर्धेच्या पुढच्या फेरीत पोहोंचावा म्हणून देशभर जप तप आणि यज्ञ झाले होते! अझलान शाह करंडक खेळण्यासाठी भारताचा संघ कधी गेला हे कोणाला कळलं ही नाही. ना त्यांना शुभेच्छा द्या असं कोणत्या चॅनलवाल्यानी सांगितलं. आयडिया फोन सांगतो क्रिकेटर्सशी बोला म्हणून.... हॉकी प्लेअर्स कुठे गेलेत हो आपले???? १९९५ नंतर २००५ साली इंग्लंडने अशेस ही क्रिकेटची स्पर्धा जिंकली तर इंग्लंडच्या राणीनं राजवाड्यात पार्टी दिली होती. त्या टिमची ओपन बस मधून फेरी काढली होती. आणि महिना दिड महिना कौतुक चाललं होतं. आपण १३ वर्षांनी अझलान शाह करंडक जिंकला तर त्याचं फारसं नाव ही दिसलं नाही आपल्या चॅनल्सवर. आपल्या खेळाच्या किंवा आपल्या स्वतःच्या काही गोष्टीं बाबत आपण स्वतः इतके उदासीन का आहोत? आपण आपल्या खेळाचं, खेळाडूंच, कौतुक केलं नाही तर कोण करणार???