31 January 2013

स्वधर्म यज्ञ

स्वधर्म म्हणजे स्वतःचे कर्तव्य, आपले कर्म, आपल्याला नेमून दिलेले एखादे कार्य. स्वधर्म हा जन्माबरोबरच ठरवून येतो. आई वडिलांची सेवा करणे, त्यांची काळजी घेणे, काय हवे नको ते पाहणे हा प्रत्येक मुला-मुलींचा स्वधर्म! आई बाबा रागावतात, मारतात म्हणून मला ते आवडत नाहीत, मग मी त्यांची काळजी घेणार नाही हा स्वधर्म नाही. निष्काम मनाने आणि त्यांच्यावर कुठलाही दबाव न टाकता सेवा करणे हा स्वधर्म आणि तो मनात कुठली हि हाव न ठेवता पाळणे हा स्वधर्म यज्ञ!.

प्रजापतीने यज्ञासह प्रजा व सृष्टीची निर्मिती केली. इच्छित देवाला प्राप्त करून त्यांच्याकडून इच्छित फल प्राप्ती करून घेण्यासाठी यज्ञ केला जातो. 'यज्' म्हणजे दान! 'इदं न मम' या मंत्रोच्चारासह तूप तांदूळ समिधा आदी यज्ञात अर्पण केल्या जातात. हे माझे नाही, हे देवाचे. हे मी देवाला अर्पण करतो हि निष्काम भावना यज्ञात अपेक्षित असते. कर्मफलाची आसक्ती आणि कर्तृत्वाचा अहंकार मनात ठेवून केलेल्या यज्ञाला बंधन प्राप्त होते. यामुळे देवाला संतुष्ट न करता आपण भोग घेतो आणि हे पाप आहे. म्हणून यज्ञार्थ केलेली कर्मे बंधनकारक होत नाहीत. यज्ञार्थ कर्म करणे म्हणजे कर्मफलाची आसक्ती आणि कर्मफलाचा अहंकार टाकून कर्म करणे. कशाची ही अशा अभिलाषा मनात न ठेवता कर्म करणे. निष्काम मनाने कुठली ही अपेक्षा न ठेवता केलेले स्वधर्माचे पालन यज्ञापेक्षा कमी नाही. 

अनेकवेळा विहित कर्म हे आवडो किंवा न आवडो, ते कर्म करणे आवश्यक आहे किंवा करजॆचे आहे म्हणून करावे लागते. काही वेळा मन व बुद्धी विरुद्ध कर्म करणे भाग पडते. अशावेळी भोगाची आसक्ती मन व बुद्धी काबीज करते. तेंव्हा मन व बुद्धीवर नियंत्रण ठेवून विहित कर्म करावे. असे कर्माचे आचरण हे निष्कर्मतेचे साधन आहे. तुरुंगातील कैद्यांच्या हाता पायातील बेड्या साफ करणे 'आवडत नाही' हा मनाचा कौल घेवून बुद्धीने 'साफ करू नको' हा निर्णय घेतला तर ते धर्माचे आचरण होणार नाही. मग मनाविरुद्ध का होईना काम करावेच लागणार आहे ना मग ते आनंदाने करायचे. कर्म आनंदाने केल्यास कामाची मेहनत कमी लागते आणि मग कमी श्रमात कार्य जास्त चांगले घडते. आणि अर्थातच स्वधर्माचा हा यज्ञ आनंदात पार पडतो.

 स्वधर्म निश्चित झाला  की काही वेळा वरकरणी वैद दिसणार्या गोष्टी ही त्यात सामील होतात. आता एखाद्या गोष्टीसाठी कोणाचा छळ करणे, त्यांना मारणे ह्या गोष्टी वाईटच, परंतू गुन्हेगारांकडून माहिती मिळविण्यासाठी पोलिसांना हे कार्य नियमित पार पाडावेच लागते... माहीती नाही दिली तर चालेल परंतू त्याला लागेल म्हणून मी चोराला मारणार नाही असे म्हणून काम सोडून चालत नाही. तो पोलिसांचा स्वधर्म नाही. येन केन प्रकारेण साम दाम दंड भेद वापरून माहिती मिळविणे अपेक्षित असते. तोच त्यांचा स्वधर्म. न्याय बुद्धी ठेवून केलेले स्वधर्म हे दोषास्पद नव्हे. एका विशिष्ठ व्यक्तीच्या अथवा समाजाच्या हितावर दृष्टी ठेवून केलेले कार्य हे स्वार्थ निरपेक्ष असते. असे कर्म यज्ञ होय!. हित कधीही दुष्ट किंवा अपवित्र नसते. 

 जीवन जगण्यासाठी केलेले उदरभरण हा  ही एक यज्ञ आहे. जनसामान्यांच्या हितासाठी निर्माण केलेला ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ  ही एक यज्ञच होय. मग या यज्ञात केलेले कार्य हे लहान की मोठे, मर्यादित  की अमर्यादित हा प्रश्न महत्वाचा राहत नाही. 

 ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण  केली ती निर्वाहाच्या साधानासह. गर्भात असताना आईच्या रक्तावर पोसले जाणारे बाळ स्वतः मध्ये सामर्थ्य निर्माण झाल्यावरच जन्मास येते. ईश्वराने चोंच निर्माण करण्याआधी चारा तयार केला. तयार केलेल्या सृष्टीची स्थिरता टिकावी, प्रगती व्हावी या साठी स्थिती, प्रगती उन्नतीचे साधन सृष्टीसह निर्माण झाले... त्याचे नाव यज्ञ. कशाच्या आधाराने आश्रयाने किंवा साधनाने जगावे हा प्रश्न केवळ मानवाला पडतो. पशु पक्षी कीटक यांचे जीवन निसर्ग नियमाने काटेकोर बनले आहे. त्यांना बाहेरच्या मार्गदर्शकाची गरज भासत नाही. पोट भरणे आणि संतती निर्माण करणे या शिवाय इतर कर्म त्यांच्या जीवनात नसते. त्यांच्यात कमालीचा एकोपा असतो. मनुष्याचे याच्या उलट आहे. त्याला बुद्धी असूनही मार्गदर्शकाची आणि मार्गदर्शनाची गरज भासते. यासाठी ब्रह्मदेवाने सांगितले आहे  की स्वधर्माची योजना यासाठीच केली आहे. आपल्या वर्ण, जात, कूलाप्रमाणे स्वधर्माची सेवा करा. वर्णाश्रम धर्मानुसार जे कार्य कराल तोच स्वधर्म आहे. तो आनंदाने केल्यास सहजपणे इच्छा पूर्ण होतील. कारण स्वधर्म हा महान यज्ञ आहे.  

 भगवंत म्हणतात देवाच्या प्रसादाने मिळालेली संपत्ती देवाला न देता जो भोगतो तो चोर होय. स्वधार्माचरणाने भगवंताला संतुष्ट करून प्रसन्न करून घेणे हा स्वधर्म यज्ञ आहे. ब्रह्मदेवाच्या विधानानुसार आपापल्या कर्तव्य कर्माची सामग्री प्रत्येकाला पुरेशी असते. मग कर्तव्य आणि स्वधर्म पालन योग्य यज्ञ सफलतेने पूर्ण करण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची आपली असते. स्वधर्माचरण करणाऱ्यांना ह्या यज्ञासाठी लागणारी समिधा कधीच कमी पडत नाही. सामर्थ्य वाढून निर्वाहाच्या आवश्यक सास्तूंची त्यांना प्राप्ती होते. मनातल्या इच्छा कल्पवृक्षाने पूर्ण केल्याप्रमाणे पूर्ण होतात. घर सुख समृद्धीने भरून राहते. त्यामुळे यज्ञ करायचाच असेन तर स्वधर्म पालनाचा सोप्पा यज्ञ करावा.


 स्वधर्माची पकड  सुटत गेल्यास विषयासक्ती वाढते, शरीरातील चैतन्य मावळते भोग असून भोगता येत नाहीत, सुख दुरावते आणि समाधान मावळते. स्वधर्म पालनाने संयमाची सवय लागते स्वार्थाला आळा बसतो आणि मर्यादेची जाणीव राहते.

 स्वधर्म हा आपला स्वतःचा असतो दुसऱ्याचा चांगला म्हणून तो माझा आणि असा विचार करून त्याचा स्वीकार करणे हे चूक आणि अयोग्य! हे म्हणजे डॉक्टरने जसे सीमा रेषेवर जाउन सैनिकांची बंदूक घेऊन चालवणे चुक तसेच सैनिकाने दवाखान्यात येउन उठ सुठ इंजेक्शन देण्यासारखे चूक आहे. हे अतिशय भयावह आहे. तो स्वधर्म नाही. म्हणूनच भगवान म्हणतात कि स्वधर्म पालन करताना आलेला मृत्यू श्रेष्ठ परंतु परधर्माचे पालन भयावह आहे.

 स्वधर्माचे पालन हे मखमलीच्या गाडीवरून चालण्यासाखे नाही! ते एक अवघड गिर्यारोहण आहे. त्याचा मार्ग कष्टप्रद असला तरी शेवटी मोक्ष मिळतो. याच्या पालनाने मिळणारे यश हे दैदिप्यमान आणि अलौकिक असते. स्वधर्म पालानाशिवाय मोक्ष नाही. म्हणजे भगवंताची प्राप्ती नाही. स्वधर्म यज्ञाचे बरोबर पालन करणारा भगवंताची प्राप्ती करतो आणि मोक्ष मिळवतो.....