26 September 2009

छोटीशी गोष्ट!!

अनेकदा गोष्ट तशी फुटकळच असते.. म्हणजे अनेकांच्या लेखी ती कदाचित दखल घेण्यासारखी नसते ही. मी जवळ जवळ अडीच वर्षे झाली ब्लॉगिंग करते आहे. कधी नियमित कधी काही ना काही कारणानं होणारा विलंब... परंतू ब्लॉगिंगशी नातं कायम आहे. तशातच ब्लॉगरनी एखादा आवडीचा ब्लॉग फ़ॉलो करणारी सुविधा दिली. माझा ब्लॉग साधाच.. त्याची भाषा आणि त्याचे विषय दोन्ही साधेच... आणि त्यामुळं माझा ब्लॉग कोणी फ़ॉलो करेन असं मला वाटलं ही नाही.

एक दिवस माझ्या पोस्ट्स बघत होते तर माझ्या डायरीच्या ब्लॉगला एक फ़ॉलोवर दिसला... क्या बात है!!! असा विचार करत चेहेर्‍यावर एक हसू आलं.... मग एक दिड महिन्यानी अजून एक फ़ॉलोवर दिसला.. कित्येकांच्या ब्लॉगचे ५० १०० फ़ॉलोवर्स असतात... माझ्या साध्या ब्लॉगला कोणी तरी फॉलो करतय ही भावना छान वाटली. आज माझ्या अजून एका ब्लॉगला एक फ़ॉलोवर आहे... तिथे नवीन पोस्ट वाढवावीशी वाटली... गोष्ट छोटीशीच आहे. पण खुप छान वाटतय.

माझा साधासुधा ब्लॉग फ़ॉलो करण्यासाठी अनेक धन्यवाद!!!

सोनल

24 September 2009

पाऊस

इथं पहाटे आलो. एअरपोर्टवर सूर्योदयानं स्वागत केलं ते ही ढगांच्या तलम पडद्या आडून. तो दिवस तसा बर्‍यापैकी ढगाळ होता. आभाळ दिवसभर होतं. किंचित शिराळं... संध्याकाळी अंधारून आलं. इतकं की ४ वाजता आम्ही घरात दिवे लावले होते. चक्क ७ साडे ७ वाजल्या सारखं जाणवत होतं. टप टप टप टप पावसाची थेंबं वाजली. "मी आलो तुला भेटायला... माझी धरणी, माझी धरा.. तुला नखशिखांत भिजवायला... मी आलो.." झाडांवर, पानावर फुलांवर... सगळीकडे आगमनाची ग्वाही देत पाऊस आला. धो धो... इतका जोरात बरसला की जणू कैक वर्षांनी दोघं भेटले असावे.

असा पाउस मला आवडतो. त्यानं यावं आणि जीव तोडून बरसावं. मग मला बाल्कनी प्रिय होते. छान खुर्ची टाकून, वाफाळलेल्या कॉफीचा मग घेऊन, एक पुस्तक, माझी आवडती निवडक गाण्यांची प्ले-लिस्ट आणि मी... आळसावलेल्या, उन्हानं काहिली झालेल्या माझ्या मनाला हा असा कोसळणारा पाऊस तृप्त करतो. मला वर्तमानातून भुतकाळात घेऊन जातो... मी किती मागे जाते?... डिग्रीच्या वर्षात? अजून मागे.... अकरावी बारावी???..... म्म्ह्म्म्म.... अजून मागे... नववी दहावी? नाही.... मी माझ्या पहिली दुसरीतला पाऊस आठवते... आमच्या घरावर कोसळणारा पाऊस मला नेहेमीच दुसर्‍यांच्या घरापेक्षा जोरात पडतो असा वाटायचा... "बघ तुझ्या घरी किती जोरात पाऊस पडतो.. माझ्या घरावर हळू पडतो.." असं मला कोणी चिडवलं की मग मी म्हणायची,"माझ्या पावसाला मी आवडते..आमचं घर आमचं अंगण आवडतं... अंगणातली झाडं फुलं आवडतात.. म्हणून तो आम्हाला भेटायला पळत येतो..." मला अजूनही माझ्या घरावर पडणारा पाऊस जोरातच वाटतो.

आज ही असाच पाऊस पडला... मी पुन्हा लहान झाले... लहानपणी माझ्या घरावर आलेला पाऊस आठवला... शाळेतून भिजत येतानाचे दिवस आठवले.. पावसाची म्हटलेली गाणी आठवली... आमच्या घराचं अंगण, झाडं फुलं आठवली.... पावसात चिंब भिजलेली घरापुढची लॉन, निशिगंध आणि मोगर्‍याच्या फुलांची रोपं आठवली... मोठं बदामाचं झाड आठवलं.... स्वस्तिकाच्या फुलांचं झाड आठवलं.... चमेली आणि जुईच्या फुलांची वेल आठवली... परसदारातला पारिजात आठवला....

19 September 2009

माझे मासे

मुलाला आवडतं म्हणून अगदी हौसेनी आम्ही घरी एक छोटा ऍक्वॅरियम आणलं. माशांना दिवसातून दोन तीन वेळा जेवण द्यावं लागतं. ती वेळ अंगवळणी पडलीये. म्हणजे सकाळी चहा झाला की एकदा, दुपारी जेवण झालं की आणि शेवटी झोपण्यापूर्वी एकदा असं तीन वेळा मी त्यांना जेवण देते. आमची बदली बेंगलोरहून पुण्याला झाली. आणि ऍक्वॅरियमचं कसं करायचं यावर आमचा विचार विनिमय सुरू झाला. सर्व डोमेस्टीक विमानसेवा देणार्‍यांना फोनाफोनी झाली आणि शेवटी जेट एअरवेजनी हमी दिली की आम्ही मासे तुम्हाला पुण्यापर्यंत कार्गो सेवेद्वारे पोहोंचवून देऊ. तुम्ही तिथे उतरवून घ्या. आता दुकानातून पॅक करून एअरपोर्टला कार्गोमधे सुपूर्द करून तिथून पुणं... आणि पुणे एअरपोर्ट ते घर असा एकूण ५ तासांचा प्रवास त्या माशांना करायचा होता. माशांचा जीव बघता हा ५ तासांचा प्रवास त्यांना झेपणं अगदी अशक्य होतं. त्यात आपल्याकडे ऍक्वॅरियमचे मासे ट्रान्सपोर्ट होत नाहीत. त्यामूळं तशी सोयही ते विमान वाले करत नाहीत. कार्गो वाल्यानी सांगितलं की मासे एका जाड ट्रान्सपरंट पिशवीमध्ये घालून व्यवस्थीत पॅक करून मग कागदी कार्टन मध्ये घालून आम्हाला द्या. मला कार्गो द्वारे मासे पाठवणं पटलं पण कुठे ना कुठे मनात एक काळजी होती. ज्या माशांना इतके दिवस जपलं त्याच्या जीवाची हमी कोणीच देत नव्हतं. एकीकडे वाटत होतं की मासे कार्गो करावेत. एकीकडे वाटत होतं की नको... कोणाकडे तरी देऊन जावं... मग वाटलं की दुकानवाल्याला विचारावं की "बाबा रे.. यांची काळजी घेशील का?" अगदी सामान पाठवायच्या दिवशी पर्यंत मला त्या माशांना कोणाला द्यावसं वाटलं नाही... पण एक निर्णय घेणं भाग होतं. माशांना कार्गो करायचं नाही या निर्णयावर आलो तेंव्हा मला खुप वाईट वाटलं. एक दोघांना विचारलं पण त्यांच्यात फारशी उत्सुकता दिसली नाही. जमेल की नाही अशी शंका त्याच्या मनात होती. मग शेवटी एका दुकान वाल्याला विचारलं. माझ्या माशांचं नशीब चांगलं... ज्या दुकानवाल्याला विचारलं तो मत्स्यप्रेमी निघाला... त्याला फोन करून बोललो त्यावेळी तो म्हणाला, "साहेब मी माशांवर प्रेम करतो, त्यांना जगवतो. तुम्ही त्याची चिंता करू नका. कधीही मासे आणून द्या... मी घ्यायला तयार आहे." संध्याकाळी मासे पॅक करून आम्ही दुकानात नेले. ते कसे आहेत, सशक्त आहेत की नाही, कोणत्या जातीचे आहेत, जोडी आहे की नाही... काही ही प्रश्न न विचारता, कुठली ही चिकित्सा न करता, आणि विषेश म्हणजे केवळ फोन वर बोलून त्या माणसानं ते ठेउन घेतले. "मी त्यांना जगवीन.. तुम्ही काळजी करू नका असं आश्वासनही दिलं" अजून काय माणूसकी असते? त्या माणसाच्या दुकानात अनेक अनेक मासे होते... अनेक जातींचे अनेक रंगांचे... त्यानी अगदी सहज आमचे मासे त्याच्या माशांमधे सोडले... आणि आमचे मासे ही त्या माशांमधे रमून गेले... दुकानातून निघताना त्या माशांकडे मी एकदा डोळे भरून पाहिलं. माझ्या ऍक्वॅरियम मध्ये नवीन मासे नक्की येतील पण माझे हे मासे मला दिसणार नाहीत...

रात्रीचं जेवण झालं... ऍक्वॅरियमच्या टॅंक खाली असलेल्या कपाटाचं दार अनपेक्षीत उघडलं... पेलेट्सचा डबा बाहेर काढला आणि लक्षात आलं ऍक्वॅरियमचा टॅंक रिकामा झालाय... तिथे मासे नाहीत... वाईट वाटलं... I missed them...

04 September 2009

माझी डायरी........

शाळेत असताना पासून काही वाचनात आलं आणि मला आवडलं की मी माझ्या वहीत डायरीत ते टिपून ठेवायची. कथासंग्रह, कवीता, मुक्त लेखन असं थोडंफार वाचन झालं माझं. त्यात विशेष आवडलेलं म्हणजे व,पु. काळॆंच वपूर्झा. त्या पुस्तकाची पारायणं झालीत. एकदा मागे esnips साईट वर वपुर्झाची एक ऑडियो सापडली. ती इथे अपलोड केलीच आहे. असो!!

व्यक्ती, नातेसंबंध, वस्तू, यांवर अनेक कविता किंवा चारोळ्या माझ्या वाचनात आल्या... ऋतूंवरील चारोळ्या एकदा कॉलेजमध्ये असताना वाचनात आल्या होत्या. त्या चारॊळ्या मी माझ्या डायरीत लिहून घेतलेल्या. वाचनात आलेल्या पुस्तकांमधली कोटेशन्स, एकादा पॅरेग्राफ, कोणा शायराची शायरी... एक ना अनेक टिपणं होती त्यात. काळाच्या ओघात ती माझी डायरी कुठंतरी ठेवण्यात आली आणि नंतर या पुस्तकामागून त्या पुस्तका मागे अशी मागं सरकत कपाटाच्या कोपर्‍यात जाऊन बसली. कदाचित डायरीनंच मला बोलावलं असेन... काय माहिती? ८ - १० वर्षांनंतर तो कोपरा चाळवल्या गेला... तर ती डायरी सापडली. स्वच्छ पांढरी पानं पिवळसर झाली होती. पण पानांची इस्त्री गेली नव्हती... एकही पान मऊ पडलं नव्हतं. ताठा एकदम तसाच... पहिल्या सारखा...

त्या माझ्या डायरीतली निवडक वेचणं मी माझ्या कोट्स या ब्लॉगवर देणार आहे. त्याचा दुवा हा...

http://unreadquotes.blogspot.com/



~ सोनल