09 June 2008

तन्मय

तन्मय शाळेत जातोय. त्याला शाळा आवडली. आवडली म्हणजे खुप खुप आणि खुप आवडली. पाऊणच्या सुमारास आम्ही शाळेसाठी निघतो आणि हा पठ्ठ्या सव्वा बारापासून तयार होतो. हो! तो आपला आपला तयार होतोय. शर्ट घालणे, पॅन्ट घालणे, शुज घालणे अगदी सहज करतो तो! सॉक्स घालायला त्याला मदत लागते.. आता वाटतयं तेवढा तरी तो माझ्याकडे येतो "ए आई हे घालून दे ना" असं म्हणत. स्पेलिंग्स वरून शब्द उच्चारायला शिकतोय. वाचायला शिकतोय. फुल काढायचं असलं की फुलचं काढतो. पुर्वी फुल काढायला सुरू करायचा आणि त्याची गाडी कॅटरपिलर वर संपायची. "हे बघ.... मी कॅटापिला (कॅटरपिलर चं त्याचं इंग्रजाळलेलं उच्चारण!)काढलं" "अरे, पण तू फुल काढणार होतास ना?" " हो.." "मग?" "पण मला कॅटापिला आवडतं" मी गप्प!
मधे मिड टर्म हॉलिडेज होते.. (नर्सरीला पण???) एक आठवडा तो सुट्टीवर होता. मग मला मदत केली त्यानी. सगळ्या कामात... कॅप्सिकम चिरून देणे, मटर धुवून देणे, लसणाच्या पाकळ्या सोलणे य किचनच्या मदती सोबत तो झाडाला पाणी पण घालायचा, इकडच्या तिकडच्या खोलीतून सामान आणायचं असलं की मग तो त्याच्या स्कुटरवरून जाऊन आणायचा.
खुप इंडिपेंडंट झालाय तो. आई आणि पपा अधून मधून लागतात त्याला पण नसले तरी त्याची गाडी अडत नाही. तो काढतो रस्ता.
भरपुर प्रश्न आणि दिलेलं उत्तर लक्षात ठेवणं त्याला जमतय. मराठी इंग्रजी आणि अधून मधून हिंदी भाषेत तो मुक्त संचारतो. त्याला आता हिंट्स द्यायला आवडतं. सरळ विचारत नाही. "ते तुझ्या लेफ़्ट हॅंड साईड्ला, रेड कलरचं काय आहे? ते मी सॅंडविच सोबत खातो.... सांग सांग... न बघता सांग..." मग पहिल्या झटक्यात उत्तर दिलं की तो गडबडून जातो... आपली हिंट खुप सोपी होती त्याला कळतं... मग वेगळी वेगळी उत्तर मला चुक द्यायला आवडतं... "ते कधी आपण सॅंडविच सोबत खातो का?" "ते असं असतं का?" असं मी चुक उत्तर दिलं की म्हणतो.... त्याला आवडतं पहिले २ ३ उत्तरं चुकलेलं... मग बरोबर उत्तर दिलं की स्वारी खुष.... पुढच्या हिंटला तयार!!!
"मी आज शाळेत माझ्या पुस्तकातली स्टोरी सांगितली. सगळ्यांना आवडली..." तो येताना काय काय केलं ते सांगतो... त्याला आवडतं सगळं.
सप्टेंबर पासून त्याची शाळा पूर्ण वेळ सुरू होईन... त्याला तितका वेळ शाळेत पाठवताना मला पुन्हा त्याची आठवण येत राहीन.. तो जेवला असेन का? मित्रा सोबत भांडला असेन का? टिचर कडे लक्ष दिलं असेल ना? टीचर रागावली असेन का त्याला? एक ना अनेक...
I will miss him...