31 January 2008

फिलॉसॉफी!!

"मला आज खुप बोअर होतय गं... तेच ते आणि तेच ते!! काही नवीन नाहीये.." वसू वैतागून अनघाशी बोलत होती. डेस्कवर बसून पेपर्स वाचता वाचता अनघानं डोळे वर केले आणि पुन्हा पेपर्स मध्ये डोकं घातलं. अनघा वसूधाची चांगली मैत्रीण. तिला बोलतं कसं आणि कधी करायचं हे तिला कळायचं. पहिल्या वाक्याला काही बोललं नाही, तिला टोकलं नाही की वसू मन मोकळी बोलते हे तिला माहित होतं. वसूच्या या वाक्यावर त्यामुळं तिनं काही प्रतिसाद दिला नाही. "अन्या मला बोअर होतय गं!!!!!!!!" वसू ऑलमोस्ट ओरडली... "का गं? काय झालं? कोणी काही बोललं का ऑफिसात? काही टॉण्ट?" वसूच्या घरचे सगळे डिटेल्स अनघाला माहित होते. त्यामुळं घरुन नक्की काही प्रॉब्लेम नसणार या बद्दल ती १००% शुअर होती. "काही झालं नाहीये गं. पण मला तरीही बोअर होतय. तेच पेपर्स, तेच ऑफिस, तिच बस, टायमिंग पण कधी बदलत नाही. मला जाम कंटाळा आलाय! तू बोल ना काही तरी...."
"वसू...तुझ्या मागच्या खिडकीतून काय दिसतं गं तुला?"
"खिडकीतून?? मोकळं आकाश, उडणारे पक्षी, बिल्डींग्स, टेरेसवरचं काही पब्लिक, खाली गाड्या, बसेस, चहल पहल... बरचं काही दिसतंय."
"हं! मला एक सांग वसू...तुला पक्ष्यांत काय आवडतं?"
"पक्षी ना?? सगळ्यात सुखी!! मनात आलं की आकाशात मनात आलं की पुन्हा घरट्यात! भुक लागली की गेले उडत एखादा किडा पकडायचा आणि खाऊन पोट भरायचं... पिलं मोठी झाली की त्यांच्या जबाबदार्‍या संपल्या. कोणी कोणावर डिपेंडंट नाही. कोणी रोकणारं टोकणारं नाही की कशाचं टेन्शन नाही!!!!"
"वसू?"
"तुला एक विचारू??"
"विचार ना!! बिनधास्त!"
"तुला आवडेल पक्षांसारखं व्हायला?? त्यांच्या सारखं उडायला? मोकळ्या आकाशात उंच गगनाला गवसणी घालायला..."
अनघाचं वाक्य संपेपर्यंत वसू जवळ जवळ ओरडली, " ए बाई, माझ्या घरी माझ्या डिपेंडींग आहे पब्लीक.. नवरा, बच्चू, सासू सासरे आणि आई बाबा...."
"बघ! तूच कसा विचार करते आहेस! मी तुला घरटं सोडून जा असं कधी म्हटलं नाही... I just asked u wud u like to be a bird?"
"तुला नेमकं काय म्हणायचं आहे अनघा?"
"अगं आकाशात गवसणी घाल, उंच भरारी मार...पक्षांसारखं इंडिपेंडंट हो!!! तुझ्याकडे जमिनीवरून पाहणार्‍या लोकांना जरा नजरेला आनंद मिळू दे..तू पिंजर्‍यात बसून राहिलीस तर त्यांना ही अवघड वाटेल! उंच भरारी घे....आकाशाला गवसणी घाल..आणि बघ दिवसाच्या शेवटी जेंव्हा घरट्यात परत येशील ना तेंव्हा सगळे येतील तुला घरात घ्यायला. आणि हे रोजचं जरी झालं ना तरी त्यात एक कौतुक असतं. ते कधी विसरता येत नाही आणि त्या इतका आनंदही कशात नाही!! एकदा या रुटीनच्या पलिकडे नजर टाकून बघ. दुनिया खुप छान आहे. बोअर व्हायचा, कंटाळा यायचा चान्स नाही! पक्षांकडून, गाडी वाहनांकडून, बिल्डींगवर उभ्या राहिलेल्या माणसांकडून अगदी आपल्या रिसेप्शनजवळच्या ऍक्वॅरियम मधल्या माश्यांकडून ही खुप काय काय शिकायला मिळतं. एकदा नजर टाकून बघ तर!"
अनघा बोलत होती...वसू शिकत होती.
आज घरी जाता जाता सगळ्यांना या विक एंडला थोडा change कसा द्यावा याचा विचार करत होती..