24 September 2009

पाऊस

इथं पहाटे आलो. एअरपोर्टवर सूर्योदयानं स्वागत केलं ते ही ढगांच्या तलम पडद्या आडून. तो दिवस तसा बर्‍यापैकी ढगाळ होता. आभाळ दिवसभर होतं. किंचित शिराळं... संध्याकाळी अंधारून आलं. इतकं की ४ वाजता आम्ही घरात दिवे लावले होते. चक्क ७ साडे ७ वाजल्या सारखं जाणवत होतं. टप टप टप टप पावसाची थेंबं वाजली. "मी आलो तुला भेटायला... माझी धरणी, माझी धरा.. तुला नखशिखांत भिजवायला... मी आलो.." झाडांवर, पानावर फुलांवर... सगळीकडे आगमनाची ग्वाही देत पाऊस आला. धो धो... इतका जोरात बरसला की जणू कैक वर्षांनी दोघं भेटले असावे.

असा पाउस मला आवडतो. त्यानं यावं आणि जीव तोडून बरसावं. मग मला बाल्कनी प्रिय होते. छान खुर्ची टाकून, वाफाळलेल्या कॉफीचा मग घेऊन, एक पुस्तक, माझी आवडती निवडक गाण्यांची प्ले-लिस्ट आणि मी... आळसावलेल्या, उन्हानं काहिली झालेल्या माझ्या मनाला हा असा कोसळणारा पाऊस तृप्त करतो. मला वर्तमानातून भुतकाळात घेऊन जातो... मी किती मागे जाते?... डिग्रीच्या वर्षात? अजून मागे.... अकरावी बारावी???..... म्म्ह्म्म्म.... अजून मागे... नववी दहावी? नाही.... मी माझ्या पहिली दुसरीतला पाऊस आठवते... आमच्या घरावर कोसळणारा पाऊस मला नेहेमीच दुसर्‍यांच्या घरापेक्षा जोरात पडतो असा वाटायचा... "बघ तुझ्या घरी किती जोरात पाऊस पडतो.. माझ्या घरावर हळू पडतो.." असं मला कोणी चिडवलं की मग मी म्हणायची,"माझ्या पावसाला मी आवडते..आमचं घर आमचं अंगण आवडतं... अंगणातली झाडं फुलं आवडतात.. म्हणून तो आम्हाला भेटायला पळत येतो..." मला अजूनही माझ्या घरावर पडणारा पाऊस जोरातच वाटतो.

आज ही असाच पाऊस पडला... मी पुन्हा लहान झाले... लहानपणी माझ्या घरावर आलेला पाऊस आठवला... शाळेतून भिजत येतानाचे दिवस आठवले.. पावसाची म्हटलेली गाणी आठवली... आमच्या घराचं अंगण, झाडं फुलं आठवली.... पावसात चिंब भिजलेली घरापुढची लॉन, निशिगंध आणि मोगर्‍याच्या फुलांची रोपं आठवली... मोठं बदामाचं झाड आठवलं.... स्वस्तिकाच्या फुलांचं झाड आठवलं.... चमेली आणि जुईच्या फुलांची वेल आठवली... परसदारातला पारिजात आठवला....