इंजिनियरिंगला नांदेडला नंबर लागला आणि मग मी ग्रुपच्या शोधात लागले. "अरे सोनल, आपण एकाच कॉलेजला आलोत!!!" माझी ऍडमिशन झाल्यावर पहिलं जर कोणी माझ्या कॉलेज मधून बोललं असेल तर तो राहूल!!! "आता मजा येईन... तू आणि मी कॉलेज मध्ये धिंगाणा घालू आणि सगळ्यांच्या नाकी नऊ आणू...." आणि काय काय राहूल बोलत होता आणि मी मोठ्ठा आ वासून त्याच्या कडे बघत होते. पपा माझे दोन्ही काका मी राहूल आम्ही सगळे बैठकीत बसलेलो. इतकं बिनधास्त बोलणं राहूललाच जमू जाणे... राहूल कंट्रोलच्या बाहेर बोलतोय असं लक्षात आल्यानं म्हणा किंवा अजून काही कारण असो... "चला आता पुस्तकं आणा आणि अभ्यासाला लागा... " असं म्हणत आदरणीय प्रभूतींनी ऍडमिशन बैठक आवरली... राहूल मित्रांसोबत बाहेर गेला आणि मी काकू सोबत आत घरात.
राहूल माझा चुलत भाऊ. आमच्या वयात जेमतेम ४ महिन्यांचं अंतर. एकदम बिनधास्त व्यक्तिमत्व... मित्रांमध्ये रमणारा, सगळ्यांसोबत असूनही आपलं वेगळेपण जपणारा. "ए काय हे? हे बरोबर नाही.." समोर कोणीही असो आपलं म्हणणं ठणकावून मांडणारा, एखादा मुद्दा कळला नाही तर बिनधास्त डाउट्स विचारणारा राहूल मनात कोणाविषयी ही आकस न ठेवणारा मुलगा... राहूलचा पुढे मेडिकलला नंबर लागला. नांदेडहून तो औरंगाबादला गेला. तो होता तोपर्यंत मला एक सॉलिड सपोर्ट होता. काका काकू जेंव्हा कधी औरंगाबादला जायचे त्यावेळी त्याला मी काही ना काही तरी पाठवायचे. कधी छोटं मोठं पत्र तर कधी एखादी हलकी फ़ुलकी गिफ़्ट. पुढे ते ही कमी झालं. पण त्याची पोच यायची.
MBBS झाल्यानंतर त्यानं न्युरोसर्जरीत स्पेशलायझेशन केलं आणि सध्या पेडीयाट्रिक सर्जरीत सुपर स्पेशलायझेशन करतोय. ५ - ६ महिन्यांपूर्वी राहूलची एक धावती भेट झालेली. तो तिरुपतीहून मणिपालला वापस जात होता त्यावेळी बेंगलोरला माझ्याकडे आला होता. अगदी तासभर होता पण खुप दिवसांनी भेटलो होतो. बरं वाटलं. आम्ही मणीपालला त्याच्याकडे गेलो होतो. दोन दिवस खुप मजेत गेले. जुन्या आठवणी, जुन्या गप्पा, जुने विषय... एक ग्राफिटी आठवली आणि १००% पटली... शिळोप्याच्या गप्पा केल्या की ताजंतवानं वाटतं! तशीच ताजीतवानी होऊन मी बेंगलोरला परतले.
03 February 2009
Subscribe to:
Posts (Atom)