16 March 2010

आईच्या हातची चव

रोजच्या आयुष्यात घडणार्‍या अनेक छोट्या छोट्या गोष्टी. आठवणींच्या कोपर्‍यात कोण साद घालेन सांगता येत नाही. शाळेत असताना अनेकदा माझी आई तुप साखर पोळीचा लाडू करून द्यायची. कधी नाश्त्याला तर कधी चार साडेचारच्या मधल्या खाण्यासाठी. अगदी जुनी गोष्ट नाही. कालच दुपारी तुप साखर पोळी खावीशी वाटली. मी आणि तन्मय आम्ही दोघांनी मस्त अडवा हात मारला. झकासपैकी तू आधी की मी आधी करत आम्ही दोघांनी लाडू मजेत संपवला. लाडूचा पहिला घास घेतला आणि वाटलं की तिच्या सारखा लाडू मला जमलाच नाहीये. तिच्या लाडूसारखी चव माझ्या लाडूला कधी येणार? पण तन्मयनी मात्र पहिल्याच घासाला म्म्म्म्म्म्म यमी... असं म्हणत खाल्ला.

विचित्र आहे ना हे? कदाचित माझ्या आजीच्या हातचा लाडू माझ्या आईला मस्त यमी लागत असणार आणि ती पण असाच विचार करत असणार की "त्या लाडूसारखा लाडू मला कधी येणार?" आणि मला मात्र तन्मयसारखं तिच्या हातच्या लाडूची चव मस्त लागत असणार. माझी आई म्हणायची की "आमची अम्मा (म्हणजे तिची आई) खुप छान स्वयंपाक करायची. तशी चव कोणाच्या हाताला नाही." पण ती काही म्हणो मला माझ्या आईनं केलेलं जेवण चविष्ट लागतं. कदाचित आई या व्यक्तिमत्वालाच एक खमंग चव असावी.

What u say?