09 December 2007

नवी साईट

तन्मय बघता बघता ४ वर्षाचा झाला. वाढदिवस कसा साजरा celebrate या साठी आम्ही दोघंही नेटवर शोधा शोध करत होतो. काही celebration ideas सापडतात का ते बघत होतो. तो एक साईट सापडली. www.sogotall.com बर्‍यापैकी माहिती आहे य साईट्वर. खुप माहिती अथवा भरपूर माहितीचा खजीना असं काही नाही. कोणीतरी स्वतःसाठी तयार केलेली साईट.. निव्वळ स्वतःचा वेळ कामी लागावा यासाठी केलेल्या वेब पेजेसची ही साईट. popup नाहीत की आजू बाजूला दुसर्‍या वेब साईट्सच्या ads नाहीत. पण जे काय मटेरियल आहे साईट वर ते छान आहे. तन्मयच्या वाढ्दिवसासाठी celebration idea तिथेच मिळाली.
overall साईट बरी आहे. माहितीचा खजिना नसला तरी तिथल्या भटकंतीत वेळ छान जातो. एकदा नक्की भेट देणेबल आहे साईट.
हा साईट्चा दुवा!
www.sogotall.com

28 October 2007

पाऊस

छान वारा सुटलाय आज सकाळपासून! मागच्या अंगणातली झाडंही आनंदानं वार्‍यावर झुलत होती. गरम गरम कॉफीच्या घोटासोबत माझी आवडती सेंटीमेंटल्स सुरू होती. दुपारचे ४ वाजलेत आणि बाहेर सात आठ वाजल्यासारखं अंधारून आलयं. खिडकीतून पाहिलं तर रस्ता सगळा ओला! पाऊस कधीचा पडतोय??? मला कळलंही नाही. मला आवडतो पाऊस. असा रिमझिम, कळत नकळत पडणारा. रस्त्याला ओलं करून टाकणारा. बाहेर जाणार्‍या माणसांना छत्री उघडू की नाही अशा संभ्रमात टाकणारा. संपूर्ण काचेची भिंत, आणि त्यापलीकडे पडणारा रस्त्यावरचा सिमझिम पाऊस! मी किती मागे पोहोंचली माहितिये? मी शाळेत पोहोंचले होते! औरंगाबादला होतो आम्ही. शारदा मंदिरला. असंच अंधारून आलेलं. शाळा सकाळची होती. आई म्हणालेली, "आज शाळा होणार नाही. अगं खुप अंधारून आलयं!" पण शाळेत अशा दिवशीच खुप मजा येते! वर्गात अटेंडन्स कमी आणि मग मॅडमही काही न शिकवता गप्पा मारायच्या आमच्या सोबत. त्यादिवशी ४० जणींच्या आमच्या वर्गात जेमतेम ११ १५ जणी होत्या. बाकी मुलींनी माझ्या मते आयुष्यातला एक सगळ्यात मनमोकळा दिवस एंजॉय केला नाही!
त्यादिवशीचा पाऊस विशेष लक्षात राहिलाय. आम्ही ८ १० जणी मिळून शाळेत एकत्र जायचो. निवांत, गप्पा ठोकत. हसत, खिदळत... ९ च्या दरम्यान सकाळी जोरात पाऊस सुरु झाला आणि सगळी शाळा कॉरिडॉर मधे जमली. मग एका वर्गात जमून गाण्याच्या भेंड्या झाल्या. किती गाणी म्हटली आम्ही!!! दिड तास दणक्यात चाललेली अंताक्षरी पावसाचा जोर कमी होईपर्यंत सुरू होती. पावसाचा जोर कमी झाला आणि आमच्या मॅडमनी शाळा सुटली असं डिक्लेअर केलं. खुप अनिच्छेनं आम्ही सगळ्य़ांनी शाळा सोडली. एरव्ही बारा वाजल्यापासून घड्याळं चेक करणार्‍या या पोरी आज घरी जायला नको म्हणत आहेत हे पाहून स्टाफही हसत होता. शाळेतून अकराच्या दरम्यान बाहेर पडलो तो अर्ध्या रस्त्यात पावसानं पुन्हा जोर धरला. नखशिखांत भिजलो होतो आम्ही सगळ्या. एकदम निवांत... कोणी नको भिजू म्हणणारं नव्हतं की कोणी रागावणारं नव्हतं!!! आम्ही मोकाट सुटलो होतो!
सेंटीमेंटल्स आणि सोबत रिमझिम पडणारा पाऊस असला की हा दिवस आठवतो. पुन्हा शाळेत जावंसं वाटतं. गाण्याच्या भेंड्या खेळण्यासाठी, मॅडमशी गप्पा मारण्यासाठी, सायकलवर घरी परत येताना जोरदार पावसात नखशिखांत भिजण्यासाठी!!!
आज हा दिवस आठवला त्यावेळी मागं सुमन कल्यणपुर आणि कमल बगोट यांनी गायलेलं गाणं सुरू होतं गरजत बरसत सावन आयो रे!!!!

Get this widget | Track details | eSnips Social DNA

30 September 2007

तुला काय आवडतं गं??

सकाळी सकाळी मला अहोंनी प्रश्न केला "तुला नेमकं काय आवडतं गं?" आणि काही सुचायच्या आत निघून गेलं मला एकदम एकटं बसायला आवडतं. "हा हा हा" असं सातमजली गडगडाटी हसत हे रुम बाहेर गेले आणि दिवस रूटीन सुरू झाला. ब्रेकफ़ास्ट झाल्यावर तन्मय आणि हे दोघं बाहेर गेले. त्यादिवशी बाहेर जायला मी कधी नाही ते नको म्हणाले. मला एक वॉर्निंग मिळाली होती की "यायला उशीर होईल तुला घरी एकटीला बोअर होईल. चल आमच्या सोबत!" पण विचार केला की निवांत रहायला मिळतय कशाला जा आज बाहेर आणि मी "नको, मी येत नाही" असं डिक्लेअर केलं. अकरा - साडे अकराच्या दरम्यान दोघंजणं बाहेर गेले. आणि तन्मयच्या चिवचिवाटानं, हे आणि तन्मय अशा दोघांच्या धिंगाण्यानं भरून जाणार्‍या आमच्या घरात सामसूम शांतता आली. एक तासाभरात सगळी कामं झाली. मग नेटवर भटकून झालं, गाणी ऐकून झाली, क्रोशाच्या शालीच्या ५ ७ ओळी विणून झाल्या. आणि घड्याळात पाहिलं तर एकच तास संपलेला. आता येतील मग भूक लागेल म्हणून खायच्या तयारीला लागले. तन्मयला मऊ पोहे आवडतात. त्याची तयारी केली. म्हणजे कांदा टोमॅटो चिरला, बटाटा वर काढून ठेवला, कोथिंबीर धूवुन चिरून ठेवली, आणि पोहे भांड्यात काढून ठेवले. १० मिनिट्स संपले.
बापरे!! घरात कोणीच नव्हतं. मला हवा असलेला शांत आणि निवांत वेळ मिळाला होता. पण विचार करत होते तेंव्हा वाटलं की मला खरचं ही शांती, असा निवांतपणा हवाय का? तन्मयचा आवाज नाही, याचा घरात वावर नाही, कोणी बोलायला नाही. मी मला वेळ देऊ शकत होते पण मला करमत नव्हतं. बोअर झालं म्हणून दोघांना मोबाईलवर गाठावं म्हणलं तर यांचा मोबाईल घरातच वाजला. म्हणजे या दोघांशी काही कॉंटॅक्ट पण होणार नव्हता. घर खायला उठलं. काही तरी आठवावं म्हणलं तर तन्मय शिवाय काही आठवत नव्हतं. तो दोन महिन्याचा असताना मी त्याला घेऊन आलेली. त्याला कसं वाढवलं हेच आठवत होतं.
आआआआआआआआआआआआआआआआआआआआ असं जोरात ओरडावं वाटलं. तेवढ्यात बेल वाजली. "आआआआई, हाय!" असा तन्मयचा आवाज आला. लहान मुलाला, "तुला आईसक्रीम ठेवलय. ये खायला" असं सांगीतल्यावर कसं पळत येतात ना मी तशीच पळत दाराकडे गेले. आणि कबूल केलं "तुम्ही घरात नव्हता. मला हवा तसा वेळ मला मिळाला होता. पण मला खरचं करमलं नाही." पहिल्यांदा आयुष्यात मला वाटलं होतं की निवांत आणि शांत वेळ एकटीनं घालवणं नसतं. सगळ्य़ांसोबत राहणं, गप्पा मारणं या सारखं सुख नाही.

मला एकटं रहायला आवडत नाही... मला सगळं आवडतं पण एकटेपणा नाही आवडतं....

24 September 2007

तन्मयची आई

"हो गं.. बघ ना अजून ४ महिने आहेत तन्मयच्या शाळेला...!" मी आईला सांगत होते. आणि आई म्हणत होती, " अगं बघता बघता शाळा सुरू होईल आणि मग तुला दुपारी थोडा निवांत वेळ मिळेल." ४ महिने संपले. तन्मयची शाळा सुरू झाली. खाली मान घालून डेस्कवर चेहरा हातानी झाकून बसला. आलेला हुंदका तसाच दाबून धरून बसला. जेमतेम साडेतीन वर्षाच्या ह्या मुलाला इतका समजूतदारपणा कधी आला? त्याला शाळेत सोडून बाय करताना किती तरी वेळा मी त्याच्याकडे पहायचं टाळते. पहिल्या दिवशी त्याला सोडून जाताना मलाच कसं तरी होत होतं. तो रडला पण शाळा सुटल्यावर घ्यायला गेलो तेंव्हा निवांत बाहेर आला. दुसर्‍या दिवशी "तू मला घ्यायला येशील ना गं?" त्याच्या निरागस प्रश्नावर मला त्याला शाळेत सोडावसं वाटलंच नाही. दोन्ही हातानी धरून मला म्हणाला, "तू जाऊ नको." समजून सांगून तो गेला. शाळा सुटल्यावर पहिला प्रश्न... "आई? तू कुठे लपून बसली होती?" मी सांगीतलं "या बॉक्स मध्ये बसले होते." मग त्या बॉक्सची कथा कहाणी सांगत आम्ही घरी आलो. रोज एका नवीन ठिकाणी लपून बसले होते असं सांगावं लागतयं.

आज शाळा सुरू होऊन एक आठवडा झाला. तन्मय शाळेत ऍडजस्ट झालाय. तो गेल्यावर दोन तास घरात एकटं कसं तरी वाटतं. त्याच्या खोड्या आठवतात. विचार करते तेंव्हा वाटतं त्याला खॊड्या केल्यावर जे रागवायचे ते चूक होतं की बरोबर? माझ्या रागावण्यानं किती वेळा तो हिरमुसला झालाय? तो जसा शाळेत जायला लागलाय तसं माझं त्याला रागावणं कमी झालयं. मुळात तोच समजदार झालाय. रिझनिंग आणि स्वतःची सेफ़्टी त्याची त्यालाच कळायला लागलीय. "आम्ही आज हे केलं. मी असं केलं. माझी पेंटींग पाहिलसं? थांब तुला माझं पेंटींग दाखवतो....." किती तरी गोष्टी सांगायच्या असतात त्याला. वाचायला शिकतोय. शाळेचं दिलेलं पुस्तक ४ - ५ वेळा वाचून झालं त्याचं. पुस्तकातून नवीन स्पेलिंग्स, नवी वाक्यं शिकला.

तो मोठा होतोय! आपलं आपलं कपडे घालणं, सॉक्स शुज घालणं, बॅग घेणं भरणं, जॅकेट चढवणं... तो स्वावलंबी होतोय! पण अजून त्याला मी लागते... "आई कुठे गेली?" तो आई म्हणून हाक मारतो तेंव्हा त्याला अजून ही मी तसंच जवळ घेतलेलं आवडतं. "मी आता मोठा झालोय ना.. म्हणून तुला मला उचलता येत नाही.." एकदम मोठ्या माणसासारखं म्हटलेलं हे वाक्य ऐकण्यासाठी मी त्याला सारखी उचलून घेते.

मोठा हो बेटू! खुप मोठा हो!

तुझी
आई

16 September 2007

महाजालावरची एक कॉमन कविता

मैं और मेरा रूममेट अक्सर ये बातें करते हैं,
घर साफ होता तो कैसा होता.
मैं किचन साफ करता तुम बाथरूम धोते,
तुम हॉल साफ करते मैं बालकनी देखता.
लोग इस बात पर हैरान होते,
उस बात पर कितने हँसते.
मैं और मेरा रूममेट अक्सर ये बातें करते हैं.

यह हरा-भरा सिंक है या बर्तनों की जंग छिड़ी हुई है,
ये कलरफुल किचन है या मसालों से होली खेली हुई है.
है फ़र्श की नई डिज़ाइन या दूध, बियर से धुली हुई हैं.

ये सेलफोन है या ढक्कन,
स्लीपिंग बैग है या किसी का आँचल.
ये एयर-फ्रेशनर का नया फ्लेवर है या ट्रैश-बैग से आती बदबू.
ये पत्तियों की है सरसराहट या हीटर फिर से खराब हुआ है.
ये सोचता है रूममेट कब से गुमसुम,
के जबकि उसको भी ये खबर है
कि मच्छर नहीं है, कहीं नहीं है.
मगर उसका दिल है कि कह रहा है
मच्छर यहीं है, यहीं कहीं है.

पेट की ये हालत मेरी भी है उसकी भी,
दिल में एक तस्वीर इधर भी है, उधर भी.
करने को बहुत कुछ है, मगर कब करें हम,
इसके लिए टाइम इधर भी नहीं है, उधर भी नहीं.

दिल कहता है कोई वैक्यूम क्लीनर ला दे,
ये कारपेट जो जीने को जूझ रहा है, फिकवा दे.
हम साफ रह सकते हैं, लोगों को बता दें
हां हम रूममेट्स है रूममेट्स है रूममेट्स है!!!

03 September 2007

वाट्टेल ते!!

मनात येईल ते लिहावं. शाळा कॉलेजला असताना वाटायचं की काही तरी लिहावं. डायरी तेंव्हा ही लिहायचे. आज ही लिहिते. जेंव्हा मागच्या डायर्‍या काढून वाचते तेंव्हा लिखाणाची पद्धत, विषय, आणि त्यातलं passion बदलल्यासारखं वाटतं. कदाचित माझा भ्रम असावा. पण त्यावेळी जसे विषय सुचत जायचे तसे आज सुचत नाहीत. आणि त्यावेळी जसं सुचल्या विषयाला मॅटर लिहिता यायचं तसं मॅटर आणि तशी भाषा आज जमत नाही.

कॉलेजचे दिवस छान वाटतात. मैत्र, अभ्यास, प्रॅक्टिकल्स, गप्पा, कॅन्टीन, मस्त दिवस जायचा. मला पुन्हा कॉलेजला जावसं वाटतयं. लायब्ररी, पुस्तकांसाठी नंबर्स लावणं, आपल्याच ग्रुप मध्ये पुस्तक फिरवणं, डिस्कशन्स, जर्नल्स, प्रॅक्टिकल्स, ओरल्स अशा एक एक गोष्टी आठवत गेल्या की आपलं ते विश्व किती वेगळं आणि धमाल होतं हे जाणवतं.

डिग्रीचे सुपीक आणि सुंदर दिवस संपले तशी मागे नोकरीची धावपळ सुरू झाली. कॉलेज मधे असताना नोकरी करावी वाटयाची... कधी एकदा डिग्री संपेल आणि कधी एकदा नोकरी करू असं व्हायचं... आज वाटतय की ते दिवस पुन्हा येणार नाहीत.. त्या feelings ही येणार नाहीत. रोज येणारा दिवस काही ना काही शिकवून जातो. पुढे सरकवत जातो... धकाधकीच्या आजच्या आयुष्यात आई पपांशी होणार्‍या रोजच्या गप्पा कमी झाल्यात, बहिणीशी टेरेसवर होणा‍र्‍या गप्पा कमी झाल्यात, निवांत बाजारात जाऊन होणारी खरेदी तर बंदच झालीये... ऑफिसातून येता येता खरेदी आटोपायची, आवडीची गोष्ट मिळाली तर आनंद नाही मिळाली तर compromise.... life never stops... keeps on moving... but yeah each day as comes teaches a new thing... teaches how to b happy and how to b self relient....

मैत्रिणी आठवत राहतात. कधी मधे फोनवर बोलणं होतं. पण तेवढ्या पुरतंच.... सगळेच आपापल्या नोकरीत गुंतलेले.

मला पुन्हा एकदा कॉलेजला जायचयं... कट्ट्यावर बसून गाणं गुणगुणायचय.... जोक्सवर खळखळून हसायचयं... हात धरून coridoor मधून फेरफटका मारायचाय....

12 August 2007

सुप्रभातम रिमिक्स!!

कौसल्या सुप्रजा.... तव सुप्रभातम।

श्री व्यंकटेश सुप्रभातम ऐकताना छान वाटतं. नेटवर डाउनलोड करता येईल का यासाठी एक दिवस शोधत होते तर याचं रिमिक्स सापडलं. esnips.comवर सापडलेलं हे रिमिक्स.


Get this widget | Share | Track details

11 August 2007

अनिल कुंबळेचं ओव्हलवर शतक

शुक्रवार, १० ऑगस्ट २००७. भारत इंग्लंड दरम्यान तिसरी कसोटी इंग्लंडला ओव्हलवर सुरू होती. भारत सुस्थितीत खेळत होता. म्हणजे टॉप ऑर्डर चांगली खेळली होती. आणि ४५०च्या वर धावा झालेल्या. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्यासाठी भारत मैदानावर उतरला ते मागची सर्व गालबोटं पुसून टाकण्यासाठी. दिनेश कार्तिकच्या ९२, तेंडल्याच्या ८२, द्रविडच्या ५५ अशा चांगल्या धावसंख्या असताना विकेट्स पडतही होत्या. महेंद्र सिंग धोनी आणि अनिल कुंबळे मैदानावर आले. धोनीवर आशा नेहेमीच असतात. तडाखेबंद फलंदाजीसाठी प्रसिद्ध धोनी आणि मला तरी अनिल कुंबळेकडून धोनीला किमान सपोर्ट अपेक्षित होता. धोनीने नेहेमी प्रमाणे दे दणादण धावांची मारामारी सुरू केली आणि अनिल कुंबळेने मला अपेक्षित साथ त्याला दिली. धोनीने पिटरसनला एका ओव्हर मध्ये दोन सलग सिक्स मारले. हा मोका पाहून पिटरसनने त्याला तिसरा बॉल तसाच टाकला. सिक्स मारण्याच्या इच्छेनं धोनीने पुढे येऊन बॉल मारला पण सिमा रेषेजवळ असलेल्या कुकने त्याला टिपलं.
धोनी आऊट झाला त्यावेळी आपल्याकडचे भरवशाचे बॅट्समन संपले होते. बाकी टेल एंडर्स किती रन्स जोडतील यावर मी एक अंदाज बांधत होते. कुंबळे आणि जहिर खेळत होते. एकमेकांना साथ देत होते. जहिर ११ रन्स वर आणि त्या पाठोपाठ आलेला आर.पी.सिंग ११ रन्सवर आऊट झाले. त्यावेळी अनिलनं आपले ५० रन्स पूर्ण केले होते. शेवटचा फलंदाज म्हणून श्रीसंथ आलेला. श्रीसंथही जरा मारामारी कॅटॅगिरीत येतो. म्हणजे आलेला बॉल टोलवायचा आणि जास्तीत जास्त रन्स वसूल करायचे असा त्याच्या जनरल खाक्या! अनिल कुंबळेचे माझ्या आठवणीप्रमाणे ८८रन्स हा सर्वात जास्त रन्सचा रेकॉर्ड. आणि मला वाटत होतं की श्रीसंथनं त्याला सपोर्ट करावा आणि अनिलनं ८८ रन्स चा रेकॉर्ड मोडावा....
श्रीसंथनं अनिलला चांगला सपोर्ट दिला. ८८ रन्सचा स्वत:चा रेकॉर्ड त्यानं मोडला... चला आता हा कधीही आउट झाला तरी काही फारसं मला वाईट वाटणार नव्हतं. हा! पण त्यानी स्वत:चा रेकॉर्ड मोडावा ही मात्र इच्छा नक्की होती. ती पुर्ण झाली नसती तर थोडसं वाईट वाटलं असतं की अरेरे त्याचा रेकॉर्ड किमान मॅच व्हावा.! पण कसलं काय!!! रेकॉर्ड मोडला तरी अनिल आऊट व्हायचा चान्स दिसत नव्ह्ता. श्रीसंथही त्याला साथ देत होता. तो जपून फलंदाजी करत होता. जणू अनिलची सेंचुरी ही आपली जबाबदारी आहे असं त्यानं मानलं होतं.
अनिलनं शतक पुर्ण केलं ते २ सलग चौके मारून... पहिला चौका मारून तो ९३चा ९७वर आला. दुसरा चौका लकीली लागला. बॅटला लागून बॉल स्टंप्सच्या बाजूनी निसटला... स्टंप आऊट होऊ नये म्हणून अनिल बॅट क्रिझ मध्ये टेकवण्यासाठी मागे वळला तो बॉल निसटून सीमारेषेपलिकडे निघाला होता. तो पोहोंचायच्या आधीच आनंदानं सगळेच बेभान झाले होते. श्रीसंथने अनिलचं अभिनंदन केलं... सगळेच टाळ्या वाजवत होते. आनंदात होते.
अनिलच्या सेंच्युरीनंतर ड्रेसिंगरूम रिप्ले मध्ये दाखवत होते. त्याचा स्टंप्स शेजारून गेलेला बॉल... तो क्षण... रिप्ले मध्ये दाखवत होते... त्याची सेंच्युरी मिस होते की काय या भावनेने डोक्याला हात लावून नंतर तोच हात उंचावत उड्या मारणारं ड्रेसिंग रूम दाखवत होते... ११८ टेस्ट मॅचेसची वाटबघून अनिल कुंबळेनं त्याच्या कारकिर्दिचं पहिलं वहिलं शतक १६ फ़ोर व १ सिक्सच्या मदतीनं भारता बाहेर इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर काढलं.
त्याची सेंच्युरी पुर्ण झाल्यावर श्रीसंथने आपली बॅट परजली!! ६ फ़ोर व १ सिक्स मारून त्यानं ३५ धावा काढल्या. ३५च्या स्कोअरवर श्रीसंथ आऊट झाला.
अनिल ११० धावांवर नाबाद होता. पहिलं वहिलं शतक... ते ही नाबाद.... यालाच कदाचित भगवान के घर देर है अंधेर नही असं म्हणत असावेत! ३६ वर्षीय अनिल कुंबळेनं दाखवलेला संयम, त्यानं केलेली संयमी खेळी खरोखर वाखाणण्याजोगी आहे. ओव्हलवर झालेली मॅच जेवढी दिनेश कार्तिक व धोनीच्या हुकलेल्या शतकाने लक्षात राहिल त्या पेक्षा जास्त ती अनिल कुंबळेच्या शतकाने राहिल....
हॅट्स ऑफ टू यू अनिल!!! ब्राव्हो!

आज मॅचचा तिसरा दिवस संपला. इंग्लंडचे ९ बॅट्समन आऊट झाले. मला मनापासून वाटतय भारतानं मॅच जिंकावी. ही ड्रॉ होऊ नये. किमान अनिलनं काढलेल्या शतकाचा मान ठेवण्यासाठी तरी आपण मॅच जिंकावी....

अनिल कुंबळेच्या सेंच्युरीचे व त्या नंतरचे हे काही क्षण..



सोनल..

20 June 2007

भाकरीची गोष्ट

इल्फर्ड नावाचं नगर होतं. तिथे आई वडील आणि त्यांचा लहान मुलगा असं तिघांचं सुखी कुटूंब होतं. वडील नोकरी करायचे आणि आई मुलाला सांभाळायची असा त्यांचा संसार सुखी चालला होता. वडीलांना भाकरी आवडत असे. वडीलांनी आईला तसं सांगितलं. म्हणाले,"आज भाकरी खावीशी वाटते. संध्याकाळी कर." आईने विचार केला... इतके दिवस आपली झाकली मुठ होती. आपल्याला भाकरी येत नाही हे आता वडीलांना कळणार... तिने संध्याकाळी करते म्हणून सांगितलं. तिने तिच्या आई कडे असताना एकदा भाकरी केली होती. पण त्याचा सराव नव्हता. त्या दिवशी खुप वेळ विचार केला. शेवटी मनाची हिम्मत करून तिने भाकरीचे पीठ मळण्यास घेतले. पण किती घ्यायचे? कणीकेचा अंदाज होता तिला. भाकरीच्या पीठाला तिला अंदाज लागत नव्हता. एवढेच आठवत होते की पोळीच्या उंड्या पेक्षा भाकरीचा उंडा मोठा असतो. पण किती मोठा?? तिने पिठ मळायला घेतले. आधी दुध कमी झाले. म्हणून तिने दुध वाढवले. पुन्हा पिठ मळले. या वेळी दुध जास्त झाले. तो पीठ पातळ झाले. तिने पुन्हा वाढवले. भाकरी करण्या योग्य जेंव्हा मळल्या गेले तो ८ १० भाकर्‍या होतील येवढे झाले. दुष्काळात तेरावा महिना अशी मनःस्थिती झाली. एक भाकरी करता येत नाही. ८ भाकर्‍या कधी कराव्या?

पहिल्या भाकरीचा उंडा घेतला. पोळी एवढा लहान घेतला. भाकरी थापावयास घेतली. मनात विचार केला पातळ भाकरी आवडेल त्यांना. थापताना भाकरी उलत होती. भाकरी मोडून मोठा उंडा करावयास घेतला. उंडा जास्तच मोठा झाला. भाकरी थापता थापता पोळपाटा बाहेर जायला लागली. पुन्हा मोडून थोडा लहान उंडा घेतला. भाकरी कडेला थोडी थोडी उलत होती. पोळपाटावर थापलेली भाकरी हातावर घेताना मोडली. पुन्हा या दिव्यातून जावे लागणार या विचाराने आई बिचारी हैराण झाली. पुन्हा उसनी उमेद आणून भाकरी थापली. आणि पोळपाटच उचलून तिने भाकरी तव्यावर टाकली. वरून पाणी फिरवायचे लक्षात राहिले नाही. खालचा भाग पुर्ण शिजल्यावर मग पोळीसारखी उलटावी हा विचार केला... आणि इथेच फसली. वरची भाकरी कोरडी झाली. हा भाग तव्याला लागताच सगळी भाकरी भूकंपात तडे गेलेल्या जमीनीसारखी दिसायला लागली. एका भाकरीसाठी जवळ जवळ २० २५ मिनिटं अथक प्रयत्न केल्या नंतर ही भाकरी तयार झाली होती. "चला, झाली का भाकरी?! म्हणत वडिल येताच आईची घाबरगुंडी उडाली.. " हो हो १ - २ मिनिटं हं!!" असं म्हणत आई पुढच्या भाकरीला लागली. पुढली भाकरी १ - २ मिनिटांत करायची होती. यावेळी मात्र बरोबर उंडा घेऊन हलक्या हाताने थापत कशी बशी भाकरी तयार केली. तव्यावर टाकण्याची कसरत केली. वरून पाणी व्यवस्थित लावलं... आणि खालची भाकरी शिजायच्या आधीच उलटली... हाय दैवा!!! भाकरीचे मधून दोन तुकडे झाले.... आता वडीलांना काय खायला द्यावं या विवंचनेत होती आई!!


आणि तिच्या मदतीला फोन धावून आला... कोणाचा तरी फोन आला. वडील फोनवर बोलण्यात गुंगले. आईला १० मिनिटं मिळाली होती. तिने डोकं शांत ठेवून भाकरी थापली. तेवढ्याच शांतपणे हातावर काढून घेतली. आणि तव्यावर टाकली. वरून पाणी लावलं. खालची भाकरी शिजत आली की उलटली. वरची भाकरी चांगली झाली होती आता. खालची ही व्यवस्थित झाली होती. पण भाकरी फुगली नाही.

आईला भाकरी जमली होती. फुगली नाही तरी न मोडता शिजली होती. पहिल्या न जमलेल्या भाकर्‍या तशाच ठेऊन दिल्या. रात्रीची जेवणं झाली. रात्री तशाच ठेउन दिलेल्या भाकर्‍या सकाळी पक्षांना टाकल्या. त्यांनीही आनंदाने (?) खाल्या.

इति इल्फ़र्ड नगरीची भाकरीची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण.
जशी ही भाकरी आईच्या मुलाला, मुलाच्या वडिलांना व इल्फ़र्डच्या पक्षांना आवडली तशी तुम्हा आम्हा सर्वांनाही आवडो.

:-)

13 June 2007

धुंद होते शब्द सारे

dhund hote shabd sare
Get this widget | Share | Track details


धुंद होते शब्द सारे
धुंद होत्य भावना
वार्‍यासंगे वाहता
त्या पुलापाशी थांब ना
सये... रमूनी सार्‍या या जगात
तिक्त व्हावेसे
परी कैसी ही प्रित ही?
धुंद होते शब्द सारे.....

मेघ दाटूनी गंध लहरूनी
बरसला मल्हार हा
चांद राती भाव गुंतुनी
बहरला निशीगंध हा
का कळॆना काय झाले
भास की आभास सारे
जीवनाचा गंध हा
विश्रांत हा
शांत हा

धुंद होते शब्द सारे
धुंद होत्य भावना
वार्‍यासंगे वाहता
त्या पुलापाशी थांब ना
सये... रमूनी सार्‍या या जगात
तिक्त व्हावेसे
परी कैसी ही प्रित ही?

06 June 2007

आता मला सर भेटतील

अभियांत्रिकी महाविद्यालयात मोघे सरांचा आज निरोप समारंभ होता. गेली ३५ वर्षे सर कॉलेजची मन लाऊन सेवा करत होते. खुप आवडते नसले तरी सर विद्यार्थी वर्गात मानले गेले होते. त्यांचा धाक होता, पण अवाजवी नव्हता. प्रात्यक्षिक चांगलं झालं की सर मार्क चांगले देत पण तेच जर जमलं नाही तर न रागावता पुन्हा समजावून द्यायचे. त्यांच्या वागण्यात बोलण्यात आणि चालण्यात एक जरब होती... एक धाक होता. त्यांच्या विषयाला वर्ग भरलेला असायचा. मोघे सर कॉलेजात एकटॆच असे होते जे वर्गात हजेरी घ्यायचे नाहीत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मुलांनी शिकण्यासाठी वर्गात यावं... हजेरी साठी नाही. सर मन लावून शिकवायचे आणि मुलं ही यायची. अचानक एखाद्याला उभं करून "हं चल पुढे काय ते सांग!" असं म्हणायला सर मागं पुढं पहायचे नाहीत. कॉलेज हे समस्यापूर्तीसाठी असतं आणि त्यामुळं मुलांनी आज काय शिकवणार आहेत हे आधी एकदा वाचून यावं हा सरांचा आग्रह असायचा. आपल्या मुलांना भरपुर वाव मिळावा यासाठी सर नेहेमी प्रयत्न करायचे. "नुसता अभ्यास करू नका लेक हो गॅदरिंग ही अटेण्ड करा असं ते म्हणायचे. आणि एखाद्या इव्हेंटला चांगला प्रतिसाद मिळत असेल तर "अरे... कोणी प्रेक्षक आहे की नाही...." असं ही तेच म्हणायचे.

लेखी परीक्षेदरम्यान जर कोणी मान वर केली तर सर त्याच्या बाजूला जाऊन उभे रहायचे. त्यामूळे एकदा खाली घातलेली मान पेपर संपल्यावरच वर चायची. आणि याच एका गोष्टीमुळे ते वर्गावर येऊ नयेत यासाठी सगळेजण प्रार्थना करायचे....

मोघे सर म्हणजे एक प्रसन्न व्यक्तिमत्व होतं. साधी राहणी... आणि साधे विचार होते. वर्गात नोट्स काढून शिकवणं त्यांना आवडायचं नाही.एक खडू आणि डस्टर या साधनांच्या मदतीने वर्गात येणारे सर तासाच्या शेवटी विद्यार्थ्यांना भरपूर माहिती देऊन जायचे. माहितीचा जणू खजिनाच होते मोघे सर. कधीही विचारा आणि कोठेही विचारा अशी त्यांची ख्याती होती. आणि ते याच नावाने ओलखले जात... कधी ही कोठे ही..!! त्यांच्या वर्गात कोणी आगाऊपणा करायचं नाही. पण ५ ६ मिनिटं मजा करण्याची मुभा सर्वांनाच होती. सर दिलखुलासपणे सामील व्हायचे. पण ५ मिनिटांपेक्षा जास्त नाही. सरांची एक नजर वर्गावरून फिरताच सगळे शांत व्हायचे. एक हसरी नजर टाकून सर पुन्हा शिकवायला लागायचे.

३५ वर्षे निर्व्याज सेवा करून सर आज रिटायर होत होते. त्यांच्या चेहर्‍यावर रिटायरमेंट नको असं स्पष्ट दिसत होतं. कॉलेजच्या वातावरणात त्यांचं अख्खं आयुष्य गेलं होतं. येथे आलेला प्रत्येक विद्यार्थी त्यांना माहित होता..... कॉलेज करणारा आणि न करणारा ही!

आज सभागृह खचाखच भरलं होतं. प्रथम वर्ष ते अंतिम वर्ष प्दवी आणि पदव्युत्तर शिक्षणाचे सगळे विद्यार्थी हजर होते. मनं भरून आली होती. सगळं आठवत होतं. कडू गोड आठवणी येत होत्या. कोणाला कडक मोघे सर आठवत होते तर कोणी म्हणत होतं,"आम्हाला सरांनी रागावलं नाही." संमिश्र भावनांनी सभागॄह भरलं होतं. मनात चलबिचल होती. वातावरण शांत होतं. नेहमी आपल्या वक्तृत्वानं सभागृह दणाणून सोडणारे विद्यार्थी ही आज शांत होते.थोडी फार कुजबुज होती पण रोजच्या सारखा दंगा आज नव्हता.

पोडियम वर सरस्वतीचा शुभ्र फुलांचा हार लावलेला फोटो ठेवला होता. मंद तेवणार्‍या ज्योती जवळ मोगर्‍याची उदबत्ती लावलेली होती. टेबल खुर्च्या मांडून ठेवल्या होत्या. संध्याकाळी साडेचार वाजता होणार्‍या निरोप समारंभाला विद्यार्थी चार वाजल्यापासूनच जमले होते. सगळे जण आपापल्या जागी बसले होते. साडे चारच्या आसपास प्रिंसिपल सर, मोघे सर व त्यांच्या पत्नी आणि सर्व डिपार्टमेंटचे सर व मॅडम सभागृहात आले. टाळ्यांच्या कडकडाटात सरांचं स्वागत झालं. हा कडकडाट सर खुर्चीवर बसले तरी सुरूच होता. सरांच्या चेहर्‍यावर नेहमी प्रमाणे स्मित हास्य होतं.

या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रांवृता ।
या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना ॥
या ब्रह्माच्युतशंकरै प्रभुतीभि: देवै सदा वंदिता ।
सामांपातु सरस्वती भगवती निःशेष जाड्या पहा ॥

शांत सरस्वती स्तवन गायल्या गेलं. मोघे सर आणि मॅडम शांत बसले होते. मॅडमचे डोळे बंद होते. जणू त्या हे स्तवन रोमा रोमात साठवून घेत होत्या. साधी कॉटनची नऊवार, मानेवर घातलेला आंबाडा आणि त्यावर एक फुलांचा साधा हार, कपाळावर मोठं ठसठशीत कुंकू. सावळ्या मोघे मॅडम सगळ्यांच्याच नजरेत भरल्या होत्या. जितक्या त्या शांत होत्या तेवढेच सर ही होते. तो शांत चेहरा सर्वांनाच परिचित होता. साधी शर्ट पॅंट, आणि डोळ्यावर चपखल बसणारा चष्मा. केस एकदम बारिक कापलेले. स्तवन संपलं आणि मॅडमची तंद्री मोडली. शांत चेहर्‍यानं एकदा डोळे बंद करून त्या काहीतरी पुटपुटल्या. मोघे सरांची खाली घातलेली मानही वर झाली.

मुलींची प्रतिनिधी धनश्री पुढे आली. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच स्वागत करण्यात आलं. मोघे सरांबद्दल विस्तृत माहिती तिनेच दिली. सर दुहेरी पदवी धारक होते. एक पदवी electrical engineering ची आणि दुसरी electronics engineering ची. शिवाय artificial intelligence चा विशेष अभ्यास होता. त्यांचे वेगवेगळे पुरस्कार मिळाले होते. त्यापैकी एक म्हणजे आदर्श शिक्षकाचा राष्ट्रपती पुरस्कार.

नाव घेताच प्रिंसिपल सरांनी माईकचा ताबा घेतला. आणि हसतच म्हणाले,"आज मोघे सर बोलतील आपण फक्त श्रोते.... पण मोघे सर बोलायच्या आधी काही विद्यार्थ्यांना आपलं मन मोकळं करायचं आहे. काही कडू गोड आठवणी सांगायच्या आहेत." आणि सर मागे सरकले. प्रथम वर्ष ते अंतिम वर्षाच्या काही विद्यार्थ्यांनी आपापली मनं मोकळी केली.

काही जणांना कडक सर आठवले तर काही जणांना मायेने भरलेले सर... काही जण बोलता बोलता गप्प झाले. वेगवेगळी चर्चासत्र गाजवणारे विद्यार्थीही कधी नव्हे ते अबोल झाले होते. २० २५ मिनिटात सगळी भाषणं आटोपली. आता नजरा मोघे सरांवर खिळल्या. सरांचे शब्द ऐकण्यासाठी सभागृह शांत झालं. पिनड्रॉप सायलेन्स होता.

मोघे सर उठून आले. त्यांची नजर सर्वांवरून फिरली...."मित्र हो...!!" अशी सुरुवात झाली आणि इतका वेळ शांत अविचल असलेल्या सभागृहावर एक स्मित हास्याची लहर उमटली. बालपण, शिक्षण, नोकरी, लग्न हे सगळं सांगत "मी कसा घडलो" हे सांगितलं. त्यांनी मिळालेली साथ, मदत, संधी, पडलेले आणि केलेले कष्ट, आणि अनेक वेळा आलेले अपयश हे सगळं नमूद केलं. सगळ्यांप्रमाणेच त्यांनी ही अपयशात खचून जायचं नाही हे सांगितलं. "मी ही खचलो होतो." मग पुन्हा कसा उभा राहिलो" हे ही सांगितलं. "अपयश येतच असतं रे... पण ते येणार आणि मी त्याला सामोरं जाणार याची मानसिक तयारी ठेवली की सगळं सहजगत्या पार पडतं." सर खुप काही सांगत होते. घरची मंडळी, मैत्र, सभोवतालचे लोकं सगळ्यांचा आवर्जून उल्लेख करत सुरुवातीच्या कठीण आणि कष्टाच्या काळात, नंतरच्या घाई आणि धावपळीच्या दिवसात आणि रिटायर व्हायच्या मनःस्थितीत मॅडमची मिळालेली साथ त्यांनी आवर्जून सांगितली. मॅडमच्या चेहर्‍यावरचं हसू सगळ्यांनीच पाहिलं. बोलता बोलता सव्वा तास कसा संपला कळलंच नाही. सलग बोलून सरांना दम लागला होता. पाण्याचा घोट पीत सर म्हणाले, "आता मला कळलं मी का रिटायर होतोय..! सलग बोलणं होत नाही.. दम लागतो.... आणि मला शक्य तेवढी सेवा मी केली. आता थोडा वेळ 'हिला' द्यावा म्हणतोय..." त्यांनी मॅडम कडे पाहिलं. "मी आता बसतो मुलांनो" असं म्हणत सरांनी आटोपतं घेतलं. धनश्री पुन्हा आली. सर्वांना अनपेक्षित तिनं मॅडमना बोलायची विनंती केली.

दोन्ही खांद्यावरून पदर सावरत मॅडम उठल्या. डोळ्यावरचा चष्मा पदरानी पुसत त्या जवळ आल्या. "मला जरा हे खाली करून देता का? मला जमत नाहीये." त्यांनी माईक खाली करून देण्याची धनश्रीला विनंती केली. "सरांचा आणि माझा सहवास हा तुमच्या आणि सरांच्या सहवासापेक्षा जास्त आहे. गेली ३५ वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतो आहोत, एकमेकांच्या सोबत आहोत. सुखात दुःखात आणि आनंदात आम्ही दोघेच सोबत होतो. सरांना कॉलेज नेहेमीच पहिलं होतं.... होतं नाही खरं तर अजूनही आहेच म्हणेन मी. आज त्यांची सेवानिवृत्ती... पण सकाळी त्यांच्या मनाची होत असलेली चलबिचल मी पाहिली आहे. उद्यापासून हे कॉलेज, विद्यार्थी, कॅम्पस दिसणार नाही याची खंत त्यांच्या मनात आहे हे दिसत होतं. चेहर्‍यावरून शांत दिसणारे सर आतून किती बेचैन आहेत हे मला जाणवत होतं..!" मॅडम बोलत होत्या.

"त्यांना इतकं बेचैन कधी पाहिलं नाही मी. मला आठवतयं... १० १२ वर्षापुर्वीची आठवण आहे.... तेजस राणे.. हो!! तेजसच होता तो. वर्गात लक्ष न दिल्यानं सरांनी त्याला लेक्चरभर उभं केलं होतं. सर लेक्चर संपल्यावर निघून गेले पण तेजसनं मनात राग धरला होता. पुढील सलग काही लेक्चर्सना तो नव्हता. सरांच्या लक्षात आलं होतं. पण ते काही म्हणाले नव्हते. पण एक दिवस कॉरिडॉरमध्ये तेजसनं त्यांना अडवलं. त्यांना खुप बोलला... घरचे किती मोठे आहेत व तुम्हाला धडा शिकवतो असं काही बोलला. सरांनी मला काही सांगितलं नाही पण काहीतरी झालं आहे हे मला जाणवत होतं. तेजस खुप बोलला होता. कॉरिडॉर मधील विद्यार्थ्यांना सरांच्या रागाची भिती वाटत होती. पण सर काही बोलले नाहीत,"तू उद्या वर्गात भेट" एवढंच म्हणाले. दुसर्‍या दिवशी सर्वांनाच अपेक्षित तेजस वर्गात आला. सर म्हणाले,"तू उर्मट नाहीस तर होण्याचा प्रयत्न का करतोस? तू तसा असतास तर मला तुम्हाला धडा शिकवतो असं म्हणायच्या ऐवजी तुला धडा शिकवतो असं म्हणाला असतास! सगळा वर्ग स्तब्ध होऊन पाहत होता. तेजस मुकाट खाली बसला. आपण मोघे सरांकडून हरलो हे त्याला कळलं होतं. गेली ४ वर्ष एकाच वर्गात शिकणार्‍या तेजसने त्या वर्षी बॅकलॉगचे ३ विषय काढले होते. सरांकडे पेढे घेऊन आला होता तो. तो गेल्यावर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मला हे सगळं कथानक सांगितलं होतं. मी हैराण झाले. मनात एक भिती आली.... तेजसने खरचं काही केलं असतं तर!!!" तोच तेजस आज सभागृहात आला होता.... सरांना भेटला होता... भरभरून बोलला होता.
एक विद्यार्थी आम्ही दर वर्षी दत्तक घ्यायचो. म्हणजे दरवर्षी त्या विद्यार्थ्याचा अभ्यासाचा व परिक्षेचा खर्च आम्ही करायचो. अर्थात तेच विद्यार्थी जे हा खर्च उचलू शकत नव्हते. त्यांना वह्या, पुस्तकं व परिक्षा फी आम्ही करतो. पण त्याला एक अट सरांनी ठेवली होती. जर सगळे विषय पास झाले नाही तर पुढच्या सेमिस्टरपासून ज्याचा त्याचा खर्च ज्यानी त्यानी करायचा. त्या भितीनं का होईना आमचे दत्तक विद्यार्थी पटापट पास झाले. काही कोडगे मिळाले पण नंतर सुधरले हळू हळू. काही तसेच राहिले"
"मला आठवतयं एका वर्षी कॉलेज मध्ये फॅशन शो करायचं ठरवलं होतं. सगळ्याच कामाला अडचणी असतात. तसंच या शोला ही अनंत अडचणी आल्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयोजक (स्पॉन्सर्स) मिळत नव्हते. फंड मिळत नव्हता. तेंव्हा ठरत होतं की विद्यार्थ्यांनीच पैसे जमा करायचे. सरांना कळलं. आणखी ४-५ सरांनी व मॅडमनी मदतीची तयारी दाखवली. काही स्टाफच्या ओळखीचे दुकानदार होते त्यांनी स्पॉन्सर्स मिळवून दिले. काही जणांच्या ओळखीने शो साठी कपडे स्पॉन्सर झाले. काहींनी मिळून कोच मिळवून दिला. आपल्यासाठी स्टाफ झटतोय हे विद्यार्थ्यांना कळलं होतं. प्रत्येकानं जिवापाड मेहनत केली होती. पहिला शो होता. आजच्या इतका सफाईदार झाला नसला तरी तो गाजला नक्की होता. चर्चेत आणि पहिल्या शो मधे भाग घेणार्‍यांच्या लक्षात नक्की राहिल असा झाला होता. हाच फॅशन शो आज ही सुरू आहे. खुप बदल झाला आहे. एक सफाईदारपणा आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ आहे कोण चांगलं प्रदर्शन करतो, कोण किती मोकळं आणि आत्मविश्वासानं स्टेजवर वावरतं.... एक ना अनेक.....!!!"
मॅडम आठवणी सांगत होत्या. एकामागून एक आठवणी त्यांच्या पोटलीतून बाहेर येत होत्या. जणू त्यांनी आठवणींचा खजिना मोकळा करायचा ठरवला होता. फक्त फॅशन शो नही तर असे स्पॉन्सर्स त्यांनी खेळासाठी व ग्राऊंडसाठी उपलब्ध करून दिले होते. अर्थात त्याला स्टाफ मेंबर्सची मदत मिळाली. त्यांच्या मदतीशिवाय सर हे करू शकले नसते हे मॅडमनी आठवणीने नमूद केलं.
एका वर्षी कॉलेजमध्ये सगळ्या विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी मिळून केलेली दिवाळीची आठवण.... त्या दिवाळीत सर विद्यार्थी व पालक यांच्या अजूनच जवळ पोहोंचले होते. कॉलेजमध्ये दिवाळीचे तीन दिवस पालकमेळा आयोजीत केला होता. तिथेच जेवण तयार केल्या गेलं... कॅम्प फायर रात्र साजरी केली गेली. एकाच दिवशी पूर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तरेकडील वेगवेगळ्या चवीचं अन्न खायला मिळालं होतं.
किल्लारीला झालेल्या भूकंपात मदत कार्यात सरांनी घेतलेला पुढाकार, कॉलेजला फंडाची गरज असताना फी वाढीच्या ऐवजी वेगवेगळे कार्यक्रम करून फंडाची काही रक्कम सरांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने उभी करून दिली होती. एकीकडे फी वाढ टळली होती व दुसरीकडे फंड जमला होता.
"एक ना अनेक.... सरांच्या अशा गोष्टी जेंव्हा आठवतात ना तेंव्हा मी किती भाग्यवान आहे असं वाटतं!!!" पाठीवरचा पदर घट्ट करत त्या म्हणाल्या.
मॅडमनी पाण्याचा एक घोट घेतला व त्या म्हणाल्या,"सर कॉलेज मधून सेवानिवृत्त होत आहेत याचा अर्थ असा नाही की त्यांचे विचार व त्यांनी दिलेली तत्वं हे ही निवृत्त होत आहेत. ते तुम्हाला जपायचे आहेत, पुढे चालवायचे आहेत. सरांचा ठेवा तुमच्या जवळ आहे. आमचे आशीर्वाद आहेत. आमच्या घराची दारं नेहेमी तुमच्यासाठी उघडी आहेत. कधी ही या तुमचं स्वागतच आहे!"
"या ३५ वर्षाच्या आमच्या सहवासात मला सर माझे म्हणून खुप कमी भेटले. जे दिसले, जे अनुभवता आले ते तुमच्या महाविद्यालयाचे मोघे सर! पण माझा सखा, माझा मित्र किंवा आजच्या तुमच्या भाषेत लाईफ पार्टनर असे ते मला कमीच भेटले. आज सर सेवानिवृत्त होत आहेत. इतक्या वर्षात ते उद्या पहिल्यांदाच घरी असतील. आज काय काय कामं करायची आहेत हे न सांगता सकाळचा चहा होईल. कॉलेजमध्ये आज काय काय झालं हे न सांगता रात्रीची जेवणं होतील. त्यांना असं पाहताना मला काय वाटत असेल या गोष्टीचा मी विचारही केला नाहीये.... करू शकत नाहीये."

मॅडमचा आवाज कापरा झाला होता. सभागृह शांत चिडीचुप झालं होतं.... काही वेळेच्या शांततेनंतर मॅडम पुन्हा बोलत्या झाल्या,"आज ३५ वर्षांनी मला एका गोष्टीचा खुप खुप मनापासून आनंद झालाय.... होतोय... आता सर मला भेटतील.... या ३५ वर्षात मला कमी भेटलेला माझा सखा, माझा मित्र मला भेटेल.... माझा लाईफ पार्टनर मला भेटेल..." मॅडमने जणू काय? बरोबर आहे ना? अशा आविर्भावात सरांकडे पाहिलं. चश्मा सावरत सरांनी मान डोलावली. मॅडमने माईकचा ताबा धनश्रीकडे दिला.

समारंभाची सांगता अल्पोपहाराने झाली. सर सगळ्यांशी बोलत होते. हसत होते.... त्यांच मन मात्र मॅडम वाचत होत्या. रात्री काय काय बोलायचं याचा विचार करत होत्या.


..समाप्त

31 May 2007

मेरी दुनिया

एक शांत रम्य संध्याकाळ! शांत समूद्र शांत लाटा... किनार्‍याकडे झेपावणर्‍या... नारळीच्या झाडातून वाहणारा वारा.... सगळं शांत होतं. मानसी एकटीच उभी होती.... न जाणे किती वेळ..... रेडियोवर वो लम्हेचं गाणं सुरू होतं... चल चले अपने घर ऎ मेरे हमसफर... "काय गं? कसला विचार करतेस?" अभीच्या या वाक्यानी मानसी भानावर आली. अभीच्या हातातला कॉफीचा मग घेत मानसीनं मान नुसतीच हलवली.
मानसी आणि अभी.... लहानपणापासूनचे मित्र. एकाच शाळॆत आणि एकाच वर्गात शिकलेले. दोघंही अभ्यासात अगदी हुषार नसले तरी ८५ ते ९०%च्या घरात होते. १२वी नंतर त्यांनी मिळूनच ईंजिनिअरिंगला प्रवेश घेतलेला. अभीला कंप्युटर शाखा मिळाली तर मानसीला ईलेक्ट्रोनिक्स. दोघंही फर्स्ट क्लासचे विद्यार्थी. लहानपणाची ओळख नंतर प्रेमात बदलली हे फायनल ईयरच्या गॅदरिंग दरम्यान कळलं. कळलं म्हणण्यापेक्षा मित्र मैत्रिणींच्या चिडवण्यानं दोघं वेगळे झाले. आपण बोललो नाहीत की नंतर आठवण येते आणि हे जरा विचित्र आहे असं दोघांनाही जाणवलं. मानसीनं तसं बोलून दाखवलं... आणि अभी.... तो मात्र विचारून मोकळा झाला. "मानसी मी तुझ्या प्रेमात पडलोय... तू पडली आहेस का माझ्या प्रेमात?" मानसी दंग होऊन पाहतच राहिली. ती पुढं काही बोलणार त्याच्या आत अभी बोलला... "मी लगेच "हो म्हण" असं म्हणत नाहीये. तू विचार कर आणि मला सांग. कधी कुठे आणि कसं सांगायचं ते तू ठरव." नेहेमी प्रमाणे तिच्या खांद्यावर हात ठेवून अभी शांत निघून गेला. रोज जाताना एकदा मागे वळून पाहणारा अभी आज वळला नाही. तो गेला त्या वाटेकडे मानसी खुप वेळ पाहत होती. अगदी तो नजरेआड होईपर्यंत. रोज एकत्र जाणारे दोघं आज वेगळे जात होते. ग्रुपला जाणवलं होतं की काहि तरी झालय... कुठं तरी बिनसलय. पण कोणी काही म्हणालं नाही. त्यांची मैत्री पुढे गेली असेल याचा कोणी विचारही केला नाही. सगळे अजूनही एकत्र बसत होते. त्यावेळी त्यांच वागणं वेगळं नसायचं. म्हणजे कोणाला तीळमात्र शंकाही आली नाही. पण आज दोघांना वेगळं जाताना पाहून सगळे चकित झाले होते.
दुसर्‍या दिवशी सगळ्य़ांनीच दोघांना घेरलं. "काय रे तुमचं भांडण झालं नाही ना?" एक ना अनेक सगळ्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. अभी नुसताच हसला.... मानसी कडे पाहिलं आणि तो गप्प बसला. " हे काय चाललय तुमचं?" चैताली वैतागून म्हणाली, " आपला ग्रुप एक आहे आणि इथं भांडणं सुरू करू नका.".... मानसी काही बोलणार इतक्यात अभीनं मौन तोडलं. "आमचं भांड्ण झालं नाहीये. बस्स थोडे दिवस बोलणार नाही आहोत. एवढच काय ते.!!!" अभीच्या या शांत उत्तरावर मानसी चपापली. बॉल आपल्या कोर्टात त्यानं सहज टाकलाय हे तिच्या लक्षात आलं. आणि आपल्या या अबोल्याचा जेवढा त्रास स्वतःला होतोय तेवढाच त्यालाही होतोय हे तिला जाणवलं. घरी कसं सांगावम या विचारात मानसी कॉलेज मधून निघाली. घरी अभी सगळ्यांनाच माहित होता. त्याच्याबद्दल घरी सगळे चांगलं बोलतात, सगळे त्याच्याशी चांगलं वागतात हे तिला माहित होतं. पण आपल्या सगळ्यात चांगल्या मित्राच्या प्रेमाचा स्विकार करावा की करू नये या मनःस्थितीत होती ती. घरी सगळे चिडणार हे तिला वाटत होतं.
दरम्यान डिग्री संपली. आणि सगळेच आपापल्या मार्गी लागले. पुढले काही महिने दोघं अबोलच होते. अभीनं तिला कधी विचारलं नाही ना तो घरी यायचं थांबला. त्याचा वावर सहज होता. मानसीला काय करावं कळत नव्हतं. आणि या मनःस्थितीत सुलू मावशी धावून आली. तिनं सहजच अभीचं स्थळ सुचवलं आणि कोणी नाही म्हणू शकलं नाही. आणी नाही म्हणण्यासारखं काही नव्हतं ही. बोलाचाली झाल्या, साखरपुडा झाला, लग्नं ही पार पडलं. दोघांची नोकरी सुरू झाली. अभी आणि मानसीचा दिवस नोकरीत जायचा. संध्याकाळी दोघं एकत्र मिळूनच काम करायचे.
४ ५ वर्षात दोघंही नोकरीत जम बसवले होते. अभीजित टींम लिड झाला होता. त्याच्य़ स्वप्न विस्तारली होती. सकाळी साडे सात ते रात्री ९ पर्यंत तो नोकरीतच असायचा. घरी आलं की तो आधी सारखा तिच्या भोवती रुंजी घालायचा नाही. त्याचं आपलं काम आणि नोकरीच्या गप्पा असायच्या. मानसी विचार करायची मी कुठं चुकते आहे का?
आणि याच विचारात ती आज उभी होती. हा शांत समूद्र आपण किती वेळा अनुभवला आहे. किती वेळा त्याचा आवज ऐकला आहे, किती वेळा लाटेसोबत खेळलो आहोत... त्या पाण्यात भिजलो आहोत... पण आज हे सगळं वेगळं वाटतय! अभी दुरावल्यासारखा वाटतोय. माझा अभी....!! माझ्यासोबत होता तो, माझा मित्र, माझा सखा आज असा दुरावल्यासारखा वाटतोय. मला पाण्यात पडू नये म्हणून सगळ्य़ांसमोर बीचवर हात धरणारा अभी आज काल थोडा लांबूनच चालतोय.... आपल्याच विचारात. काही विचारलं तर म्हणे भविष्याचा वेध घेतोय!! विचार करतोय... "असं काय रे अभी?" आज मानसी न राहवून बोलली. "का?? काय झालं?" अभी म्हणाला. "अरे, किती दिवस असा अबोल राहणार आहेस?" "मी? छे गं तुझं आपलं काही तरीच सुरू असतं!!" "तसं नाही रे अभी. पण किती दिवस असा कामाच्या मागे धावणार आहेस? आपण किती दिवसात निवांत बोललो नाही. हात धरून बीच वर चाललो नाही..... मानसी पुढे बोले पर्यंत अभी पट्कन पुढे आला. मानसीचा हात धरून म्हणाला,"मी हे आपल्यासाठी, आपल्या घरासाठीच करतोय ना." तिच्या डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाला,"जास्त काम केलं की जास्त पैसे मिळतात. मग सेव्हींग सहज बाजूला पडते. खर्च करायला हात सैल राहतो. आपलं बालपण काटकसरीत गेलं. मग आता थोडे जास्त कष्ट केले की थोडी करमणूकीसाठी मोकळा खर्च करता येतो." अभी बोलत होता. मानसी मन घट्ट करून ऐकत होती. "अरे पण या पैशाच्या मागे किती दिवस पळायचं?"
लग्नानंतर सगळं खुप छान सुरू होतं. पण मानसी एकटी पडली होती. आज खुप दिवसांनी अभीनं शनिवारी सुट्टी घेतली होती. दोघं समूद्रावर फिरायला गेले होते. कित्येक दिवसांनी हातात हात घालून गेले होते दोघं. मानसी हळवी झाली होती. अभीचा हात तिला सोडावासा वाटत नव्हता. एक दोन वेळा त्यानं सोडवून घ्यायचा प्रयत्न केला होता. पण मानसीनं घट्ट धरून ठेवला होता. कसं बोलावं यासाठी ती तयारी करत होती. शब्द शब्द जुळवण्याचा प्रयत्न करत होती. तिला वाक्य जुळवता येत नव्हतं. "तू मला सगळं आयुष्य मदत केलीस रे!! कशाची कमी भासू दिली नाहीस. तुला कोणीही पैशाचा तगादा लावला नाहीये. अभी, घरी सगळे तुझ्याबद्दल विचारतात. तुझी काळजी घेतात. मी आहेच रे पण आई बाबा सुद्धा!!! माझी नोकरी आहे तुझी नोकरी आहे. आपला पगार मिळून निवांत मोकळा खर्च करू शकतो रे अभी. अरे, ही वाट जिच्यावर तू चालला आहेस ना ती तुला आम्हा सगळ्यांपासून दूर नेते आहे. अरे पैसे कमावणं आणि तो खर्च करणं हे स्वाभाविक आहे. पण त्यासाठी इतरांच्या मनाचा विचार कर ना. माझा विचार कर... आपण गेल्या कित्येक दिवसांत एकत्र बसून बोललो नाहीत. ना तू मला विचारलसं तू कशी आहेस म्हणून.... आपण मिळून बाहेर गेलो नाहीत. आपलं ऑफिस, मिटींग्स, टुर्स.... वेळ घालवतोय असं म्हणायचं नाहीये मला. पण मला भिती वाटतिये तू दुर जातोयस माझ्यापासून......" न बोलावसं वाटणारं वाक्य शेवटी मानसी बोलून गेली.
खुप वेळा तिच्या मनात हे वाक्य येऊन गेलं होतं. पण ती बोलली नव्हती. आपल्याच विचारात मानसी पुढे गेली. अभीनं हात कधी सोडवून घेतला हे तिला कळलं ही नाही. समूद्राची लाट पायावरून गेली. थंड पाण्याच्या स्पर्शानं ती भानावर आली. अभी मागं राहिल्याचं तिच्या लक्षात आलं. वळून पाहते तो अभी दोन शहाळी घेउन येत होता. खुप दिवसांनी शहाळं शेअर केलं. मानसीनं हात धरला नव्हता. अभीनं पुढे होऊन हात धरला. एका स्टॉलवर गाणं लागलं होतं....

पत्थर के ईन रस्तोंपे
फुलों की एक चादर है
जबसे मिले हो हम को
बदला हर एक मंजर है!!

22 May 2007

मी टेनिस खेळले..

रवीवारी आमच्या "अहों"ना ऑफिसचं काम लागलं होतं. एका प्रोजेक्ट्चं रिलिज होतं. संध्याकाळी ४पर्यंत काम संपलं आणि मित्राचा फोन आला "बायको पोरासोबत ये पार्कला आम्ही पण येतोय". आम्ही तयार होऊन गेलो. आणि मला खेळावं लागेल याची सुतराम कल्पना नसल्यानं मी पंजाबी ड्रेस घालून गेले होते. पण नेहेमी पार्कला गेले की मी किमान १५ मिनिटं ब्रिस्क वॉक घेते. त्यामूळे ड्रेस कोणताही असला तरी मी स्पोर्ट शुज नक्की घालते. चालत रमत गमत मी आमचे हे आणि चिरंजीव पार्कमधे पोहोंचलो. मित्राला यायला थोडा वेळ होता, तोपर्यंत चिरंजीवाच्या मागे आमचा वॉक झाला. मित्र आणि त्यांचा चिरंजीव आले आणि यांनी डिक्लेअर केलं," आम्ही टेनिस खेळायला चाललो तू पोरांवर लक्ष ठेव...." आणि मला दोन मुलांच्या तावडीत सोडून या दोघांची गच्छंती झाली टेनिस कोर्टाकडे. मी मनात म्हणाले "लवकर थकू दे देवा दोघांना" कारण दोन मुलांना सांभाळणं अशक्य नसलं तरी अवघड होतं....

थोडावेळ खेळून झाल्यावर आमच्या चिरंजीवाला पप्पांची आठवण आली... आणि ती संधी साधून मी मोबाईलवरून कुठल्या कोर्टावर खेळत आहेत याचा मागमुस लावला. एका मुलाला सायकलवर बसवून आणि दुसर्‍याला हातात धरून आम्ही टेनिस कोर्ट क्रमांक १ ला पोहोंचली. आणि माझी टेनिस कोर्टाजवळ आगमन झालं....

यांनी गेम डिक्लेअर केला होता त्यामुळे त्यांचा गेम पुढे चालू ठेवायचा मला चान्स मिळाला. आणि रॅकेट हातात घेऊन स्टेफी ग्राफ़च्या आविर्भावात (पंजाबी ड्रेस आणि स्पोर्टस शुज घालून :)) मी कोर्टावर एंट्री केली... एकवार सभोवताली नजर टाकली(जशी स्टेफी टाकते तशी...) टाळ्यांचे आवाज डोक्यात घुमले..... "so shud I serve now?" या प्रश्नानं मी भानावर आले. मी 'स्टेफी' नसून 'सोनल' आहे या वास्तवात आले. थोडावेळ गेम छान चालला.... मला खेळायला जमत होतं. माझे रिटर्न शॉट्स जिथे पाहिजे तिथेच पडत होते... आणि माझ्याकडे आलेले शॉट्स मला व्यवस्थित रिटर्न करता येत होते ... एकूणच खेळ चांगला चालला होता... आणि मला माझंच कौतुक वाटत होतं... पुन्हा स्टेफी झाल्यासारखं वाटत होतं... आणि इथेच अतिविश्वास नडला.... एका रिटर्नला माझे शुज उचलल्याच गेले नाहीत... जणू जमिनीला चिकटून बसले होते. आणि इतका वेळ मनोभावे खेळणार्‍या सोनलरूपी स्टेफीने कोर्टावर लोळण घेतली...

गुडघा खरचटला होता जोरात.... हाताचा तळवा सोलला होता. मला जोरात लागलं आहे याची जाणीव झाली होती... पण मनातली स्टेफी स्वस्थ कशी बसेल???? "काही नाही" असं म्हणत मी पुन्हा खेळले.... यांच्या मित्रासोबत एक गेम खेळून दुसरा आमच्या अहोंसोबत खेळायला सुरू केला आणि अर्ध्या गेममध्ये गुडघ्यानी साथ सोडली. जाम ठणक बसली होती.... इतका वेळ "काही नाही" म्हणणारं माझं स्टेफीरूपी मन आता वास्तवात येऊन सोनल बनलं होतं.... गेम सोडून घरी यायचा निर्णय घेतला...

परतीच्या वाटेवर स्टेफी नसलेली सोनल लंगडत चालायला सुरू झाली होती... गुडघा आता कोणत्या अवस्थेत दिसणार याचा विचारही करवत नव्हता.... सलवारला रक्ताचे २ ३ डाग होते. तिथे बघवत नव्हतं. घरी येऊन चिरंजीव आणि अहोंनी ड्रेसिंगचं सामान काढलं.... "चला आता स्टेफी ग्राफची ड्रेसिंग करू" या डायलॉगनी ड्रेसिंगची सुरूवात करण्यासाठी गुडघा पाहिला की हादरूनच गेले.... दोन ठिकाणी सॉलिड जखम झाली होती... खोल जखम होती... शिवाय ३ ४ ठिकाणी हलकं खरचटलं होतं.... अल्कोहोल वाइप्स लावले आणि तोंडातून जोरात किंकाळी बाहेर पडली.... खुप आग झाली.... कापूस ठेऊन मग रात्री झोपले.

सकाळी पाय ठणकत होता. तळवा पण हुळहुळत होता.... दिवस लंगडत काढला... चिरंजीवांकडून दिवसभर थोडी फार सेवा झाली. संध्याकाळी पुन्हा ड्रेसिंग करताना जखमेची "खोली" दिसली... इथे छोट्या छोट्या जखमांना दवाखान्यात जाता येत नाही.. जर प्रथमोपचारानं दुरुस्ती नाही झाली तरचं तेथे जाता येतं.... त्यामुळं घरीच सगळं करावं लागणार होतं.... दोन मोठ्या जखमांपैकी एकीत पू होण्याची शक्यता यांनी वर्तवली... ड्रेसिंग करताना पुन्हा एकदा आरडा ओरडा किंकाळ्या झाल्या... आणि शेवटी जखम मोकळी ठेवायचं ठरवलं....

लागल्यामुळं लाड झाले... रात्री पिझ्झा मागवला... सकाळी जेवायची घाई करू नकोस मी बघतो असं प्रेमळ आश्वासन मिळालं.... आणि मी ठणकता पाय घेऊन निद्राधीन झाले... रात्री स्वप्नात स्टेफी आली होती.... पाय कसा आहे विचारत होती... आणि मी "काही नाही गं! बस ना!" अशा प्रेमळ गप्पा मारत होते....

02 May 2007

निर्वाणषटकावरील विवेचन

आद्य श्री. शंकराचार्यांनी अनेक संस्कृत स्तोत्र, षटक लिहिली आहेत. त्यात त्यांचे वेदसारशिवस्तव, शिवनामावल्याष्टकम्, आणि निर्वाणषटकम् प्रसिद्ध आहेत. चिदानंद रुपम् शिवोहम् शिवोहम् हे त्यांचे निर्वाणषटक. त्यालाच आत्मषटक असेही म्हणतात.

यामागची कथा अशी की, एकदा शंकराचार्य आपल्या गुरूकडे गेले. गुरू आपल्या पर्णकुटीत बसले होते. बाहेरची चाहूल लागताच त्यांनी आतून विचारले,"कोण आहे?" आपल्या गुरूच्या या प्रश्नाचे श्री. शंकराचार्यांनी जे उत्तर दिले ते आत्मषटक, निर्वाणषटक या नावाने प्रसिद्ध आहे.

सर्व सामान्य माणसाप्रमाणे,"मीच आहे" असे उत्तर न देता गुणातीत स्थितप्रज्ञासारखे त्यांचे उत्तर, हे आत्मषटक. हे निर्वाणषटक आपल्याला खुप काही शिकवून जाते. त्यांच्या या आत्मषटकाचे वैशिष्ठ्य म्हणजे पहिल्या तीन ओळीत ते मी कोण नाही हे सांगतात व चौथ्या ओळीत ते खरे कोण आहेत हे एकाच शब्दात पुन्हा पुन्हा सांगतात. त्यामुळे त्यांच्या या स्तोत्राचा आपल्या मनावर विशेष प्रभाव पडतो. त्यांचे वेगळेपण मोठेपण महानपण सर्वच भव्य दिव्य आहे हे समजून येते.


मनोबुध्यहंकार चिताने नाहं । न च श्रोतजिव्हे न च घ्राणनेत्रे ।
न च व्योमभूमी न तेजू न वायु । चिदानंदरुप शिवोहं शिवोहं ॥ १ ॥

या श्लोकात पहिल्या ३ ओळीत ते काय नाहीत ते सांगत आहेत. आपले शरीर हे अष्टधा प्रकृतीचे बनले आहे. त्यात पंचमहाभूते ज्यात पृथ्वी, आप, तेज, वायू, व आकाश यांचा समावेश होतो. तर सूक्ष्म तत्वात मन, बुद्धी व अहंकार यांचा समावेश होतो. म्हणजेच पंचमहाभूते व मन, बुद्धी व अहंकार यांनी हा देह बनला आहे. या पंचमहाभूतांपासून बनलेला हा देह शेवटी यातच विलीन होतो. म्हणजे ज्याचे घेतले त्यालाच दिले. आपले काही नव्हतेच. पंचमहाभूतातून आले आणि तेथेच गेले. जे आपले नाही त्याला आपले म्हणणे अयोग्य. ती एक प्रकारची चोरीच. तेंव्हा ज्याचे त्याच्या जवळ दिल्यावर आपल्या जवळ या नश्वर देहाचे काही उरतच नाही. त्यामूळे या देहाचे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय असं काहीच त्यांचे नाही. ज्या नाक, कान, डोळे, जीभ, व त्वचा या मूळे जे सूख किंवा दुःख मिळाले ते ही माझे नाही. सुख आणि दुःख या मन, बुद्धीच्या भावना. त्या जर जाणवत नाहीत तर अहंकाराने येणारा मी पणा ही जाणवत नाही. आणि त्यामूळेच त्यांच्यातील (शंकराचार्यातील) गुणातीत, स्थितप्रज्ञ पुरूष जाणवतो. जे आपलं नाही त्याला शंकराचार्य आपलं म्हणत नाहीत. मग उरलं काय? ह्या चराचर सृष्टीत दोनच गोष्टी आहेत एक देह दुसरा देही, एक शरीर दुसरा शरिरी, एक देह दुसरा आत्मा, एक क्षेत्रज्ञ तर दुसरा क्षेत्र, आपला नश्वर देह ही आपला नाही. म्हणजे जे आपल्या जवळ उरतो तो अविनाशी देही, आत्मा. तो मात्र आपला, ईश्वराचा अंशरूप. आणि मग म्हणून शंकराचार्य इथे म्हणतात की, मी मन, बुद्धी, अहंकार, नाक, कान, जीभ, त्वचा, डोळे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यातील मी काहीच नाही. उरलेला प्राण, उरलेला आत्मा तोच मी आहे. आणि हा आत्मा कसा आहे?? तर तो भगवंतरूप शिवरूप, सत चित आनंदरूप, शिवरूप आहे.


न च प्राण संज्ञो न वै पंचवायुः । न वा सप्तधातुर्न वा पंचकोश ।
न वाक् पाणी पादौ न चोपस्य पायु । चिदानंदरुप शिवोहं शिवोहं ॥ २ ॥

वायू हा प्राण आहे. प्राण म्हणजे एक शक्ती जी शरीरात चेतना निर्माण करते. हा प्राण सर्वच सजीवात असतो. अगदी एकपेशीय सुक्ष्म जीवांपासून प्रचंड देवमाशातही एकच प्राण, भगवंताचा अंश असतो. हा प्राण वायूच्या वर अवलंबून असतो. बहिणाबाईंनी म्हटले आहे
आला प्राण गेला प्राण
एका सासाचं अंतर
अरे जगण मरण
सासा सासाचं तंतर ॥

एक श्वास सजीवातील चैतन्य आहे की संपलं हे दाखवून देतो. म्हणूनच आपण चैतन्यमय प्राण असं म्हणतो. तर हा प्राण वायूवर अवलंबून असतो. परमात्म्याचा अंश म्हणजे आत्मा. आत्म्याने निर्माण केलेली शक्ती म्हणजे प्राण. म्हणजे प्राण हा परमात्म्याचा अशं झाला, भाग झाला. प्राणाचे पंचक व्यान, समान, अपान, उदान व प्राण होय. हे सर्व व वायू मिळून प्राण अर्थात आत्मा झाला.
शंकराचार्य म्हणतात की जो प्राण, पंचवायू म्हणजे आत्म्याचा एक भाग झाला तो आत्माच परमेश्वराचा अंश आहे. माझे काहीच नाही. तसंच हे शरीर, हा देह सप्तधातूंनी बनला आहे. ते सप्त धातू म्हणजे रस, रक्त, मेद, स्नायू, अस्थी, मज्जा, व शुक्र होय. अन म्हणजे गती, हालचाल करणे. आन म्हणजे नेणारा, गती देणारा.

प्र + आन = प्राण म्हणजे प्रकर्षाने नेणारा. हा मुख्यतः रक्तात असतो.
अप + आन = अपान म्हणजे खाली नेणारा. शरीरातील रसात अपान फिरत असतो.
उद + आन = उदान म्हणजे वर नेणारा. वर नेण्याचे काम स्नायू करतात. म्हणून उदानाचे काम स्नायूत असते.
सम + आन = समान म्हणजे समतोल राखण. हे कार्य हाडांचे.
वि + आन = व्यान म्हणजे विशेष हालचाल हे कार्य चरबी, मेदाचे असते.

शंकराचार्य म्हणतात हा प्राण, हा वायू, हा सप्त धातू, हा पंचकोश हे माझे नाही. कारण हे सर्वच देहाशी निगडीत आहेत. त्यांचा व्यवहार देहाबरोबर चालतो. देहातले चैतन्य संपले की त्यांचे कार्य ही संपणार. आत्म्याशी त्याचा काहीही संबंध नाही. आत्मा आहे तसाच राहील.

तसंच वाक, पाणी, पादौ, चोपस्य, पायु हे सर्व शरीराशी, विनाशी तत्वाशी निगडीत आहेत. त्यामुळे शरीरासोबतच त्यांचे व्यवहार चालणार. देह पडला, शरीराचा नाश झाला, शरीरातील चैतन्य निघून गेले, शरीर मृत झाले की यांचे कार्य संपले. म्हणजे जे शरीराशी निगडीत ते शरीरासोबत संपणार. शंकराचार्य म्हणतात की हे सर्व शरीरासोबतच जाणार असल्याने माझे नाहीच. तेंव्हा जे माझे नाही त्या बद्दल मला काही वाटत नाही. म्हणूनच मी माझ्या भगवंतरूप आत्म्याचा. मी फक्त शिवरूप आणि शिवरूपच आहे. माझ्या शरीराचा व्यापार चालवणारे तत्व माझे नाही. शरीराचे असित्व असलेले पाच कोष ( अन्नमय, प्रानमय, मनोमय., विज्ञानमय, आनंदमय) मी नाही. ज्या कर्मेंद्रियांच्या कर्तृत्वाचा सर्वांना अभिमान असतो तिच आपली नाहीत. आता मी काही बोलू सुद्धा शकत नाही. कारण माझी वाणी ही माझी नाही. म्हणून मी उरलो तो मंगलमय शिव!!


न मे द्वेष रागो न मे लोभ मोहौ । मदे नैव मे नैव मात्सर्यभाव ।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष । चिदानंदरुप शिवोहं शिवोहं ॥ ३ ॥

द्वेष, राग, लोभ, मोह, मद, व मात्सर्य (मत्सर) हे सर्व मनाचे भाव. पण पूर्वीच्या दोन श्लोकांवरून लक्षात येते की अष्टधा प्रकृतीच जेथे आपली नाही तेथे त्यातले मन ही आपले नाही. आणि त्या मूळेच मनाशी निगडीत भावही आपले नाहीत. अतःकरण चतुष्ट्याचं वार्‍यावर विरून गेल्याने धर्म, अर्थ, काम, आणि मोक्षही त्या चतुष्ट्या बरोबर वार्‍यावर विरून गेले. मनच मी नसल्यानं माझ्यातील अहं पुर्ण पणे गेल्याने मनाचे विकार ते सारे विरून गेले, नाहिसे झाले. त्या भावनाच गेल्याने त्यांच्यामुळे येणारे दोष ही विरून गेले. त्यामुळे दागिन्यातला दाग काढला तर १०० नंबरी शुद्ध सोनं उरतं तसं "मी पणा" विरून गेल्यानं फक्त आत्मारूप परमेश्वराचा अंश उरतो. म्हणून आचार्य म्हणतात की मनाचे सर्व विकार जाऊन मी निर्विकार झालो आहे. सत चित आनंदरूप शिवरूप बनलो आहे.

न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखम् । न मंत्रो न तीर्थ न वेदा न यज्ञाः ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता । चिदानंदरुप शिवोहं शिवोहं ॥ ४ ॥

पाप आणि पुण्य तसेच सुख आणि दुःख या भावना मनाशी निगडीत असतात. आता येथे मन पूर्णतः विकारमुक्त झाले आहे. त्यामुळे तेथे ना पाप ना पुण्याची मोजदात आहे ना सुख दुःखाचे उमाळे. मन आनंदाने भरून जाणारही नाही आणि दुःखाने व्याकूळही होणार नाही. कारण मी स्थितप्रज्ञ झालो. मंत्राचे पठन, तिर्थांचे दर्शन तसंच वेदपठण, तसंच यज्ञयाग इत्यादि क्रिया आपण वेगवेगळ्या कारणांसाठी करतो. काही लोक या क्रिया रोजच करतात. तर काही प्रासंगीक करतात. या सर्वाने मनाला शांती मिळते. व गाठीस पुण्य जमा होते. पदरी पुण्य संचय वाढतो. पण वर लिहिल्या प्रमाणे लोकांमधे पाप पुण्याच्या कल्पना ज्या मनाशी निगडीत आहेत त्या मनासोबतच विरून गेल्या. त्यामूळे पाप पुण्याचा विचार संपला.

आता आचार्य म्हणतात "अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता" भगवंत गीतेच्या १५व्या अध्यायात म्हणतात

"अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम ॥"

अर्थात भगवंत म्हणतात मीच सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणरा प्राण व अपानाने संयुक्त वैश्वानर अग्निरूप होऊन चार प्रकारचे अन्न पचवितो. आचार्य म्हणतात " अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता". आचार्यांना माहित आहे आपल्या जठरात भगवंत आहे. त्यामुळे भोजन म्हणजे निसर्ग साखळिने निर्माण झालेले ब्रह्मरूप भोजन म्हणजे अन्न हे ही भगवंतच. मी जेवणारा, मीच जेवण, व जेवण करून तृप्त होणारा भोक्ता ही मीच. अन्न ही मीच, जेवणारा ही मी आणि पचविणारा व तृप्ती घेणारा ही मीच. करण, कारण, कर्ता, सर्व मीच अर्थात भगवंत. जसं गीतेच्या चौथ्या अध्यायात भगवंत म्हणतात,

"ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्तह्मणा हुतम ।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ॥"

अर्थात, यज्ञात अर्पण अर्थात स्त्रुवा आदि ही ब्रह्म आहे. हवन करण्याजोगे द्रव्यही ब्रह्म आहे. तसंच ब्रह्मरूप कर्त्याच्या द्वारा ब्रह्मरूप अग्निमध्ये आहूती देण्याची क्रियाही ब्रह्म आहे. त्या ब्रह्मकर्मात स्थित असणार्‍या योग्याला मिळवण्याजोगे फळसुद्धा ब्रह्मच आहे.

यज्ञही भगवंत, स्त्रुवाही भगवंत, द्रव्य ही भगवंत, कर्ता ही भगवंत, अग्नी ही भगवंत, अग्नी ही भगवंत, फळही भगवंत, सारे काही भगवंत.

तसंच आचार्यांना माहित आहे की भोजन ही भगवंतरूप आहे. भोज्य आणि भोक्ता ही भगवंत रुप आहे. 'मी' हे काही नाही आहे. त्यामूळे 'मी पणा' पूर्ण गेला असल्याने जो राहिला तो शिवरूप आत्मा. म्हणून आचार्य म्हणतात की मी सत चित आनंदरूप मंगलरूप शिवरूप आहे.


न मे मृत्यू न मे जातीभेदः । पिता नैव मे नैव माता न जन्मः ।
न बंधुर्न मित्रं गुरू नैव शिष्यः । चिदानंदरुप शिवोहं शिवोहं ॥ ५॥

सर्व काही भगवंत रूप झाले आहे. आता आचार्य या श्लोकात गीतेचे मूळ तत्व, पुनर्जन्म, या बद्दल सांगत आहेत. गीतेच्या तत्वानुसार जो जन्माला आला त्याला मृत्यू निश्चितच. या जन्मी कृत्य करू त्याचे फळ भोगण्यासाठी पुन्हा जन्म आहेच. पण मानवी जन्माचे सार्थक म्हणजे मोक्षपद गाठणे. पुनर्जन्माच्या चक्रव्युहातून सुटका करून घेणे. हे सारे ज्ञान आचार्यांना आहे. म्हणून आचार्य या श्लोकात म्हणतात " माझ्या मनात मृत्यूबद्दल शंकाच नाही. कारण जाणारा माझा देह आहे आत्मा नाही. अर्थातच अविनाशी आहे. परत आतापर्यंतचे काम भगवंताला अर्पण केले आहे. त्यामुळे त्या कर्माचे व कर्म फळाचे ही बंधन मला नाही. त्यामुळेच कर्मफळ भोगण्यासाठी जन्माला येण्याची भिती ही नाही. पुढचा जन्म कोणता? जात कोणती याचा विचार करण्याची गरज नाही. कारण खात्री आहे या जन्मात मुक्त होणार. म्हणूनच मनात मृत्युबद्दल शंका नाही.
"पिता नैव माता न जन्मः" असं आचार्य म्हणतात. आपला जन्म होण्यासाठी माता पिता हे एक माध्यम आहे. पण जन्मच नसल्यानं माता आणि पिता ही राहणार नाही. बंधूही राहणार नाही. मित्र ही नाही. आता राहिला शिष्य आणि गुरू!!! आचार्य म्हणतात, " मोक्षपद अढळ असल्यानं शिवरूप गुरूत समाऊन जाणे निश्चित आहे. गुरूत एकरूप झाल्यानं गुरू शिष्याचे अद्वैत रूप झाल्याने ते दोघे वेगळे नाहीत. एकरूप झाले. ते एकरूप म्हणजे शिवरूप होय.


अहं निर्विकल्पो निराकार रूपो । विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेंद्रियाणां ।
सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंध । चिदानंदरुप शिवोहं शिवोहं ॥ ६ ॥

या सहाव्या श्लोकात आचार्य आपण शिवरूप आहोत याचे अधिक स्पष्टीकरण देत आहेत. ते म्हणतात, "माझा कोणी विकल्प नाही. तसाच मी निराकार रूप आहे. माझा कुठलाही एक आकार नाही. मी सर्व आकारांना व्यापून टाकले आहे. मी आणि भगवंत एकच विभूती. जसा भगावंत निर्विकार तसाच मी ही. त्यामूळे सारे आकार भगवंतातूनच निघून तेथेच विलीन होतात, नाश पावतात, लय पावतात. त्या सार्‍या आकारात इंद्रिये ही आली. कारण ती कुठल्याही आकाराहून वेगळी नाहीत. म्हणूनच मी शिवरूप.
सदा मे समत्वं - भगवंताच्या मनात समत्वाची भावना असते. "समत्वं योग मुच्यते" सर्वांना समानतेने पाहणारे भगवंत असल्याने आचार्यातील शिवरूपही भगवंतास दिसतेच. म्हणूनच आचार्य म्हणतात की मी बंधमुक्त आहे. समत्वाची भावना असल्याने "जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत।" हीच भावना आचार्यांच्या मनी आहे. समत्वामूळे कर्मबंधनाची भिती नाही. कुठलेही बंधन नाही. म्हणून आचार्य मुक्त आहेत. म्हणून ते म्हणतात मी मुक्त आहे, शिवरूप आहे, मंगलरूप आहे. सत चित आनंदरूप आहे. मी गुणातीत आहे, मी स्थितप्रज्ञ आहे. मी शिव आहे.



आपल्या स्वतः बद्दल पूर्ण खात्री असल्याने गुरूच्या "कोण आहे?" या प्रश्नाला त्यांनी आपण दुसरे तिसरे कोणी नसून सत चित आनंदरूप, शिवरूप आहोत हे उत्तर दिले. आचार्य हे ठाम पणे सांगू शकतात कारण त्यांनी आत्म परीक्षण केले आहे. त्यांनी म्हटलेल्या प्रत्येक शब्दाला अर्थ आहे हे त्यांना ही माहित आहे. म्हणूनच तेवढ्याच जबाबदारीने त्यांनी स्वतः बद्दल ही सांगितले.

15 April 2007

चिदानंद रुपम शिवोहं शिवोहं

आदिगुरू श्री. शंकराचार्य रचित निर्वाणषटक येथे देत आहे.


मनोबुध्यहंकार चिताने नाहं । न च श्रोतजिव्हे न च घ्राणनेत्रे ।
न च व्योमभूमी न तेजू न वायु । चिदानंदरुप शिवोहं शिवोहं ॥ १ ॥

न च प्राण संज्ञो न वै पंचवायुः । न वा सप्तधातुर्न वा पंचकोश ।
न वाक् पाणी पादौ न चोपस्य पायु । चिदानंदरुप शिवोहं शिवोहं ॥ २ ॥

न मे द्वेष रागो न मे लोभ मोहौ । मदे नैव मे नैव मात्सर्यभाव ।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष । चिदानंदरुप शिवोहं शिवोहं ॥ ३ ॥

न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखम् । न मंत्रो न तीर्थ न वेदा न यज्ञाः ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता । चिदानंदरुप शिवोहं शिवोहं ॥ ४ ॥

न मे मृत्यू न मे जातीभेदः । पिता नैव मे नैव माता न जन्मः ।
न बंधुर्न मित्रं गुरू नैव शिष्यः । चिदानंदरुप शिवोहं शिवोहं ॥ ५॥

अहं निर्विकल्पो निराकार रूपो । विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेंद्रियाणां ।
सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंध । चिदानंदरुप शिवोहं शिवोहं ॥ ६ ॥

निर्वाणषटक

आद्य श्री. शंकराचार्यांनी अनेक संस्कृत स्तोत्र, षटक लिहिली आहेत. त्यात त्यांचे वेदसारशिवस्तव, शिवनामावल्याष्टकम्, आणि निर्वाणषटकम् प्रसिद्ध आहेत. चिदानंद रुपम् शिवोहम् शिवोहम् हे त्यांचे निर्वाणषटक. त्यालाच आत्मषटक असेही म्हणतात.

यामागची कथा अशी की, एकदा शंकराचार्य आपल्या गुरूकडे गेले. गुरू आपल्या पर्णकुटीत बसले होते. बाहेरची चाहूल लागताच त्यांनी आतून विचारले,"कोण आहे?" आपल्या गुरूच्या या प्रश्नाचे श्री. शंकराचार्यांनी जे उत्तर दिले ते आत्मषटक, निर्वाणषटक या नावाने प्रसिद्ध आहे.

सर्व सामान्य माणसाप्रमाणे,"मीच आहे" असे उत्तर न देता गुणातीत स्थितप्रज्ञासारखे त्यांचे उत्तर, हे आत्मषटक. हे निर्वाणषटक आपल्याला खुप काही शिकवून जाते. त्यांच्या या आत्मषटकाचे वैशिष्ठ्य म्हणजे पहिल्या तीन ओळीत ते मी कोण नाही हे सांगतात व चौथ्या ओळीत ते खरे कोण आहेत हे एकाच शब्दात पुन्हा पुन्हा सांगतात. त्यामुळे त्यांच्या या स्तोत्राचा आपल्या मनावर विशेष प्रभाव पडतो. त्यांचे वेगळेपण मोठेपण महानपण सर्वच भव्य दिव्य आहे हे समजून येते.

पुढील पोस्टमधे त्यांचे निर्वाणषटक.

13 March 2007

उज्ज्वला

फायनल ईयरचा रिझल्ट चांगला लागला होता. पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाल्याचं कळलं होतं. त्यामुळं आमची गाडी निवांत आरामात सोफ्यावर बसून टि.व्हीचा आनंद लुटत होती. संध्याकाळची वेळ होती. फोन वाजला. "मानदाचा फोन आहे गं.." आईनं आवाज दिला. मॅंडीनं या वेळी कसा काय फोन केला असावा या विचारानं एक मिनिटभर मी ब्लॅंक झाले. "हा मॅंडी बोल!! रिझल्ट बदलला नाही ना गं?" मी घाबरत तिला चाचपडलं. "रिझल्टचं नाही.... एक वाईट न्युज आहे.... उज्ज्वलाचा सकाळी ऍक्सिडेंट झाला..... on the spot गेली. तिचा चश्मा तेवढा रस्त्याच्या आतून पडल्यानं शाबूत आहे गं.... बॉडी काहिच उरली नाही......." मॅंडीचे शब्द कानावरून कानातून सगळीकडून जात होते. "आम्ही तिच्या घराजवळून बोलतोय. मी सुजाता आणि चेतू आम्ही आहोत. काहीच कळत नाहीये गं.... आम्ही सोबतच होतो सकाळी... जस्ट २ मिनिटांनी चुकामुक झाली.... आम्ही पुढं निघालो.... ती मागून होती...." मॅंडी भराभर बोलत होती. तिचा आवाज कापरा होता. अजून काय काय सांगून तिनं फोन ठेवला.... माझा आवाज बदललेला पाहून आई आली होती बाजूला...
मी आणि उजू फायनलच्या प्रोजेक्ट पार्टनर्स. एकत्र कॉलेजात जायचो, एकाच बेंचवर बसायचो.... गप्पांचे विषय, अभ्यास सगळं जुळून आलेलं. खुप हसणारी, मोजकं पण छान बोलणारी उजू आठवली. डोळ्यातून पाणी थांबतच नव्हतं. आई बोलत होती माझ्याशी.... मला काहीच आठवत नव्हतं.... आदल्या दिवशी आम्ही फोनवर बोललेलो आठवत होतं. आणि आज संध्याकाळी उजू नाही हे कसं ऍक्सेप्ट करावं.....
फायनल क्लियर व्हावं म्हणून धडपड करणारी उजू, कॉलेजला उशीर होतोय गं चल म्हणून मागं लागणारी उजू, जोक्सवर खळाळून हसणारी उजू..... रिझल्ट पहायच्या आधी हात घट्ट धरलेली उजू आठवली.
तिची आठवण आली. अजूनही येते, मला आज ही खुप मैत्रिणी आहेत. पण पाठीवर हात ठेऊन नको गं टेन्शन घेऊ म्हणणारी उजू जवळ नाहीये. I miss her.....


07 March 2007

कुठून तरी येतं फुलपाखरू
कुठे उडून जातं
चिमटीमध्ये उरतो रंग तेंव्हा
रंगात पाखरू दिसतं
भिरभिरणारं कोवळं वय
हळूच तिथे फसतं
ते वयच असं असतं
कॉलेजमधून परत येताना आशा भोसलेंनी गायलेल्या 'आज कुणीतरी यावे' या गीताचे बोल कानावर पडले. मराठी गाणी कधीच न सोडणारी मी हे गाणं ड्रॉप करणं निव्वळ अशक्य होतं. मनात ओळी येत गेल्या...


आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे

खुप वाढलेल्या उन्हानं तापलेली सुकलेली धरा... धरती... झाडावरची पानं ही सुकून गळतात. झाड काटक्या टाकतं. पक्षी उन्हं उतरल्याशिवाय बाहेर पडत नाहीत..... आणि आपल्याला तर नजरही बाहेर काढता येत नाही. आणि अशात एक दिवस असा येतो की आपल्यालाच प्रसन्न वाटतं. हवेत किंचीत गारवा येतो.

जशी अचानक या धरणीवर
बरसत आली वळवाची सर,
तसे तयाने यावे

आणि इतके दिवस स्तब्ध असणारा वारा देखिल हळू हळू गारवा पसरायला मदत करतो. हवेची थंड झुळूक मनाला एक दिलासा देऊन जाते. कुठं तरी वळीवाचा पाऊस पडलेला असतो. तापलेली धरणी जराशी थंड होते. मनात येतं जशी ही वळीवाची सर आली तसंच कोणीतरी यावं. नवीन मित्र, नवीन मैत्रिण कोणीतरी मिळावं. एक सखी एक सोबती अशी मिळावी

विचारल्याविण हेतू कळावा
त्याचा माझा स्नेह जुळावा, हाती हात धरावे

तो असा असावा ज्यानं मला समजून घ्यावं... माझं मन वाचावं. या क्षणाला माझ्या मनात जे येईल ते समजून उमजून घ्यावं. अनेक वेळा असं होतं.... मनातल्या भावना शब्दात मांडता येत नाहीत. त्या व्यक्त ही करता येत नाहीत. आमची मैत्री अशी व्हावी की मी काही ही न बोलता न सांगता माझं मन कळावं. माझ्या मनातलं गुपित चेहर्‍यावरून ओळखून घ्यावं.... आमच्या मैत्रीची वीण न सांगता घट्ट गुंफली जावी......


सोडोनिया घर नाती गोती
निघून जावे तया संगती, कुठे ते ही ना ठावे


मनं इतकी जुळून यावीत की घर, नाती यांचाही विसर पडावा... अत्यंत विश्वासानं त्याच्या सोबत डोळे बंद करून निघून जावं. कुठं चाललो, कसं चाललो याची तमा नसावी..... अख्ख आयुष्य त्याच्या नावे करून टाकावं.....




-------------------------------
गीतकार - ग दि माडगुळकर
गायिका - आशा भोसले
संगीतकार - सुधीर फडके