30 September 2007

तुला काय आवडतं गं??

सकाळी सकाळी मला अहोंनी प्रश्न केला "तुला नेमकं काय आवडतं गं?" आणि काही सुचायच्या आत निघून गेलं मला एकदम एकटं बसायला आवडतं. "हा हा हा" असं सातमजली गडगडाटी हसत हे रुम बाहेर गेले आणि दिवस रूटीन सुरू झाला. ब्रेकफ़ास्ट झाल्यावर तन्मय आणि हे दोघं बाहेर गेले. त्यादिवशी बाहेर जायला मी कधी नाही ते नको म्हणाले. मला एक वॉर्निंग मिळाली होती की "यायला उशीर होईल तुला घरी एकटीला बोअर होईल. चल आमच्या सोबत!" पण विचार केला की निवांत रहायला मिळतय कशाला जा आज बाहेर आणि मी "नको, मी येत नाही" असं डिक्लेअर केलं. अकरा - साडे अकराच्या दरम्यान दोघंजणं बाहेर गेले. आणि तन्मयच्या चिवचिवाटानं, हे आणि तन्मय अशा दोघांच्या धिंगाण्यानं भरून जाणार्‍या आमच्या घरात सामसूम शांतता आली. एक तासाभरात सगळी कामं झाली. मग नेटवर भटकून झालं, गाणी ऐकून झाली, क्रोशाच्या शालीच्या ५ ७ ओळी विणून झाल्या. आणि घड्याळात पाहिलं तर एकच तास संपलेला. आता येतील मग भूक लागेल म्हणून खायच्या तयारीला लागले. तन्मयला मऊ पोहे आवडतात. त्याची तयारी केली. म्हणजे कांदा टोमॅटो चिरला, बटाटा वर काढून ठेवला, कोथिंबीर धूवुन चिरून ठेवली, आणि पोहे भांड्यात काढून ठेवले. १० मिनिट्स संपले.
बापरे!! घरात कोणीच नव्हतं. मला हवा असलेला शांत आणि निवांत वेळ मिळाला होता. पण विचार करत होते तेंव्हा वाटलं की मला खरचं ही शांती, असा निवांतपणा हवाय का? तन्मयचा आवाज नाही, याचा घरात वावर नाही, कोणी बोलायला नाही. मी मला वेळ देऊ शकत होते पण मला करमत नव्हतं. बोअर झालं म्हणून दोघांना मोबाईलवर गाठावं म्हणलं तर यांचा मोबाईल घरातच वाजला. म्हणजे या दोघांशी काही कॉंटॅक्ट पण होणार नव्हता. घर खायला उठलं. काही तरी आठवावं म्हणलं तर तन्मय शिवाय काही आठवत नव्हतं. तो दोन महिन्याचा असताना मी त्याला घेऊन आलेली. त्याला कसं वाढवलं हेच आठवत होतं.
आआआआआआआआआआआआआआआआआआआआ असं जोरात ओरडावं वाटलं. तेवढ्यात बेल वाजली. "आआआआई, हाय!" असा तन्मयचा आवाज आला. लहान मुलाला, "तुला आईसक्रीम ठेवलय. ये खायला" असं सांगीतल्यावर कसं पळत येतात ना मी तशीच पळत दाराकडे गेले. आणि कबूल केलं "तुम्ही घरात नव्हता. मला हवा तसा वेळ मला मिळाला होता. पण मला खरचं करमलं नाही." पहिल्यांदा आयुष्यात मला वाटलं होतं की निवांत आणि शांत वेळ एकटीनं घालवणं नसतं. सगळ्य़ांसोबत राहणं, गप्पा मारणं या सारखं सुख नाही.

मला एकटं रहायला आवडत नाही... मला सगळं आवडतं पण एकटेपणा नाही आवडतं....