संध्याकाळी नेहेमी प्रमाणे खाली फिरत होते. अनेक वर्षांनी मी गवळी पाहिला... डोक्याला मळकट फेटा बांधलेला, सायकलला बांधलेली दुधाची कॅन, मागे लटकवलेली लिटर - अर्धा लिटरची मापं, आणि सायकलला बांधलेल्या त्या टिपीकल तुपकट ओशट दोर्या.. निमीषार्धात मी जवळ जवळ १२ १३ वर्ष मागे गेले. माझ्या डिग्रीची ही गम्मत आठवली... माझ्या सोबत इंजिनियरींगला शिल्पा होती.. माझी पहिली पासूऩची मैत्रिण... अगदी पहिली मैत्रिण.. आमचा ठेपा कायम तिच्याकडे असायचा. स्पेशली परीक्षेच्या आणि सबमिशनच्या काळात.. नाईट-आऊट्स असायचे.. तर शिल्पाकडे दुध द्यायला गवळी यायचे. आम्हा सगळ्याचे ते दुधवाले मामा होते. बाहेर फटफटी थांबल्याचा आवाज आला की आम्हाला समजायचं की दुधवाले मामा आले.... काकू, म्हणजे शिल्पाची आई, कायम म्हणायची," मामा दुध पातळ देताय..." आणि दुधवाले मामांचा ठरलेला जवाब असायचा, " नाही हो बाई, दुधच तसं येतयं..." आम्ही सगळेच हसायचो या संवादाला.. वर्ष सहा महिने हे सगळं निवांत आणि सुरळीत चाललं होतं... कॉलेजला येता जाता दुधवाले मामा दिसायचे... एक दिवस दुधवाले मामा पाण्याच्या नळाजवळ कॅन धुताना दिसले. कॅन धुवून त्यांनी धुतलेल्या कॅन मधलं पाणी दुसर्या कॅन मधे टाकलं.. आम्ही मैत्रिणींचा आगाऊपणा उफाळून आला... "काय मामा कॅनमधे दुध आहे का?" आम्ही मस्करी करत विचारलं. आमच्या मस्करीला मामांनी मस्करीत उत्तर दिलं "हो... आहे.. :-))" आणि बास!! त्या नंतर आम्ही सगळे त्यांना चिडवायचो, " मामा, तुम्ही दुधात पाणी घालून देता." आणि नेहेमी प्रमाणे मामाही ठरलेलं उत्तर द्यायचे," नाही दुधच तसं येतं"...
"चल पाऊस येतोय. लाईट जायच्या आत घरी जाऊ" या वाक्यानं भानावर आले. आज १२ १३ वर्षांनी गवळ्याला पाहिलं आणि जुन्या आठवणीचा कोनाडा पुन्हा उघडला... आमच्या डिग्रीच्या वेळी ते मामा म्हातारे होते.. आज कसे असतील? अजूनही तेच दुध पुरवत असतील का शिल्पाकडे? आम्ही पाणीवाले मामा म्हणायचो त्यांना.. त्यांना आठवत असू का आम्ही? एक ना अनेक प्रश्न मनात येत गेले.
कधी मधे नांदेडला जाणं झालं तर काकूंना नक्की त्यांच्या बद्दल विचारेल.
~ सोनल
08 August 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
chan ...bare watle kahi tari wegle wachle
हो.. एका मिनिटात हे आठवलं.. मग रात्री लिहून काढलं.
Post a Comment