31 December 2008

नववर्षाच्या शुभेच्छा!

२००८.... वर्ष कसं आलं आणि कसं गेलं काही कळलंच नाही. टिव्हीवर काही कार्यक्रम असला तर बघावा या सदहेतूने मी टी.व्ही. लावून त्याच्याकडे डोळे लावून बसले... आठ वाजले तरी नॉन-दुरदर्शन चॅनल्सवर काही रंगारंग कार्यक्रमच लागला नाही. साधारण १५ - २० वर्षापुर्वीचा काळ आठवला... आम्ही चौथी पाचवीत असू... ३१ डिसेंबर म्हणजे मस्त कार्यक्रम असायचे. संध्याकाळी ७ वाजल्या पासूनच टि. व्ही वर (दुरदर्शनवर)... गाणी, एकपात्री, गप्पा, जादूचे प्रयोग... आणि निखळ मनोरंजन... आई पपांसोबत बसून न लाजता बघण्यासारखे कार्यक्रम.... पूर्ण वर्षभरात आम्हाला ३१ डिसेंबरला रात्री उशीरापर्यंत जागायची मुभा असे. समाधी १०.३० पर्यंत लागायची ही गोष्ट वेगळी. पण मजा मात्र खुप यायची. जेवणं लवकर लवकर आटोपून आम्ही टि.व्ही. समोर येऊन बसायचो आणि मग आधी ताठ बसलेली आमची गाडी थोड्यावेळानी उशीला टेकायची, मग अजून थोड्यावेळानी पालथी पडून टि.व्ही.चा आनंद घ्यायची. मग डोळे बंद व्हायचे आणि आम्ही हळूहळू निद्राधीन व्हायचो.

काळानुसार सगळं बदलतं असं म्हणतात. टि.व्ही ही बदलला, कार्यक्रम बदलले, नवीन चॅनल्स आणि त्यांच्या धांगडधिंग्यात मनोरंजन कधी हरवलं कळलच नाही. रटाळ निवेदन, आई पपांसोबत बसून न पाहता येणारे कार्यक्रम आणि मग एकतर टि.व्ही. बंद व्हायचा किंवा कार्यक्रम कोणी बघायचं नाही. अचकट विचकट हावभाव, टुकार कार्यक्रम आणि दिवसभराच्या रामरगाड्यानं येणारी झोप... या सगळ्यात गेल्या ७ - ८ वर्षात मी नववर्षाचाअ कार्यक्रम रात्री जागून पाहिला नाही.

असो!

हे नवीन वर्ष सगळ्यांना सुख समाधानाचं जावो, सर्व आशा आकांक्षा पूर्ण करणारं जावो ही सदिच्छा!

सोनल :-)

No comments: