19 October 2011

धर्म संग्राम आणि संग्रामाचा धर्म

गीतेच्या पहिल्याच अध्यायात म्हणजे अर्जुनविषाद योग या अध्यायात श्रीकृष्णाने अर्जुनाला धर्म संग्राम आणि संग्रामाचा धर्म हे दोन्ही समजावून सांगतात.

तसं पाहिलं तर धर्म आणि संग्राम हे दोन्ही परस्पर विरोधी शब्द. पण जेव्हा एकत्र केले तेंव्हा त्यातून दोन सुचक शब्द तयार होतात. एक म्हणजे धर्म संग्राम आणि दुसरा संग्रामाचा धर्म. खरं तर धर्म बुद्धी संग्राम करते. धर्म म्हणजे, "धमा धारयते प्रजाः", समाजाचे धारण करतो तो धर्म. धर्म बुद्धी लोकहित आणि समाजहित पाहते. जे काही चांगले दिसले, किंवा मिळाले की ते समाजाला द्यावे असे वाटणे ही धर्म बुद्धी. समाजहिताच्या विचाराला धर्म म्हणायचे. नवा विचार पटकन स्विकारला जात नाही. तो गळी उतरवण्यासाठी, लोकांनी स्विकारण्यासाठी संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष, हा संग्राम म्हणजे "धर्म संग्राम". धर्म संग्रामासाठी अनेक लोकांनी हाल सोसले, छळ सहन केला. "वरं जनहितं ध्येयम्, न केवला जनस्तुतिः" असं सावरकरांनी म्हटलेच आहे. लोकहित हे श्रेष्ठ ध्येय आहे. ती केवळ जनस्तुती नाही. लोकहिताचे प्रतिनिधित्व करणे हे जेवढे खरे तेवढेच प्रसंगी लोकमताला डावलून लोकहित साधणेही खोटे नाही.

एखादा "द्रष्टा" नेता जेंव्हा एखादा निर्णय घेतो तेंव्हा अनेक वेळा त्याला जनक्षोभाला सामोरे जावेच लागते. सावरकर, ज्ञानेश्वर, महात्मा फुले, अंबेडकर अशा अनेकांना तत्कालीन जनक्षोभाला सामोरे जावे लागले, जनक्षोभ सहन करावा लागला. पण या सर्वांनी धर्म संग्राम केला, किंबहुना निःशस्त्र धर्म संग्राम केला.

अर्थात दरच वेळी निःशस्त्र धर्म संग्राम शक्य असतो असं नाही. काही वेळा निःशस्त्र धर्म संग्राम अशक्य ठरतो. अविचारी, चूक, घातक विचार एकत्र एक संघ उभे राहतात. त्यांचे विचार समाजावर जबरदस्ती लादले जातात. त्यावेळी निःशस्त्र धर्म संग्राम केवळ अशक्य असतो. बुडणारा समाज व लयास जाणारी संस्कृती वाचवण्यासाठी सशस्त्र प्रतिकार, सशस्त्र संग्राम अपरिहार्य ठरतो. श्रेष्ठ जीवनमुल्ये समाजात टिकविण्यासाठी, वाईट व भयानक तत्वज्ञानाला प्रखर विरोध करून संपविण्यासाठी अहिंसेचे पालन करणे अवघड ठरते. श्रेष्ठ जीवनमुल्ये व संस्कृती टिकविण्यासाठी समाजातील सज्जनांचे रक्षण व दुष्टांचे निर्मुलन हे धर्म संग्रामाचे उद्दीष्ट!

हाच धर्म संग्राम आणि हा़च संग्रामाचा धर्म

2 comments:

prajkta said...

khup chan. atishay sundar nirupan.

Sonal said...

bhagwat geetechya parikshetla he maajha writeup. maala swataahala he awadla. mhanun ithe lihila. Thanks for appreciation. :-)