आद्य श्री. शंकराचार्यांनी अनेक संस्कृत स्तोत्र, षटक लिहिली आहेत. त्यात त्यांचे वेदसारशिवस्तव, शिवनामावल्याष्टकम्, आणि निर्वाणषटकम् प्रसिद्ध आहेत. चिदानंद रुपम् शिवोहम् शिवोहम् हे त्यांचे निर्वाणषटक. त्यालाच आत्मषटक असेही म्हणतात.
यामागची कथा अशी की, एकदा शंकराचार्य आपल्या गुरूकडे गेले. गुरू आपल्या पर्णकुटीत बसले होते. बाहेरची चाहूल लागताच त्यांनी आतून विचारले,"कोण आहे?" आपल्या गुरूच्या या प्रश्नाचे श्री. शंकराचार्यांनी जे उत्तर दिले ते आत्मषटक, निर्वाणषटक या नावाने प्रसिद्ध आहे.
सर्व सामान्य माणसाप्रमाणे,"मीच आहे" असे उत्तर न देता गुणातीत स्थितप्रज्ञासारखे त्यांचे उत्तर, हे आत्मषटक. हे निर्वाणषटक आपल्याला खुप काही शिकवून जाते. त्यांच्या या आत्मषटकाचे वैशिष्ठ्य म्हणजे पहिल्या तीन ओळीत ते मी कोण नाही हे सांगतात व चौथ्या ओळीत ते खरे कोण आहेत हे एकाच शब्दात पुन्हा पुन्हा सांगतात. त्यामुळे त्यांच्या या स्तोत्राचा आपल्या मनावर विशेष प्रभाव पडतो. त्यांचे वेगळेपण मोठेपण महानपण सर्वच भव्य दिव्य आहे हे समजून येते.
मनोबुध्यहंकार चिताने नाहं । न च श्रोतजिव्हे न च घ्राणनेत्रे ।
न च व्योमभूमी न तेजू न वायु । चिदानंदरुप शिवोहं शिवोहं ॥ १ ॥
या श्लोकात पहिल्या ३ ओळीत ते काय नाहीत ते सांगत आहेत. आपले शरीर हे अष्टधा प्रकृतीचे बनले आहे. त्यात पंचमहाभूते ज्यात पृथ्वी, आप, तेज, वायू, व आकाश यांचा समावेश होतो. तर सूक्ष्म तत्वात मन, बुद्धी व अहंकार यांचा समावेश होतो. म्हणजेच पंचमहाभूते व मन, बुद्धी व अहंकार यांनी हा देह बनला आहे. या पंचमहाभूतांपासून बनलेला हा देह शेवटी यातच विलीन होतो. म्हणजे ज्याचे घेतले त्यालाच दिले. आपले काही नव्हतेच. पंचमहाभूतातून आले आणि तेथेच गेले. जे आपले नाही त्याला आपले म्हणणे अयोग्य. ती एक प्रकारची चोरीच. तेंव्हा ज्याचे त्याच्या जवळ दिल्यावर आपल्या जवळ या नश्वर देहाचे काही उरतच नाही. त्यामूळे या देहाचे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय असं काहीच त्यांचे नाही. ज्या नाक, कान, डोळे, जीभ, व त्वचा या मूळे जे सूख किंवा दुःख मिळाले ते ही माझे नाही. सुख आणि दुःख या मन, बुद्धीच्या भावना. त्या जर जाणवत नाहीत तर अहंकाराने येणारा मी पणा ही जाणवत नाही. आणि त्यामूळेच त्यांच्यातील (शंकराचार्यातील) गुणातीत, स्थितप्रज्ञ पुरूष जाणवतो. जे आपलं नाही त्याला शंकराचार्य आपलं म्हणत नाहीत. मग उरलं काय? ह्या चराचर सृष्टीत दोनच गोष्टी आहेत एक देह दुसरा देही, एक शरीर दुसरा शरिरी, एक देह दुसरा आत्मा, एक क्षेत्रज्ञ तर दुसरा क्षेत्र, आपला नश्वर देह ही आपला नाही. म्हणजे जे आपल्या जवळ उरतो तो अविनाशी देही, आत्मा. तो मात्र आपला, ईश्वराचा अंशरूप. आणि मग म्हणून शंकराचार्य इथे म्हणतात की, मी मन, बुद्धी, अहंकार, नाक, कान, जीभ, त्वचा, डोळे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यातील मी काहीच नाही. उरलेला प्राण, उरलेला आत्मा तोच मी आहे. आणि हा आत्मा कसा आहे?? तर तो भगवंतरूप शिवरूप, सत चित आनंदरूप, शिवरूप आहे.
न च प्राण संज्ञो न वै पंचवायुः । न वा सप्तधातुर्न वा पंचकोश ।
न वाक् पाणी पादौ न चोपस्य पायु । चिदानंदरुप शिवोहं शिवोहं ॥ २ ॥
वायू हा प्राण आहे. प्राण म्हणजे एक शक्ती जी शरीरात चेतना निर्माण करते. हा प्राण सर्वच सजीवात असतो. अगदी एकपेशीय सुक्ष्म जीवांपासून प्रचंड देवमाशातही एकच प्राण, भगवंताचा अंश असतो. हा प्राण वायूच्या वर अवलंबून असतो. बहिणाबाईंनी म्हटले आहे
आला प्राण गेला प्राण
एका सासाचं अंतर
अरे जगण मरण
सासा सासाचं तंतर ॥
एक श्वास सजीवातील चैतन्य आहे की संपलं हे दाखवून देतो. म्हणूनच आपण चैतन्यमय प्राण असं म्हणतो. तर हा प्राण वायूवर अवलंबून असतो. परमात्म्याचा अंश म्हणजे आत्मा. आत्म्याने निर्माण केलेली शक्ती म्हणजे प्राण. म्हणजे प्राण हा परमात्म्याचा अशं झाला, भाग झाला. प्राणाचे पंचक व्यान, समान, अपान, उदान व प्राण होय. हे सर्व व वायू मिळून प्राण अर्थात आत्मा झाला.
शंकराचार्य म्हणतात की जो प्राण, पंचवायू म्हणजे आत्म्याचा एक भाग झाला तो आत्माच परमेश्वराचा अंश आहे. माझे काहीच नाही. तसंच हे शरीर, हा देह सप्तधातूंनी बनला आहे. ते सप्त धातू म्हणजे रस, रक्त, मेद, स्नायू, अस्थी, मज्जा, व शुक्र होय. अन म्हणजे गती, हालचाल करणे. आन म्हणजे नेणारा, गती देणारा.
प्र + आन = प्राण म्हणजे प्रकर्षाने नेणारा. हा मुख्यतः रक्तात असतो.
अप + आन = अपान म्हणजे खाली नेणारा. शरीरातील रसात अपान फिरत असतो.
उद + आन = उदान म्हणजे वर नेणारा. वर नेण्याचे काम स्नायू करतात. म्हणून उदानाचे काम स्नायूत असते.
सम + आन = समान म्हणजे समतोल राखण. हे कार्य हाडांचे.
वि + आन = व्यान म्हणजे विशेष हालचाल हे कार्य चरबी, मेदाचे असते.
शंकराचार्य म्हणतात हा प्राण, हा वायू, हा सप्त धातू, हा पंचकोश हे माझे नाही. कारण हे सर्वच देहाशी निगडीत आहेत. त्यांचा व्यवहार देहाबरोबर चालतो. देहातले चैतन्य संपले की त्यांचे कार्य ही संपणार. आत्म्याशी त्याचा काहीही संबंध नाही. आत्मा आहे तसाच राहील.
तसंच वाक, पाणी, पादौ, चोपस्य, पायु हे सर्व शरीराशी, विनाशी तत्वाशी निगडीत आहेत. त्यामुळे शरीरासोबतच त्यांचे व्यवहार चालणार. देह पडला, शरीराचा नाश झाला, शरीरातील चैतन्य निघून गेले, शरीर मृत झाले की यांचे कार्य संपले. म्हणजे जे शरीराशी निगडीत ते शरीरासोबत संपणार. शंकराचार्य म्हणतात की हे सर्व शरीरासोबतच जाणार असल्याने माझे नाहीच. तेंव्हा जे माझे नाही त्या बद्दल मला काही वाटत नाही. म्हणूनच मी माझ्या भगवंतरूप आत्म्याचा. मी फक्त शिवरूप आणि शिवरूपच आहे. माझ्या शरीराचा व्यापार चालवणारे तत्व माझे नाही. शरीराचे असित्व असलेले पाच कोष ( अन्नमय, प्रानमय, मनोमय., विज्ञानमय, आनंदमय) मी नाही. ज्या कर्मेंद्रियांच्या कर्तृत्वाचा सर्वांना अभिमान असतो तिच आपली नाहीत. आता मी काही बोलू सुद्धा शकत नाही. कारण माझी वाणी ही माझी नाही. म्हणून मी उरलो तो मंगलमय शिव!!
न मे द्वेष रागो न मे लोभ मोहौ । मदे नैव मे नैव मात्सर्यभाव ।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष । चिदानंदरुप शिवोहं शिवोहं ॥ ३ ॥
द्वेष, राग, लोभ, मोह, मद, व मात्सर्य (मत्सर) हे सर्व मनाचे भाव. पण पूर्वीच्या दोन श्लोकांवरून लक्षात येते की अष्टधा प्रकृतीच जेथे आपली नाही तेथे त्यातले मन ही आपले नाही. आणि त्या मूळेच मनाशी निगडीत भावही आपले नाहीत. अतःकरण चतुष्ट्याचं वार्यावर विरून गेल्याने धर्म, अर्थ, काम, आणि मोक्षही त्या चतुष्ट्या बरोबर वार्यावर विरून गेले. मनच मी नसल्यानं माझ्यातील अहं पुर्ण पणे गेल्याने मनाचे विकार ते सारे विरून गेले, नाहिसे झाले. त्या भावनाच गेल्याने त्यांच्यामुळे येणारे दोष ही विरून गेले. त्यामुळे दागिन्यातला दाग काढला तर १०० नंबरी शुद्ध सोनं उरतं तसं "मी पणा" विरून गेल्यानं फक्त आत्मारूप परमेश्वराचा अंश उरतो. म्हणून आचार्य म्हणतात की मनाचे सर्व विकार जाऊन मी निर्विकार झालो आहे. सत चित आनंदरूप शिवरूप बनलो आहे.
न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखम् । न मंत्रो न तीर्थ न वेदा न यज्ञाः ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता । चिदानंदरुप शिवोहं शिवोहं ॥ ४ ॥
पाप आणि पुण्य तसेच सुख आणि दुःख या भावना मनाशी निगडीत असतात. आता येथे मन पूर्णतः विकारमुक्त झाले आहे. त्यामुळे तेथे ना पाप ना पुण्याची मोजदात आहे ना सुख दुःखाचे उमाळे. मन आनंदाने भरून जाणारही नाही आणि दुःखाने व्याकूळही होणार नाही. कारण मी स्थितप्रज्ञ झालो. मंत्राचे पठन, तिर्थांचे दर्शन तसंच वेदपठण, तसंच यज्ञयाग इत्यादि क्रिया आपण वेगवेगळ्या कारणांसाठी करतो. काही लोक या क्रिया रोजच करतात. तर काही प्रासंगीक करतात. या सर्वाने मनाला शांती मिळते. व गाठीस पुण्य जमा होते. पदरी पुण्य संचय वाढतो. पण वर लिहिल्या प्रमाणे लोकांमधे पाप पुण्याच्या कल्पना ज्या मनाशी निगडीत आहेत त्या मनासोबतच विरून गेल्या. त्यामूळे पाप पुण्याचा विचार संपला.
आता आचार्य म्हणतात "अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता" भगवंत गीतेच्या १५व्या अध्यायात म्हणतात
"अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम ॥"
अर्थात भगवंत म्हणतात मीच सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणरा प्राण व अपानाने संयुक्त वैश्वानर अग्निरूप होऊन चार प्रकारचे अन्न पचवितो. आचार्य म्हणतात " अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता". आचार्यांना माहित आहे आपल्या जठरात भगवंत आहे. त्यामुळे भोजन म्हणजे निसर्ग साखळिने निर्माण झालेले ब्रह्मरूप भोजन म्हणजे अन्न हे ही भगवंतच. मी जेवणारा, मीच जेवण, व जेवण करून तृप्त होणारा भोक्ता ही मीच. अन्न ही मीच, जेवणारा ही मी आणि पचविणारा व तृप्ती घेणारा ही मीच. करण, कारण, कर्ता, सर्व मीच अर्थात भगवंत. जसं गीतेच्या चौथ्या अध्यायात भगवंत म्हणतात,
"ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्तह्मणा हुतम ।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ॥"
अर्थात, यज्ञात अर्पण अर्थात स्त्रुवा आदि ही ब्रह्म आहे. हवन करण्याजोगे द्रव्यही ब्रह्म आहे. तसंच ब्रह्मरूप कर्त्याच्या द्वारा ब्रह्मरूप अग्निमध्ये आहूती देण्याची क्रियाही ब्रह्म आहे. त्या ब्रह्मकर्मात स्थित असणार्या योग्याला मिळवण्याजोगे फळसुद्धा ब्रह्मच आहे.
यज्ञही भगवंत, स्त्रुवाही भगवंत, द्रव्य ही भगवंत, कर्ता ही भगवंत, अग्नी ही भगवंत, अग्नी ही भगवंत, फळही भगवंत, सारे काही भगवंत.
तसंच आचार्यांना माहित आहे की भोजन ही भगवंतरूप आहे. भोज्य आणि भोक्ता ही भगवंत रुप आहे. 'मी' हे काही नाही आहे. त्यामूळे 'मी पणा' पूर्ण गेला असल्याने जो राहिला तो शिवरूप आत्मा. म्हणून आचार्य म्हणतात की मी सत चित आनंदरूप मंगलरूप शिवरूप आहे.
न मे मृत्यू न मे जातीभेदः । पिता नैव मे नैव माता न जन्मः ।
न बंधुर्न मित्रं गुरू नैव शिष्यः । चिदानंदरुप शिवोहं शिवोहं ॥ ५॥
सर्व काही भगवंत रूप झाले आहे. आता आचार्य या श्लोकात गीतेचे मूळ तत्व, पुनर्जन्म, या बद्दल सांगत आहेत. गीतेच्या तत्वानुसार जो जन्माला आला त्याला मृत्यू निश्चितच. या जन्मी कृत्य करू त्याचे फळ भोगण्यासाठी पुन्हा जन्म आहेच. पण मानवी जन्माचे सार्थक म्हणजे मोक्षपद गाठणे. पुनर्जन्माच्या चक्रव्युहातून सुटका करून घेणे. हे सारे ज्ञान आचार्यांना आहे. म्हणून आचार्य या श्लोकात म्हणतात " माझ्या मनात मृत्यूबद्दल शंकाच नाही. कारण जाणारा माझा देह आहे आत्मा नाही. अर्थातच अविनाशी आहे. परत आतापर्यंतचे काम भगवंताला अर्पण केले आहे. त्यामुळे त्या कर्माचे व कर्म फळाचे ही बंधन मला नाही. त्यामुळेच कर्मफळ भोगण्यासाठी जन्माला येण्याची भिती ही नाही. पुढचा जन्म कोणता? जात कोणती याचा विचार करण्याची गरज नाही. कारण खात्री आहे या जन्मात मुक्त होणार. म्हणूनच मनात मृत्युबद्दल शंका नाही.
"पिता नैव माता न जन्मः" असं आचार्य म्हणतात. आपला जन्म होण्यासाठी माता पिता हे एक माध्यम आहे. पण जन्मच नसल्यानं माता आणि पिता ही राहणार नाही. बंधूही राहणार नाही. मित्र ही नाही. आता राहिला शिष्य आणि गुरू!!! आचार्य म्हणतात, " मोक्षपद अढळ असल्यानं शिवरूप गुरूत समाऊन जाणे निश्चित आहे. गुरूत एकरूप झाल्यानं गुरू शिष्याचे अद्वैत रूप झाल्याने ते दोघे वेगळे नाहीत. एकरूप झाले. ते एकरूप म्हणजे शिवरूप होय.
अहं निर्विकल्पो निराकार रूपो । विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेंद्रियाणां ।
सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंध । चिदानंदरुप शिवोहं शिवोहं ॥ ६ ॥
या सहाव्या श्लोकात आचार्य आपण शिवरूप आहोत याचे अधिक स्पष्टीकरण देत आहेत. ते म्हणतात, "माझा कोणी विकल्प नाही. तसाच मी निराकार रूप आहे. माझा कुठलाही एक आकार नाही. मी सर्व आकारांना व्यापून टाकले आहे. मी आणि भगवंत एकच विभूती. जसा भगावंत निर्विकार तसाच मी ही. त्यामूळे सारे आकार भगवंतातूनच निघून तेथेच विलीन होतात, नाश पावतात, लय पावतात. त्या सार्या आकारात इंद्रिये ही आली. कारण ती कुठल्याही आकाराहून वेगळी नाहीत. म्हणूनच मी शिवरूप.
सदा मे समत्वं - भगवंताच्या मनात समत्वाची भावना असते. "समत्वं योग मुच्यते" सर्वांना समानतेने पाहणारे भगवंत असल्याने आचार्यातील शिवरूपही भगवंतास दिसतेच. म्हणूनच आचार्य म्हणतात की मी बंधमुक्त आहे. समत्वाची भावना असल्याने "जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत।" हीच भावना आचार्यांच्या मनी आहे. समत्वामूळे कर्मबंधनाची भिती नाही. कुठलेही बंधन नाही. म्हणून आचार्य मुक्त आहेत. म्हणून ते म्हणतात मी मुक्त आहे, शिवरूप आहे, मंगलरूप आहे. सत चित आनंदरूप आहे. मी गुणातीत आहे, मी स्थितप्रज्ञ आहे. मी शिव आहे.
आपल्या स्वतः बद्दल पूर्ण खात्री असल्याने गुरूच्या "कोण आहे?" या प्रश्नाला त्यांनी आपण दुसरे तिसरे कोणी नसून सत चित आनंदरूप, शिवरूप आहोत हे उत्तर दिले. आचार्य हे ठाम पणे सांगू शकतात कारण त्यांनी आत्म परीक्षण केले आहे. त्यांनी म्हटलेल्या प्रत्येक शब्दाला अर्थ आहे हे त्यांना ही माहित आहे. म्हणूनच तेवढ्याच जबाबदारीने त्यांनी स्वतः बद्दल ही सांगितले.
02 May 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
khup sundar lihlays! aattaparyant fakt eikale hote, Pt. Jasrajanche.. khup sundar gaylay te.. very soulful.. arth kalalyamule far chan vattay eikayla ata...! thanks alot!!
भाग्यश्री, तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. हे विवेचन माझ्या आईने सांगितलेलं आहे. तुमची प्रतिक्रिया तिला नक्की सांगीन.
Post a Comment