21 August 2008

वपुर्झा... वपुंच्या आवाजात....

esnips.com... माझ्या फेवरेट साईट्स पैकी एक.. तिथं पुस्तकं, आणि गाणी या दोन्हींचा मी शोध घेते. व.पुंच्या पुस्तकांचा शोध घेणं obvious होतं. तिथे वपुंच्याच आवाजात वपुर्झा सापडलं. मोठा खजिना सापडल्याच्या वर आनंद मला झाला. त्याची प्लेलिस्ट इथे ठेवते आहे... माझ्या संग्रहासाठी

Powered by eSnips.com

17 August 2008

पुस्तकं.... आणि कंटाळवाणी????

एक दिवस रेडिफ़.कॉम साईटचं होम पेज उघडलं आणि एक प्रश्न दिसला... Which is the most boring book that you have read? asked by pranky khan. आणि माझ्या मनात एक प्रश्न आला.... पुस्तक बोअर होतं? पुस्तक, मग ते कुठलं ही असो कधी कंटाळवाणं होऊच शकत नाही. कधी गुज गोष्टी केल्यासारखं तर कधी कोणी समजाऊन सांगितल्या सारखं.. कधी एखादा विनोद तर कधी कोणी कडक शब्दांत केलेली कान उघाडणी... कधी आईच्या प्रेमळ शब्दांनी मनावर घातलेली फुंकर तर कधी वडिलांचा पाठीवर फिरलेला हात.... पुस्तक कोणत्या रुपात पुढे येईल हे ते पुर्ण वाचून संपेपर्यंत सांगता येत नाही. आणि यातली कुठलीच गोष्ट कंटाळवाणी नाहीये. मग पुस्तक कसं कंटाळवाणं होईन? मला तो प्रश्नच काढून टाकावासा वाटला.

असो! पुस्तकावरून आठवलं... कॉलेजात असताना व.पू.काळेंची पुस्तकं मी आधाशा सारखी वाचून काढली होती. माझ्या लायब्ररी कार्डावर अभ्यासापेक्षा जास्त इतर पुस्तकं जास्त असायची. त्यामुळं कधी फाईन भरावा लागला नाही!!!! माझ्याकडच्या पुस्तकाच्या संग्रहातलं माझं आवडतं पुस्तक म्हणजे व.पु.काळेंचं वपुर्झा.... भन्नाट आवडतं ते मला. आणि त्या पाठोपाठ आवडलेलं पुस्तक म्हणजे सिसिलिया अहर्न यांचं PS I Love You. दोन्ही पुस्तकं एकदम मस्त आहेत. वेळ छान जातो पुस्तकांच्या संगतीत. अवास्तव चर्चा नाही की कोणाची वायफळ बडबड नाही. पुस्तक कंटाळवाणं होत नाही..

आता ही पोस्ट वाचलीत ना तुम्ही तर सांगा तुमचं आवडतं पुस्तक....


Happy Reading

11 August 2008

ब्लॉगवर माझी वापसी....

आज जवळ जवळ २ महिन्यांनी मी ब्लॉगवर लिहायला आले. मधले २ महिने खुप धावपळीचे गेले. पॅकिंग, भारतात वापस येणं, इथली सेटलमेंट.... खुप खुप धावपळ झाली. आज दोन महिन्यांनी जेंव्हा ब्लॉगवर गेले तेंव्हा प्रोफ़ाईल विझिट्स पाहिल्या... आणि जवळ उडालेच. १२०० विझिट्स!!! गेल्या वर्षी जेंव्हा ब्लॉग लिहायला सुरू केलं होतं तेंव्हा मनात एकदा ही आलं नाही की दिड वर्षात १००० पेक्षा जास्त विझिट्स होतील. इन फ़ॅक्ट १०० विझिट्स ही होतील की नाही असं वाटत होतं. अनेक वेळा असं ही वाटलं की कोणी विझिट करेन की नाही?

माझं पहिलं लिखाण माझे शब्द ह्या श्री. राज जैन यांच्या वेबसाईट्वर झालं. तिथे मला मराठी लिखाणाची चटक लागली असं म्हणायला हरकत नाही! रोज काही ना काही मी तिथे लिहायची. कालांतरानं माझं तिथे जाणं ही कमी झालं आणि नंतर विचारता ती साईटच बंद झाल्याचं कळलं.लिहायची लागलेली सवय घालवावी वाटेना. नुसतं वर्ड मध्ये लिहून ठेवणं ही बरं वाटत नव्हतं. त्यावेळी तात्या अभ्यंकरांच्या ब्लॉगबद्दल कळलं. तिथे जाऊन पाहिलं. मग कळलं की इथं ही लिहिता येतं. मग blogger.com या साईट्ला भेट दिली. तेंव्हा कळलं की हे अजूनच सोपं आहे. कारण माझं गुगल अकाउंट होतं. मग लिहायला लागले. माझे शब्दवर लिहिलेली माझी पहिली कथा ही मी इथं टाकली. शिवाय माझ्या आईनं लिहिलेलं निर्वाण षटकावरील विवेचन इथं दिलं. मग लिहिणं सुचतच गेलं. ड्राफ़्ट्ची सोय असल्यानं अर्धवट लिहून ठेवून नंतर सवडीनं नेट वर टाकलं तरी चालत असल्यानं अजूनच सोप होत गेलं.

मार्च २००७ साली माझ्या ब्लॉगवर मी पहिली पोस्ट लिहिली. शाळेतल्या विद्यार्थ्यानं संदर्भासह स्पष्टीकरण असा प्रश्न सोडवताना असंख्य चुका कराव्या अशी ती पोस्ट होती. आजवर तिला एकही प्रतिक्रिया नाही! आणि मला तिला प्रतिसाद अपेक्षीतही नाही.
पण जसं जसं लिहित गेले तशी सुधारणा होत गेली. आज खुप छान नसलं तरी बर्‍यापैकी लिहिता येतं. प्रतिसाद ही मिळतात. बरं वाटतं.