15 March 2009

भाषा

नवीन गोष्ट लिहावीशी वाटतेय... प्लॉट तयार करावासा वाटतोय.. पण मला ना टॉपिक सुचत नाहिये कथेसाठी. ह्म्म.. बघू कोणी प्रतिक्रियेत सुचवतं का एखादा स्टोरी लिहिणेबल टॉपिक... लिहिणेबल वरून लक्षात आलं... माझी भाषा जरा चेंजत चाल्लीये... म्हणजे बदलत चाल्लीये.. करणेबल, खाणेबल, मी थिंकतीये.... मी सिंगतीये... मी वॉकतीये... मी कुकतीये... हा हा हा हा.. OMG.. कसली भन्नाट भाषा बोलतीये मी गेल्या १ २ महिन्या पासून.. आणि गम्मत म्हणजे तन्मय पण बर्‍यापैकी पिकतोय (पिक करतोय) ही भाषा... तो एक दिवस माझ्या पप्पांना म्हणाला.."आजोबा एक मिनिट थांबा मी थिंकतोय.. थिंकून झालं की सांगतो तुम्हाला..." मी चाटच पडले...

जरा चेंज म्हणून ही भाषा बरी वाटते. Not for serious studd though! असो! टॉपिक सुचतोय का काही?? टेला मला...

14 March 2009

रोहीत राऊत - अबीर गुलाल उधळीत रंग



अबीर गुलाल उधळीत रंग हे माझ्या अनेक अनेक आवडत्या मराठी गाण्यांपैकी एक. सर्वत्र शोध घेत माझं हे गाणं कायम ऐकणं सुरू असतं. सवयीनं युट्यूबवर मी शोधलं. तिथे रोहीत राऊतच्या गाण्याची लिंक मिळाली. माननीय तौफिक कुरैशी यांच्या उपस्थितीत झालेल्या झी मराठीच्या चिल्ड्रन्स स्पेशलच्या एका एपिसोड मध्ये त्यानं गायलेलं हे गीत. जनरली गाणं जेंव्हा मी ऐकते तेंव्हा मोडक्या आणि फुटून पार मोडलेल्या आवाजात मी ही गाणं गुणगुणते. पण रोहितचं हे गाणं ऐकताना मला इतर कोणाचा आवाज ऐकू ही आला नाही. त्याच्या शब्दांचं उच्चारण, स्टेजवरचा आत्मविश्वास, आणि त्याचा लागलेला सूर! मस्त झालं गाणं. उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जातीहीन... रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन... या दोन ओळींना लागलेला त्याचा आवाज मस्त आहे. "जातीहीन" शब्दातलं त्याचा "ज" चा उच्चार "जात नाही ती जात" यातील "ज" सारखा नाही तर "जीवन सुंदर आहे" मधील "ज" सारखा झालाय... तो भाव खाऊन गेला! रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन ही ओळ म्हणताना तो खरचं त्या मध्ये लीन झालेला भासतो. पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग.. नाथाघरी नाचे माझा सखा पांडूरंग या ओळींना घेतलेल्या हरकती आणि छोटीशी तान आहाहा असं म्हणायला मला तरी भाग पाडते.

जिओ रोहीत! खुप पुढे जा... तुझ्या वाटचालीसाठी अनेकोत्तम शुभेच्छा!

~ सोनल

26 February 2009

बालपणीचा उन्हाळा सुखाचा

आज दुपारी कधी नाही ते मी बाल्कनीचा पडदा उघडला आणि डोळे बाहेरचं उन बघून गच्च बंद झाले. अजून फेब्रूवारीपण संपला नाहीये आणि उन जाणवायला लागलयं. टिंग टिंग टिंग गाडीची घंटीपण अगदी मोक्याच्या क्षणी वाजली. माझं लहानपण आठवलं. आम्ही नांदेडला होळीवर जायचो. ते माझं आजोळ.. खाला नावाची एक बाई तिथं आमच्या दाराच्या बाजूलाच दुकान लावून बसलेली असायची. तिच्या टोपलीत त्या त्या ऋतूची फळं नक्की असायची. आणि बिनधास्त डोळे मिटून कुठलं ही फळ उचला तिच्या टोपलीत खराब फळं नसायची. तिच्यापासून ५ १० फुटांवर कुल्फीवाला उभा असायचा. जाड, ओला, लाल रंगाचा कपडा झाकलेली त्याची कुल्फीची कुलींग सिस्टीम एकदम जबरदस्त होती. तो आला तिथे की मग त्याच्या ढकलगाडीची घंटी वाजवायचा आणि "य कुल्फ्यल्य" अशी मस्त साद घालायचा. आजोळी, आमच्या वाड्यात सगळे मिळून ४ कुटूंब गुण्या गोविंदानं रहायची. या कुल्फीवाल्याची साद ऐकली की चारही घरातून लहान लहान डोकी बाहेर यायची आणि मग तिथं आम्ही कुल्फी घ्यायचो. आज फ्लॅट सिस्टीम मध्ये असा कुल्फीवाल्याचा गाडा दिसतच नाही. जेंव्हा आज गाडीची घंटी वाजली तेंव्हा वाटलं एक कुल्फी विकत घेऊन रस्त्यावर उभं राहून खावी.

बरं हे झालं कुल्फीचं.. आंब्याचा रस??????? आहाहा! लोह्याला आम्ही जायचो.. माझे आजोबा गोटी आंबा आणायचे शेतावरून येताना.. मग आमची आई किंवा माझी मोठी काकू - आशा काकू, रस करायची... आम्ही सगळी नातवंड आणि समोर आजोबा अशी पंगत बसायची.. चला माझ्याशी शर्यत लावता का रस खाण्याची? आजोबा विचारायचे मग त्यांच्याशी शर्यत लावत आम्ही रस खायचो. सकाळचे आंबे वेगळे, संध्याकाळचे वेगळे असायचे.. सकाळी केलेला रस संध्याकाळी पुन्हा यायचा नाही! हा हा हा! संपलेला असायचा सकाळीच! दुपारपर्यंतही रहायचा नाही.. रात्र तर दुर राहीली!

आज लहानपणचा उन्हाळा आठवतोय. तन्मयच्या पहिल्या उन्हाळ्याच्या सुट्या सुरू होतील... आत्ता कुठे त्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्या.. मग ती धमाल, सगळ्या भेटी.. पण तो मोठा झाल्यावर त्याला आपल्या सारखं आठवेल हे सगळं?

13 February 2009

अलेपी.... God's Own Country!!!!

"या वर्षीची वार्षिक ट्रिप कुठे काढायची गं?" हे वाक्य पूर्ण व्हायचा अवकाश की मी पट्कन म्हणाले.. "केरळ".. यांच्या चेहर्‍यावर हास्याची लकेर उठली!... "७ फेब्रूवारीची तिकीटं बुक केलीयेत... तयार आहेस ना?" मी तयारीला लागले.. मिनीमम पॉसिबल लगेज आणि कॅमेरा, चार्जर, मेमरी चिप, आणि आय पॉड विथ स्पीकर्स आमची ट्रॅव्हल बॅग तयार झाली. ७ तारखेला कोचीनला पोहोंचलो.. तिथून अलेपीला जाणार होतो. साधारण २ तासांचा ड्राईव्ह आहे. अलेपी जसं जसं जवळ येत होतं तसा हवेतला बदल जाणवत होता. खुप फ्रेश वाटत होतं. केरळमधील सर्वात मोठं तळं वेंबनाडू. तिथं आम्ही बोट हाऊस बुक केलं होतं. वेंबनाडू लेकचे हे काही फोटोज तुमच्या साठी...









शांत वातावरण, माझ्या आवडता मावळतीचा सूर्य... मला मावळतीचा सूर्य आवडतो. प्रचंड आवडतो.. व.पू. काळेंचं एक वाक्य आठवतं "आजचा सूर्य मावळल्या शिवाय उद्याचा सूर्य येत नाही... कदाचित म्हणून ही मला मावळतीचा सूर्य आवडत असावा." जेंव्हा कधी मी मावळतीचा सूर्य बघते मला वपूंची कोटेशन्स आठवतात. असो!

बोट हाऊसवरचा आमचा अनुभव स्मरणीय आहे. बोटीवरचे सगळेच क्रू मेंबर्स चांगले होते. तिथली स्वच्छता, मदत, आदरातिथ्य आणि तत्परता ५ पैकी ५ गुण घेऊन गेली. आम्हाला सर्व्ह केलेलं हे अननस...



रात्री बोटीवर एकदम आजोळी गावी राहिल्या सारखं वाटत होतं. मोकळी आणि स्वच्छ हवा, गरम गरम जेवण, आणि जेवण झाल्यावर कित्येक वर्षांनी मारलेल्या निवांत मोकळ्या गप्पा... आहाहा.. बालपण पुन्हा मिळाल्यासारखं वाटत होतं. आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत लोह्याला जायचो... आजोबांसोबत जेवणं झाली की मग आम्ही असंच त्यांच्या बाजेजवळ बसून त्यांच्याशी खुप वेळ गप्पा मारायचो... बोट एका बेटाजवळ किनार्‍याला थांबलेली रात्री. जेवणं झाल्यावर बोटीवरचे लाईट्स बंद केले गेले. आम्ही दोघं खिडकी जवळ उभे होतो... "ए सोनल.... तुला जमीनीवरचे तारे बघायचे???" मी तिकडे बघितलं तर असंख्य काजवे चमकत होते. खरोखर जमिनीवर तारे आले असावेत असं वाटत होतं. रात्री एक काजवा आमच्या खोलीत आला होता. तन्मयनी पहाटे पहाटे पाहिला आणि उत्सुकतेनं तो ही म्हणाला, "पपा, रात्री आपल्या खोलीत एक स्टार आला होता. मी पाहिला त्याला...."

सकाळी ब्रेकफ़ास्ट झाल्यावर आम्ही नावेत एक चक्कर मारली. आमचे हे आणि पुत्ररत्न दोघांनी नाव वल्हवली. पोल्युशनचा गंधही नसलेलं अलेपी सोडायची वेळ जशी जशी जवळ येत होती तसं शाहरूख खानचं एक गाणं आठवत होतं....

ए वक्त रुक जा, थम जा ठहर जा...
वापस जरा दौड पिछे....

अलेपी सोडावसं वाटत नव्हतं.... कधीही न विसरता येणारा निसर्ग आणि अतिथी देवो भव या उक्तीला १००% सार्थ ठरवणारं आदरातिथ्य घेऊन आम्ही वेलिंग्डन बेटाकडे रवाना झालो..

03 February 2009

राहूल!!!

इंजिनियरिंगला नांदेडला नंबर लागला आणि मग मी ग्रुपच्या शोधात लागले. "अरे सोनल, आपण एकाच कॉलेजला आलोत!!!" माझी ऍडमिशन झाल्यावर पहिलं जर कोणी माझ्या कॉलेज मधून बोललं असेल तर तो राहूल!!! "आता मजा येईन... तू आणि मी कॉलेज मध्ये धिंगाणा घालू आणि सगळ्यांच्या नाकी नऊ आणू...." आणि काय काय राहूल बोलत होता आणि मी मोठ्ठा आ वासून त्याच्या कडे बघत होते. पपा माझे दोन्ही काका मी राहूल आम्ही सगळे बैठकीत बसलेलो. इतकं बिनधास्त बोलणं राहूललाच जमू जाणे... राहूल कंट्रोलच्या बाहेर बोलतोय असं लक्षात आल्यानं म्हणा किंवा अजून काही कारण असो... "चला आता पुस्तकं आणा आणि अभ्यासाला लागा... " असं म्हणत आदरणीय प्रभूतींनी ऍडमिशन बैठक आवरली... राहूल मित्रांसोबत बाहेर गेला आणि मी काकू सोबत आत घरात.

राहूल माझा चुलत भाऊ. आमच्या वयात जेमतेम ४ महिन्यांचं अंतर. एकदम बिनधास्त व्यक्तिमत्व... मित्रांमध्ये रमणारा, सगळ्यांसोबत असूनही आपलं वेगळेपण जपणारा. "ए काय हे? हे बरोबर नाही.." समोर कोणीही असो आपलं म्हणणं ठणकावून मांडणारा, एखादा मुद्दा कळला नाही तर बिनधास्त डाउट्स विचारणारा राहूल मनात कोणाविषयी ही आकस न ठेवणारा मुलगा... राहूलचा पुढे मेडिकलला नंबर लागला. नांदेडहून तो औरंगाबादला गेला. तो होता तोपर्यंत मला एक सॉलिड सपोर्ट होता. काका काकू जेंव्हा कधी औरंगाबादला जायचे त्यावेळी त्याला मी काही ना काही तरी पाठवायचे. कधी छोटं मोठं पत्र तर कधी एखादी हलकी फ़ुलकी गिफ़्ट. पुढे ते ही कमी झालं. पण त्याची पोच यायची.

MBBS झाल्यानंतर त्यानं न्युरोसर्जरीत स्पेशलायझेशन केलं आणि सध्या पेडीयाट्रिक सर्जरीत सुपर स्पेशलायझेशन करतोय. ५ - ६ महिन्यांपूर्वी राहूलची एक धावती भेट झालेली. तो तिरुपतीहून मणिपालला वापस जात होता त्यावेळी बेंगलोरला माझ्याकडे आला होता. अगदी तासभर होता पण खुप दिवसांनी भेटलो होतो. बरं वाटलं. आम्ही मणीपालला त्याच्याकडे गेलो होतो. दोन दिवस खुप मजेत गेले. जुन्या आठवणी, जुन्या गप्पा, जुने विषय... एक ग्राफिटी आठवली आणि १००% पटली... शिळोप्याच्या गप्पा केल्या की ताजंतवानं वाटतं! तशीच ताजीतवानी होऊन मी बेंगलोरला परतले.

02 January 2009

ग्लोबल वार्मींग!

मी साधारण ११वी १२वी ला असेन, गणपती उत्सवानंतर,पाऊस कमी व्हायचा. मग हळू हळू थंडी पडायची. सप्टेंबर नंतर आणि ऑक्टोबरच्या सुरूवातीला स्वेटर्स, कानटोप्या, मफ्लर्स, ग्लोव्ज, गरम शाली असा थंडीचा लवाजमा वरच्या बॅगमधून बाहेर यायचा. डांबरगोळ्यांचा छान वास असायचा त्यांना. मग एकदा उन्हात ठेवून त्यांना धुतलं जायचं. सकाळच्या ट्युशनच्या वेळी आई मागं लागायची, "स्वेटर घाल गं बाहेर थंडी आहे." मग गरम पाण्यानी अंघोळ झाली तरी बाहेर खूप थंडी वाजायची. स्वेटर, मफ्लर, ग्लोव्ज आणि दोन जोड्या सॉक्स असा गरमागरम सरंजाम असला की थंडीची काय टाप आमची आणि सर्दीची गाठ घालून द्यायची? ऑक्टोबरची विचित्र गरमी आणि डिसेंबर ते फेब्रूवारीची मस्त थंडी असे चार महिने काय छान जायचे आमचे! आई छान सूप करायची, रात्री जेवणाला सार आणि खिचडी, तुप मेतकूट भात, पिठलं भाकरी भरल्या वांग्याची भाजी भरीत भुरका मिरचीचा ठेचा...

आहाहा! काय दिवस होते ते! साधारण माझ्या लग्नापर्यंत हा ग्लोब वार्म झाला नव्हता पण त्याची प्रोसेस सुरू झाली होती हे नक्की! डिग्रीला पावसाळा ऑगस्ट्मध्येच बाय म्हणायला लागला होता. सप्टेंबर कोरडा जायचा. ऑक्टोबरमध्ये कडक उन पडायचं पण थंडीचा मागमूस पार त्याच्या एंडला लागायचा. मग नोव्हेंबर मध्ये थंडी पडायची. आणि ही थंडी फेब्रूवारी मिड पर्यंत कॅरी ऑन व्हायची. नंतर उन्हाळा... माझी आई म्हणायची सात जूनला मॉन्सून नक्की येतो. जूनमध्ये फॉर शुअर एंट्री मारणारा हा मॉन्सून हळू हळू लेट कमर व्हायला लागला. तो ७ जूनच्या ऐवजी १० जून, १४ जून करत करत आता जुलै मध्ये दाखल व्हायला लागलाय. सप्टेंबर एंड पर्यंत पाऊस बाय म्हणतोय. मग ऑक्टोबरची कोरडी गरमी नोव्हेंबर ते यावर्षी तर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राहिली. यंदा २००८ मध्ये थंडी फक्त जानेवारीत पडली असावी. म्हणजे २००८च्या पहिल्या महिन्यात. नंतर ती पडलीच नाही. मी पुण्याला १५ डिसेंबर २००८ ला आले. आज २ जानेवारी २००९ आहे. आणि थंडी ३१ डिसेंबर २००८ला जाणवली. हे सगळं काय सांगतं? हे का होतंय? अंटार्क्टिकाचा बर्फ वितळतोय. तो संपूर्ण वितळला की समूद्राची पातळी वाढेल. जशी द्वारका समूद्रात बुडाली तशी आपली आमची मुंबईपण समूद्रात बुडून जाईल. याला काही सोल्यूशन आहे??? उन्हाळ्यातली गरमी ४७ ४८ डिग्रीपर्यंत पोहोंचलीये. पावसाळा कमी झालाय. हिवाळ्याचा काळ कमी झालाय. उन वाढतय. जसं आज मी म्हणतेय की माझ्या ११वी १२वी पर्यंत तसं तन्मयही काही काळानं म्हणेन.. माझ्या लहानपणी जानेवारी ते फेब्रूवारी असा २ महिने हिवाळा असायचा. आणि माझ्या विचाराची हद्द म्हणजे तो म्हणेन मी पावसाळा डॉक्युमेंटरीत पाहिलाय...

पृथ्वी तापतेय! तिला थंड ठेवणं शक्य नाहिये पण किमान तिचा तापण्याचा वेग कमी करण्याचा प्रयत्न तर व्हायला हवा ना!

31 December 2008

नववर्षाच्या शुभेच्छा!

२००८.... वर्ष कसं आलं आणि कसं गेलं काही कळलंच नाही. टिव्हीवर काही कार्यक्रम असला तर बघावा या सदहेतूने मी टी.व्ही. लावून त्याच्याकडे डोळे लावून बसले... आठ वाजले तरी नॉन-दुरदर्शन चॅनल्सवर काही रंगारंग कार्यक्रमच लागला नाही. साधारण १५ - २० वर्षापुर्वीचा काळ आठवला... आम्ही चौथी पाचवीत असू... ३१ डिसेंबर म्हणजे मस्त कार्यक्रम असायचे. संध्याकाळी ७ वाजल्या पासूनच टि. व्ही वर (दुरदर्शनवर)... गाणी, एकपात्री, गप्पा, जादूचे प्रयोग... आणि निखळ मनोरंजन... आई पपांसोबत बसून न लाजता बघण्यासारखे कार्यक्रम.... पूर्ण वर्षभरात आम्हाला ३१ डिसेंबरला रात्री उशीरापर्यंत जागायची मुभा असे. समाधी १०.३० पर्यंत लागायची ही गोष्ट वेगळी. पण मजा मात्र खुप यायची. जेवणं लवकर लवकर आटोपून आम्ही टि.व्ही. समोर येऊन बसायचो आणि मग आधी ताठ बसलेली आमची गाडी थोड्यावेळानी उशीला टेकायची, मग अजून थोड्यावेळानी पालथी पडून टि.व्ही.चा आनंद घ्यायची. मग डोळे बंद व्हायचे आणि आम्ही हळूहळू निद्राधीन व्हायचो.

काळानुसार सगळं बदलतं असं म्हणतात. टि.व्ही ही बदलला, कार्यक्रम बदलले, नवीन चॅनल्स आणि त्यांच्या धांगडधिंग्यात मनोरंजन कधी हरवलं कळलच नाही. रटाळ निवेदन, आई पपांसोबत बसून न पाहता येणारे कार्यक्रम आणि मग एकतर टि.व्ही. बंद व्हायचा किंवा कार्यक्रम कोणी बघायचं नाही. अचकट विचकट हावभाव, टुकार कार्यक्रम आणि दिवसभराच्या रामरगाड्यानं येणारी झोप... या सगळ्यात गेल्या ७ - ८ वर्षात मी नववर्षाचाअ कार्यक्रम रात्री जागून पाहिला नाही.

असो!

हे नवीन वर्ष सगळ्यांना सुख समाधानाचं जावो, सर्व आशा आकांक्षा पूर्ण करणारं जावो ही सदिच्छा!

सोनल :-)